एकजूट हवी

0
134

आज स्त्रीचं क्षेत्र चूल आणि मूल या पुरतं मर्यादित राहणे इतिहासजमा झाले आहे. भारतीय संस्कृतीचा विचार करताना आपला ‘स्व’ शोधण्याकरिता, जपण्याकरिता चाललेला स्त्रीचा संघर्ष फार पूर्वीपासूनचा आहे. श्री समर्थ रामदासांच्या काळात चारशे वर्षांपूर्वी स्त्रियांची होणारी विटंबना, छळ, अत्याचार बघून समर्थ व्यथित झाले. स्त्रीशक्तीला तिच्या तेजाची जाण करून द्यायचा त्यांनी प्रयत्न केला. स्त्रीविषयक त्यांचा दृष्टिकोन निकोप असल्याने त्यांनी ‘स्त्रीमठाधिपती’ बनवून स्त्रीचे कर्तृत्व सिद्ध केले. वेणाबाई मिरज मठाधिपती होत्या, तर अक्काबाई हुशार धोरणी असून, सज्जनगडाचा कारभार पाहत. सतराव्या शतकात मुक्ताबाई, जनाबाई नंतर बहिणाबाई यांची काव्यप्रतिभा अचंबित करणारी आहे. निरक्षर असूनही भक्तिमार्गाची मधुर वाट जनतेला दाखवून सशक्त मन घडविण्याची त्यांनी किमया केली. त्यांनी रोवलेला भक्तिमार्गाचा झेंडा आजही अभिमानाने फडकत आहे. एकोणविसाव्या शतकात आगरकर, कर्वे, फुले, रानडे यांच्या प्रयत्नाने स्त्रीसुधारणेचा विचार समाजात रुजविला गेला. त्याचाच परिपाक म्हणजे आज स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून मिरवू शकली, हे नाकारता येत नाही. संघर्षाच्या काटेरी पायघड्या अनुभवूनच आजच्या स्त्रीचे भावविश्‍व सजले आहे. १८८७ साली कार्नेलिया सोराबजी ही महाराष्ट्रातील पहिली महिला वकील. हिने केशवपन, बालविवाह कायदा यासाठी लढा दिला आणि कायद्यात बदल घडवून आणले. स्वातंत्र्यपूर्व काळात प्रखर संघर्ष करणार्‍या, ‘स्व’ जपून स्फुल्लिंग चेतवणार्‍या या ज्योती महानच! आज संगणकीय युग आहे. महिलांनी चौफेर आपले व्यक्तिमत्त्व फुलविले आहे. असे एकही क्षेत्र नाही की, स्त्रीने ते पादाक्रांत केले नाही. आज समाजात लहान-मोठ्या उद्योजक महिला बघायला मिळतात. आपल्या शैक्षणिक, आर्थिक कुवतीनुसार कष्ट करून संसाराला त्या हातभार लावतात. बचत गटाचीही साथ त्यांना लाभतेय. भविष्यात उज्ज्वल भविष्य घडू शकणार्‍या महिलेचा बळी ‘स्त्रीभ्रूणहत्ये’च्या रूपात होताना बघून मन उद्विग्न होतं. जनमानसाला हादरवून टाकणार्‍या या घटनेतील क्वचित व्यक्तींना थातुरमातुर सजा होते, तर प्रतिष्ठित धेंड पुराव्याअभावी सुटून दुसरे सावज टिपण्यास मोकळे. दक्षिण आफ्रिकेच्या खासदार इला गांधी यांनी फाशीच्या शिक्षेमुळे महिलांवरील अत्याचार थांबणार नाही, असे मत व्यक्त केलेय. यासाठी स्त्री-पुरुष समानतेचा विचार प्रेरक ठरू शकतो. पुरुषांच्या मनात महिलांबाबत सन्मान जागृत व्हायला हवा व महिलांनीही अधिक सक्षम व्हायला हवे. यासाठी कराटे, तायक्वांडोसारखे प्रकार आत्मसात करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
नवनिताचे हृदय असणार्‍या ईश्‍वराने आपले प्रतिनिधित्वाचे प्रतीक म्हणून तर स्त्रीची व्यवस्था भूलोकी केली नसेल ना? कोमल, हळुवार स्वभावाची असणारी स्त्री प्रसंगी कठोरही बनते. कमालीची शांत, संयमी अशी ती बिनशर्त प्रेम करणारी ती कुणाची बायको, आई, मैत्रीण, सखी, हळवी कन्या तर प्रसंगी पतीची आईही बनते. सृजनशीलतेचा महामेरू असणारी स्त्री सर्व क्षेत्रात आत्मविश्‍वासाने वावरताना दिसते. आगगाडीला झेंडी दाखविण्यापासून थेट दोन्ही धृवावर झेंडा गाडण्यापर्यंत तिने मजल मारली आहे. सृजनाची प्रतिनिधी म्हणून वावरत आहे.
असो. वेदान्ताच्या आदर्शानुसार जीवन जगणे स्त्रियांद्वारेच प्रत्यक्षात येईल, असे विवेकानंद म्हणतात. खरंच बदलत्या काळात स्त्रीने स्वत:मधले लक्षणीय बदल घडवून आणलेत. ‘चूल आणि मूल’ या संकुचित वृत्तीतून ती बाहेर पडली आहे. आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून कुटुंबाला हातभार लावण्यात अग्रेसर बनत आहे. पाश्‍चिमात्य संस्काराचा पगडा आज वरचढ झालेला दिसून येतो. एक प्रकारचे भय मनात गर्दी करत आहे. माता-भगिनींना जागृत करण्याचा विडा सोलापूरची मर्दानी ऍड. रामतीर्थकर यांनी उचलला आहे. त्यांचे चैतन्याने सळसळते आवेशपूर्ण उद्बोधन निश्‍चितच विचार करायला लावणारे आहे. माता-शिक्षक यांचे सुदृढ संस्कार पुढील पिढीसाठी ‘टॉनिक’चे काम करणारे अर्थात हितावह आहे. आपल्या देशात जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, पंडित रमाबाई यासारख्या हिरकण्या जन्म घेतात. भारत काय नि परदेश काय मातृसंस्काराचे सुवासिक शिंपण हे पिढी दरपिढी होतच राहणार. अशा हिरकण्या आपल्या तेजाने चमकत राहून आपले संस्काररूपी तेज सर्वांवर वर्षवतील, अशी आशा करू या!
प्रांजली प्रभाकर सरपटवार /७५८८७८२६१४