या, चेतवू या होळी आगळी…!

0
100

त्या दिवशी मी चांदूररेल्वेहून अमरावतीला जात होतो. एसटीत खूप गर्दी. पण, मला मात्र खिडकीजवळची जागा मिळविण्यात यश आलं. त्या रेटारेटीत जीव कसा कासावीस झाला होता. गुदमरला होता.
झाली एकदाची बस चालू. तेव्हा खिडकीबाहेर नजर जाताच मी अवाक् झालो. टक लावून बघतच राहिलो.
सडकेच्या बाजूलाच असलेल्या त्या माळरानातील पळसाच्या झाडांनी मला आकर्षित केलं होतं. फांदीफांदीवर दाटीदाटीनंं लालचुटूक फुलं फुलली होती. सारं माळरान वेधक, मनमोही झालं होतं. पळसफुलांच्या सुखद भारानं फांद्या हेलकावत होत्या, हसत होत्या, सुसंवाद साधीत होत्या. बघणार्‍यांना मिस्कीलतेनं खुणावत होत्या.
‘‘काय बघता एवढं खिडकीतून?’’ बाजूच्या प्रवाशानं सहज विचारणा केली.
‘‘बघा ना! त्या पळसाच्या फांद्या कशा लदबदल्यात लालचुटूक फुलांनी!’’ मी उत्तर देता झालो.
‘‘आता होळी नाही का आली?’’ सहप्रवाशानं माझ्याकडं पाहात माहिती दिली.
‘होळी’ हा शब्द कानी पडताच लगेच एक विचार माझ्या मनाला स्पर्शून गेला… मी क्षणभर त्या विचारप्रवाहात दूर दूर वाहत गेलो.
वाटलं, ‘‘होळी- आग- ज्वाला- दाहकता… या सार्‍या शब्दांचा केवढा एक दुसर्‍याशी निकटचा संबंध! किती जवळचं नातं! एकमेकापासून विभक्त न होणारं!
आगीच्या कक्षेत जे काही येतं ते क्षणात राख होऊन जातं! अगदी खाक होऊन जातं! नष्ट होऊन जातं! विलयास जातं! नेस्तनाबूत होतं!
हे आहे आगीचं- अग्नीचं सामर्थ्य! तर मग जे अशुभ, दूषित, अमंगल, विकृत आहे ते सारं या दाहकतेत का जाळून नष्ट करून टाकू नये? मनामनातील, कुटुंबा-कुुटुंबातील, समाजा-समाजातील पर्यायानं समस्त राष्ट्रातील जे काही बोचरं आहे, विकृत आहे, दिशाभूल करणारं आहे, कुमार्गानं नेणारं आहे, मतभेद निर्माण करणारं आहे, माणसाला माणसापासून विभक्त करणारं आहे, चांगुलतेचं अध:पतन करणारं आहे हे सारं सारं का जाळून टाकू नये होळीच्या भडकत्या आगीत?
तिच्या उफाळणार्‍या, धगधगत्या ज्वालांनी समूळ नाश तरी होईल- मनाची तगमग वाढविणार्‍या टोकदार-बोचर्‍या जाणिवांचा… सुटका तरी मिळेल जीवघेण्या विषारी व्यथेपासून!
माझ्या मनाचं पाखरू मध्येच फडफडलं अन् हळूच चिवचिवलं. मला त्याचं कुजबुजणं समजलं. ते म्हणालं- आठवतं का? या सागराला कितीदा म्हटलं की ‘टाक बुडवून तुझ्या अथांगतेत- मनाच्या पाकळ्या हळूच कुरतडणारा व्यथेचा किडा! पण, त्या विस्तीर्ण जलाशयातही तो गुदमरला नाही, त्याचं वळवळणं सुरूच आहे… बरं झालं होळी येते आहे. तिला म्हणावं, जाळून टाक या विघ्नकारी व्यथेच्या किड्याला!
एवढंच कशाला? पर्वतालाही अनेकदा बोलून झालं की, ‘‘हे पर्वतराज! दे ढकलून तुझ्या उंच कड्यावरून एखाद्या खोल दरीत- हा मानवतेची नरडी फोडणारा भ्रष्टाचाराचा क्रूर राक्षस! पण, त्या कडेलोटानंतरही त्याचा कपाळमोक्ष झाला नाही… उलट, तो मोठ्या दिमाखानं तोंड वर काढतो आहे. खिदी खिदी हसतो आहे. चांगुलतेला वाकुल्या दाखवितो आहे. माणुसकीची टिंगल उडवितो आहे.
