पाकला दहशतवादाचे प्रायोजक राष्ट्र घोषित करा!

अमेरिकेच्या संसदेत मांडले विधेयक

0
243

वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, १० मार्च
पाकिस्तानला दहशतवादाचे प्रायोजक राष्ट्र घोषित करा, अशी मागणी अमेरिकन कॉंग्रेसचे एक सदस्य आणि सभागृहाच्या दहशतवादसंबंधी उपसमितीचे अध्यक्ष टेड पो यांनी अमेरिकन संसदेच्या प्रतिनिधी सभागृहात कनिष्ठ सभागृहात गुरुवारी केली. संबंधित आशयाचे विधेयकही त्यांनी संसदेमध्ये मांडले.
अमेरिकेचे पाकिस्तानसोबतचे संबंध नेमके कशा प्रकारचे आहेत, हे ठरविण्याची मागणी करीत त्यांनी सदर विधेयक सादर केले. यावेळी टेड पो म्हणाले, पाकिस्तान अविश्‍वसनीय सहकारी असून, इस्लामाबादने अनेक वर्षे अमेरिकेच्या कट्टर शत्रूंची मदत केली आहे. कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला आश्रय देणे, हक्कानी नेटवर्कसोबत संबंध प्रस्थापित करणे, यावरुन दहशतवादीविरोधातील लढाईत पाकिस्तान कुणाला साथ देणार हे सिद्ध होत आहे. पाकिस्तान अमेरिकेसोबत करीत असलेल्या विश्‍वासघाताला सहकार्य करणे थांबविले पाहिजे.
टेड पो यांनी मांडलेल्या विधेयकानुसार, पाकिस्तानाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी कारवायांमध्ये सहकार्य दिले आहे का? याबाबतचा अहवाल ९० दिवसांच्या आत सादर करून संसेदत मांडायचा आहे. जर, पाकला ‘दहशतवादाचे प्रायोजक राष्ट्र’ घोषित केले गेले नाही, तर कोणत्या कायद्यांतर्गत हा निर्णय घेतल्या जाईल, हे देखील स्पष्ट करावे, असेही या विधेयकात म्हटले आहे. भारताचाही उल्लेख या विधेयकामध्ये करण्यात आला आहे. भारत-पाकदरम्यानचे भांडण हा अप्रासंगिक मुद्दा असल्याचे पो यांनी म्हटले आहे. मात्र, फारसा खुलासा त्यांनी याबाबत केलेला नाही.
खा. चंद्रशेखर यांनी विधेयक मागे घेतले
एकीकडे अमेरिकन खासदाराने पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याबाबत तेथे विधेयक मांडले असतानाच, भारतीय खासदार असलेले राज्यसभेचे सदस्य राजीव चंद्रशेखर यांनी याबाबतचे स्वत:च मांडलेले विधेयक आज शुक्रवारी मागे घेतले. शेजारी देश असलेला पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे वा नाही, हे ठरविण्यासाठी कुठल्याही चौकशीची गरज नसून, सर्व जगाला वस्तुस्थिती माहिती आहे, अशी भूमिका चंद्रशेखर यांनी मांडली. राज्यसभेत बोलताना ते म्हणाले, लष्करी कारवाईऐवजी पाकिस्तानबाबत आणखी पर्यायांचा शोध केंद्र सरकारने घेतला पाहिजे. विशेष म्हणजे चंद्रशेखर यांनीच ३ फेब्रुवारी रोजी हे खासगी विधेयक मांडले होते.