स्त्री नक्षत्र

0
79

स्वअस्तित्वाचा वेध घेत आजची स्त्री शिक्षणाचा श्रीगणेशा करीत अंतरिक्षापर्यंत पोहोचली. एकही क्षेत्र तिने आपल्या परीस स्पर्शाने उणे ठेवले नाही; परंतु हे सर्व करीत असताना भारतीय स्त्रीने गृहस्थाश्रमातच आपला आदर्श मानला आहे. तिने सर्वप्रथम आपल्या हाताने घरातल्या वयोवृद्धांची सेवा होेते की नाही, कर्त्या पुुरुषाला विसाव्यासाठी जागा मिळते की नाही व अतिथींचा सत्कार होतो की नाही हे ती अविरत पाळीत आली.

कमलदलाच्या मोहात पडलेला भ्रमर संपूर्ण रात्र पाकळ्यांच्या बंदिस्त कोंदणात अडकून पडावा आणि सूर्य दर्शनाने त्या पाकळींचे द्वार उघडून तो बंधनमुक्त व्हावा, तसे काहीसे आज सूर्यराज उदयचलावर आल्यावर आम्हा स्त्रीवर्गाचे झाले. कारण आज घरीदारी जागतिक महिलादिनाच्या वार्‍याची गंध वार्ता चहू दिशांना ऐकू येऊ लागली.
८ मार्च…! नुकताच पार पडलेला जागतिक महिलादिन. पुन्हा एकदा महिलांना त्यांच्या स्त्री असण्याचा प्रकर्षाने जाणीव करून देणारा हा दिवस. याचा अर्थ हा एकच दिवस महिलांचा अन् उर्वरित ३६४ दिवस पुरुषांचे का? तर असे मुळीच नाही. उलट ३६४ दिवस कार्यरत असणार्‍या स्त्रीला तिच्या कार्याची पावती देणारा हा दिवस.
स्वअस्तित्वाचा वेध घेत आजची स्त्री शिक्षणाचा श्रीगणेशा करीत अंतरिक्षापर्यंत पोहोचली. एकही क्षेत्र तिने आपल्या परीस स्पर्शाने उणे ठेवले नाही; परंतु हे सर्व करीत असताना भारतीय स्त्रीने गृहस्थाश्रमातच आपला आदर्श मानला आहे. तिने सर्वप्रथम आपल्या हाताने घरातल्या वयोवृद्धांची सेवा होेते की नाही, कर्त्या पुुरुषाला विसाव्यासाठी जागा मिळते की नाही व अतिथींचा सत्कार होतो की नाही हे ती अविरत पाळीत आली.
त्यामुळेच तिच्यात एक ‘सखी’ दडली आहे आणि या शब्दामध्ये अत्यंत तरल असा भाव दडला आहे, याची तिला संपूर्ण जाणीव आहे. किंबहुना या शब्दामध्ये मोठा परामर्श दडला आहे. कारण ‘सखी’ तीच जिच्याजवळ मनातलं सारं गूज सांगावंस वाटतं.
सखी या नात्यासोबत तिने मातृत्वाची भूमिकाही स्वीकारली. कारण लहान मुलाला जन्मतःच अगदी पहिला अनुभव येतो तो स्त्रीचा. या अनुभवात मानवाला स्त्री भेटते, ती तिच्या मातृरूपातून. स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये सर्वप्रथम संबंध प्रस्थापित होतो तो माता-पुत्राचा. प्रत्यक्ष मातेच्या रूपाने आदिमातेच्या मूलरूपाचा म्हणजेच तिच्या आदिबंधाचा बालमनाला येणारा हा पहिला अनुभव असतो.
मातृत्वाचं अमोल लेणं, वात्सल्याची धाव नसानसातून आणि तरीही… तरीही सामोरं येणारं जीवन या सर्वांची पर्वा करेलच असे नाही. ही सारी मोहक लेणी, वरदाने बेड्यासारखे जेरबंद करून ठेवणारीही असतात.
