उत्तरप्रदेश कुणाचा,आज फैसला

0
192

•कडेकोट बंदोबस्त
•सकाळी आठ वाजता सुरू होणार मतमोजणी
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १० मार्च
पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या शनिवारी हाती घेण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पहिला निकाल दोन तासांतच अपेक्षित आहे. मतमोजणीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये अलीकडेच निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पंजाब, गोवा आणि उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात, मणिपुरात दोन टप्प्यात आणि उत्तरप्रदेशात एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले. सर्व पाचही राज्यांतील मतमोजणी एकाचवेळी सुरू करण्यात येणार आहे.
मतमोजणीच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, यासाठी केंद्रीय निमलष्करी दलाचे हजारो जवान तैनात करण्यात आले आहेत.
देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तरप्रदेशात ७५ जिल्ह्यांमध्ये ७८ मतमोजणी केंद्रे आणि उत्तराखंडमध्ये १५ केंद्रे उघडण्यात आली आहेत. याशिवाय, पंजाबमध्ये ५४ आणि गोव्यात दोन मतमोजणी केंद्रे उघडण्यात आली आहेत. सावधतेचा उपाय म्हणून निवडणूक आयोगाने मतमोजणी केंद्रांवर मोबाईल फोन नेण्यावर बंदी घातली आहे.
उत्तरप्रदेशात त्रिस्तरीय सुरक्षा
उत्तरप्रदेशात मात्र त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सर्वसामान्य निरीक्षकांसोबत सर्वच मतमोजणी केंंद्रांवर गुप्त निरीक्षकही तैनात राहणार आहेत. मतमोजणीच्या प्रत्येक टेबलवर त्यांची नजर राहणार आहे. याशिवाय, केंद्रांच्या बाहेर निमलष्करी दलांचे जवान, तर केंद्रांच्या आत पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी हालचाली सुरू
नवी दिल्ली : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत दाखवल्यामुळे भाजपा वर्तुळात उत्साहाचे वातावरण असून पुढील भूमिका ठरवण्यासाठी एक-दोन दिवसात भाजपा संसदीय मंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे.
पंजाबवगळता गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत एक्झिट पोलमधून मिळाले आहेत. उद्याच्या निकालानंतर या चार राज्यात सरकार स्थापन करण्याच्या भाजपाच्या हालचालींना गती येणार आहे. या चार राज्यात भाजपाने आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा केली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर आणि नेतृत्वावर भाजपाने या निवडणुका लढवल्या होत्या.त्यामुळे या चार राज्यातील मुख्यमंत्र्यांची निवड भाजपाला करावी लागणार आहे.
भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत या चार राज्यातील मुख्यमंत्र्याची निवड केली जाणार आहे. शनिवारी वा रविवारी संसदीय मंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू, रसायन आणि खतमंत्री अनंतकुमार, आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत, राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल आणि शिवराजसिंह चौहान संसदीय मंडळाचे सदस्य आहेत.
संसदीय मंडळाच्या बैठकीत या चार राज्यातील मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव निश्‍चित झाल्यानंतर संबंधित राज्यातील नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. या बैठकीसाठी चार राज्यात भाजपाचे केंद्रीय निरीक्षकही पाठवले जाणार आहेत. त्या निरीक्षकांच्या नावाची घोषणाही या बैठकीत केली जाऊ शकते.