अमेरिकेला टक्कर देणार चीनचे जे-२० विमान

0
72

तिन्ही सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणावर जोर
वृत्तसंस्था
बीजिंग, १० मार्च
अमेरिकेला तुल्यबळ ठरेल, असे लष्करीसामर्थ्य उभे करण्यासाठी चीनने पाचव्या पिढीचे जे-२० लढाऊ विमान तैनात केले आहे.
अमेरिकेला टक्कर देण्यासाठी लष्कर, नौदल आणि हवाईदलाच्या आधुनिकीकरणाचा कार्यक्रम चीनने हाती घेतला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी लष्कराच्या आधुनिकीकरणाचा कार्यक्रम अधिक गतीने राबविण्याला विशेष प्राधान्य दिले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. चीन सध्या अत्याधुनिक पाणबुडी प्रकल्पासोबतच क्षेपणास्त्रभेदी प्रणालीवर काम करीत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात हवाई कार्यक्रमात चीनने प्रथमच जगाला जे-२० या जातीच्या लढाऊ विमानाची झलक दाखवली होती. पाचव्या पिढीच्या या लढाऊ विमानांमध्ये रडारलाही चकमा देण्याची क्षमता आहे. रडारवर दिसत नसल्यामुळे या विमानांना भेदणे मोठे आव्हान असणार आहे.
तथापि, अमेरिकेच्या एफ-२२ रॅप्टर आणि एफ-३५ प्रमाणेच चीनच्या विमानांमध्येही रडारला चकवण्याची क्षमता आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. २०१४ च्या एअर शो मध्ये चीनने जे-३१ स्टील्थ हे लढाऊ विमान प्रथमच जगासमोर आणले होते. अमेरिकेच्या एफ-३५ विमानाला टक्कर देण्यासाठी चीन जे-३१ विमानाची निर्मिती करीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.