कन्या, पत्नी, माता या तिहेरी नात्यांना पुन्हा नणंद, भावजय, सून, सासू वगैरे नात्यांचे उपप्रवाह येऊन मिळतात. स्त्री म्हणूनच मिळणारी दुय्यम वागणूक, कनिष्ठ स्थान, त्यातून येणारे ताण हे सर्व सहन करीत असतानाही तिच्या हृदयात कोणीच शिरत नाही. सारे स्त्री जीवनाच्या अंगणात खेळत असतात. तिच्या अंतरंगाच्या अंतर्गृहात कोणीही जात नाही. ते अंतर्गृह उदास आहे. तेथे प्रेमाने कलश घेऊन कोणीही जात नाही. त्यामुळे स्त्रीहृदय हे सदैव मुकेच आहे, पण तिच्या मुक्या हृदयाची हाक पद्मा गोळेंनी अचूक ओळखली.
‘‘हवे मला प्रिय गृहमंदिर मम
नको परी ती बंदीशाळा
प्रेमळ पती मम देव खरोखर
नव्हे परी तो राखणवाला
बाळे चिमणी गृहरत्ने मम
परि न शृंखला त्या पायीच्या
विकास त्यांचा, विकास माझा
विकास यातचि मम राष्ट्राचा’’
अशी मुक्या हृदयाची हाक जेव्हा ध्येयवेडी होते तेव्हा खर्‍या अर्थाने तिची धर्मबुद्धी जागृत होते. गायीचे माहात्म्य भारतात उत्पन्न झाले. स्त्रियांनी ते टिकविले. त्यामुळे शुचिर्भूतपणाचे तत्त्व उत्पन्न झाले. त्यांनी ते पराकोटीला नेले. म्हणून भारतीय संस्कृती सर्वत्र मातृवंदन करीत आहे. उपनिषदातील आचार्य देवतांची नावे सांगताना प्रत्यक्ष संसारातील देवतांची नावे सांगताना प्रथम ‘मातृदेवो भव’ असे सांगतात. आधी माता, मग पिता. पती-पत्नीमध्ये आधी पती आहे; परंतु आई-वडिलांमध्ये आधी आई आहे. पतीला पती व्हावयाचे, पत्नीला माता व्हावयाचे आहे आणि या दोन स्वरूपात माता हेच श्रेष्ठतर स्वरूप होय.
वात्सल्यावरचे घाव सोसताना तिची दमछाक होते. स्त्री आणि पुरुष ही दोन्ही रसायने वेगळी. स्त्री हे नक्षत्र म्हणून गौरवलं गेलं. तरीही तिच्या नक्षत्रासारख्या देहानं निर्माण केलेले अनेक प्रश्‍न, व्यथा, वेदना याला तिलाच सामोरं जावं लागतं. विस्कटलेली रांगोळी स्त्रीलाच पुन्हा नेटकेपणाने सजवावी लागते. घर, अंगणाशी अवघ्या मनोविश्‍वाचं नातं असतं तिचं.
नोकरी, व्यवसाय यात गुरफटलेली स्त्री आपल्या घर-अंगणाशी बांधील असते. आपल्या जबाबदार्‍या दहा पटीने वाढवीत असते. आधुनिक स्त्रीचा स्वतंत्रपणा, तिचा विकास, तिची प्रगतिपथावरील वाटचाल यासारखी अनेक वाक्ये काना-मनाला गोड वाटली तरी प्रत्यक्ष हे जीवन जगणारी स्त्री मात्र विलक्षण ताण-तणावाखाली पिचते आहे.
या ताणतणावाच्या दोरीवरून तोल सावरत चालण्याचं तिचं कसब आगळंवेगळंच. वात्सल्य, प्रीती याची शिंपणं करीत ती चालत राहते. ताणतणाव पेलत राहते. कधी जिंकते, कधी हारते. हे सारं असं असलं तरीही अंधारलेल्या मनामनातून लुकलुकणारं, प्रकाश देणारं स्त्री नक्षत्रच असतं! कधी आईच्या रूपात, कधी पत्नीच्या रूपात, कधी बहिणीच्या रूपात तर कधी आणखी कुणाच्या… पण ते असतं स्त्री नक्षत्रच!
या सर्व भूमिका वठविल्यामुळे हे स्त्री नक्षत्र आसमंताच्या उच्चासनावर सतेज अलंकृत झाले आहे. त्या नक्षत्राला अनंत प्रणाम!
जयश्री हेमंत कविमंडन/७७९८७८९८८८