मिरची, कापूस, तूर, धान पिकांचे प्रचंड नुकसान

0
80

अवकाळी पावसाचा फटका
संदीप राचर्लावार
सिरोंचा, १० मार्च
सिरोंचा तालुक्यात शुक्रवार, १० मार्चला झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापूस, मिरची, तूर व धान पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
सिरोंचा तालुक्यात कापूस वेचण्याचा शेवटचा टप्पा सुरू असतानाच मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतातील कापूस ओला झाला. उन्हाळी धानाची अनेक ठिकाणी कापणी झाली आहे. धान खळ्यावर ठेवण्यात आले असल्याने ओले झाले. यंदा मिरचीचे चांगले उत्पन्न होण्याची आशा होती. परंतु मिरची पिकालाही अवकाळी पावसाचा फटका बसला. तूर पिकालाही पावसाने सोडले नाही. तालुक्यात गेली अनेक वर्षे तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. येथील तंबाखूला विदेशातही मागणी होती. परंतु शासनाने तंबाखू उत्पादनावर बंदी घातल्याने सिरोंचा तालुक्यातील शेतकर्‍यांनी कापूस व मिरचीचा पेरा वाढविला. शुक्रवारी सकाळी अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पिकांसोबतच विटा व्यावसायिकांनाही जबर फटका बसला असून, विटांचे भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अवकाळी पावसाने भाज्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
महामंडळाचे धानही भिजले
सिरोंचा तालुक्यात नुकतीच आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची खरेदी सुरू झाली होती. पेंटीपाका, वडदम, आरडा, टेकडा, बामणी तसेच अमरावती येथील खरेदी केंद्रांवर खरेदी केलेले हजारो क्विंटल धान उघड्यावरच ठेवण्यात आले होते. अवकाळी पावसामुळे उघड्यावरील धान भिजल्याने महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात धान साठविण्यासाठी पुरेशी गोदामे नसल्याने उघड्यावरच धान साठवावे लागते. थोड्या फार प्रमाणात ताडपत्र्यांचा वापर केला जातो.
परंतु त्याही पुरेशा प्रमाणात नसल्याने दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे धान पाण्यात सडते. याबाबत सिरोंचा तहसील कार्यालयात संपर्क साधला असता, आम्ही तलाठी व महसूल तपासणीसांना नुकसानीची तपासणी करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात आले.