अनुपच्या मृत्यूने तिघांना जीवदान

अमरावतीतून पहिल्यांदाच यकृत, मूत्रपिंड अवयवदानाचा यशस्वी प्रयोग

0
92

तभा वृत्तसेवा
अमरावती, १० मार्च
महिन्याभरापूर्वी आलेला अर्धांगवायूचा झटका आणि डोक्यात ताप मुरल्याने अनुप गायकवाड या अवघ्या २७ वर्षे वयाच्या युवकाचा गुरुवार, ९ मार्चला रात्री मृत्यू झाला. त्याच्या अशा अचानक जाण्याने हादरलेल्या गायकवाड कुटुंबीयांनी अनुपचे अवयव दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. या निर्णयाने तिघांना जीवनदान मिळाले आणि अमरावतीतून पहिल्यांदाच यकृत आणि मूत्रपिंड अवयव दानाचा प्रयोगही यशस्वी झाला.
येथील जेवडनगर परिसरात राहणारा अनुप आयटीआयचा विद्यार्थी होता. अनुप इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षाला शिकत होता. महिन्याभरापूर्वी त्याला टायफाईड झाला होता. यानंतर त्याचे डोळे दुखायला लागले. त्याला चष्माही लागला. अचानक आलेला ताप डोक्यात पोहोचल्याने त्याला अर्धांगवायूचा झटका आला. रेडियंट सुपर स्पेशालिटी रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया केल्यावर सायंकाळी त्याचे ब्रेन डेड असल्याचे लक्षात आले.
यानंतर डॉक्टरांनी त्याच्या शरीराची पूर्ण तपासणी केली असता डोळे वगळता इतर सर्व अवयव चांगले असल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी अनुपचे वडील ईश्‍वर गायकवाड यांना याबाबत माहिती दिली. मुलाचे जे अवयव चांगले आहेत ते कुणाला तरी दान करायचे आहेत, असे अनुपच्या वडिलांनी डॉक्टरांना सांगितले. रेडियंट रुग्णालयाने हेल्थ ऑर्गनायझेशन सर्व्हिसेसला माहिती दिली. नागपूर येथे मूत्रपिंडाची गरज असणारे दोन आणि मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये यकृताची गरज असणार्‍या एका रुग्णाची माहिती समोर येताच अनुपचे यकृत आणि मूत्रपिंड हे अवयव दान करण्याची प्रक्रिया रेडियंट रुग्णालयात सुरू झाली. डॉ. महेश चव्हाण यांनी अनुपच्या शरीराची रात्रभर काळजी घेतली. मुंबई, नागपूर, अकोला आणि अमरावतीच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी अनुपचे दोन्ही अवयव काढून वेळेत नागपूर आणि मुंबईला पाठविता येईल याची काळजी घेतली. येथील आयुर्वेदिक रुग्णालयात कामावर असणारे अनुपचे वडील ईश्‍वर गायकवाड यांनी हृदय घट्ट करीत आपल्या एकुलत्या एका मुलाचे अवयव दान करण्याचा जो निर्णय घेतला, तो आदर्शच म्हणावा लागेल. गायकवाड कुटुंबाच्या धाडसाचे आम्ही कौतुक करतो, अशी प्रतिक्रिया अवयव दानाची प्रक्रिया यशस्वी करणार्‍या डॉक्टरांच्या पथकाने दिली.
डॉक्टरांचे पथक
या सर्व प्रक्रियेत नागपूरचे डॉ. प्रकाश खेतान, डॉ. धनंजय बोकारे, डॉ. संजय कोलते, अमरावतीचे डॉ. आनंद काकाणी, डॉ. सिकंदर अडवाणी, डॉ. महेंद्र चव्हाण, डॉ. अनुराधा काकाणी, डॉ. सीमा अडवाणी, डॉ. माधुरी अग्रवाल, अकोल्याचे डॉ. प्रशांत मुळावकर, डॉ. सदानंद भुसारी व मुंबईचे डॉ. प्रशांत राव, डॉ. अरुण कुमार यांनी सहभाग घेतला.
पोलिस, मनपाचे सहकार्य
अनुपचे यकृत बेलोरा विमानतळावर पोहोचविण्यासाठी तसेच नागपूरला मूत्रपिंड घेऊन निघालेल्या कारला अमरावती शहराच्या हद्दीत कुठेही कसलाही अडथळा येणार नाही याची जबाबदारी पोलिस आणि महानगरपालिका प्रशासनाने उचलली. यासाठी सर्व मार्गांना ग्रीन कॉरिडोर घोषित करण्यात आले होते. वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अर्जुन ठोसरे, पोलिस निरीक्षक विजय चव्हाण व मनपा अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे यांनी या कामात मोलाचे सहकार्य दिले. अनुपचे यकृत एअर ऍम्ब्युलन्सने मुंबईला नेण्यात आले. मुंबईत कलिना विमानतळापासून ग्लोबल हॉस्पिटलपर्यंत मुंबईत वाहतूक पोलिस सज्ज होते.