बरं झालं होळी येतेय्! तिच्या उग्र दाहकतेत भस्म कर म्हणावं या भ्रष्टाचाराच्या भयावह राक्षसाला. एकदाचं सुटून तरी जाऊ, या विघ्नसंतोषी झंझावातातून- जीव कासावीस होणार्‍या वलयातून!
आता हेही सांगायला हरकत नाही की, वाळवंटाला खूप खूप विणवण्या केल्यात की, ‘‘हे वाळवंटा! टाक एकदाचं पुरून, तुझ्या वाळूच्या ढिगार्‍यात हा अनीतीच्या बिजातून अंकुरलेला कुवृत्तीचा अंकुर!
पण अति खेदानं म्हणावंसं वाटतं की, तो तसूभरही कोमेजला नाही. उलट चैतन्यमयी होऊन सालसतेला ग्रासू बघतो आहे. हीनदीनांना भेडसावतो आहे. सभ्यतेला त्राही त्राही करून सोडतो आहे, विनम्रतेला सळो की पळो करू पाहतो आहे, सद्गुणांची वाट ठायी ठायी अडवितो आहे.
पण होळी येते आहे, या वार्तेनं कसं मोहरून आलंय बघ! होळीच्या ज्वालांनी कसं गिळंकृत करावं या अनीतीच्या विषारी अंकुराला! नेस्तनाबूत व्हावा हा अशुभतेचा जहरी अंकुर होळीच्या भडकत्या अग्नीत! उफाळलेल्या ज्वालात… धगधगत्या दाहकतेत!
एवढंच काय? पण, एकदा वनराजालाही म्हटलं की, ‘‘लाव तुझी हिंस्रता पणाला? कसा हाणतोस ना तुझ्या तीक्ष्ण नखांचा फटकारा या काळ्या बाजारातील कावेबाज ठेकेदारांना! एवढं असूनही त्यांची मनमानी कशी सहिसलामत नांदते आहे.
बरं झालं तू येते आहेस- हे होळी! तुझं येणं खचीतच संदर्भमयी आहे. अर्थमयी आहे. तू येताना सूर्याची प्रखरता, ज्वालामुखीची दाहकता, विजेची तेजस्विता घेऊन ये! जेवढी आग प्रकट करता येईल तेवढी कर! गाठ उग्रतेचा उच्चांक!
कशासाठी हे सारं सांगतोय् ठाऊक आहे? ते एवढ्यासाठी की, एकदाचा अंत तरी होईल या मनाच्या पाकळ्या कुरतडणार्‍या व्यथेच्या किड्याचा! भ्रष्टाचाराच्या क्रूर राक्षसाचा! कुवृत्तीच्या अंकुराचा! अन् काळा बाजार करणार्‍या लबाड लांडग्यांचा!
हे होळी! तुझ्या चेतलेल्या आगीतून काढ लांब दुधारी जिव्हा बाहेर! यातील एकही सुटता कामा नये! आता मात्र वेळ आलीय् चांगुलतेच्या रक्षणार्थ बंधुत्व-एकत्वाच्या वृद्धीसाठी विचारांची पाती तीक्ष्ण करण्याची! राष्ट्रद्रोह्यांना पुरेपूर अद्दल घडविण्याची! विकृतीची नांगी करकचून बांधण्याची! अधमतेला ठेचण्याची! दांभिकतेचा पडदा फाडण्याची!
या एकविसाव्या शतकात होळीचा संदर्भ जनहितार्थ बदलावा लागेल. या, असं जवळ येऊ या… एकदिलाचे होऊ या. मनाला जाळणारं, कुटुंबाला अस्वस्थ करणारं, राष्ट्राचं अध:पतन करणारं- सारं सारं जाळून टाकू या होळीत!
‘‘अहो, आलं अमरावती. उत्तरायचं ना?’’ सहप्रवाशाच्या हाकेनं मी भानावर आलो.
खाली उतरता उतरता मात्र विचारांच्या ठिणगीनं एक आगळीवेगळी होळी पेटली होती, चेतविली होती…!
प्राचार्य विश्‍वास दामले,९४२१७३९५५१