एक चळवळ : भुकेल्यांसाठीची…!

0
172

समोर युनोचा एक रिपोर्ट येऊन पडला होता…भारतातले जवळपास १९.५ कोटी लोक रोज उपाशी, अर्धपोटी राहतात. कुपोषणाचा सामना करतात… मन सुन्न झालं. काय करावं, याचा विचारही अजून पुरेसा झालेला नसतानाच एक दिवस आणखी एक बातमी कानावर पडली ती, आत जागा नाही म्हणून फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामाच्या आवारातील धान्याच्या नासाडीची. कायद्याने बहाल केलेल्या अधिकारांचा वापर करून मागितलेल्या माहितीने तर आणखीच अस्वस्थ केले होते. मनाच्या त्या उद्विग्न अवस्थेतच देशाच्या राष्ट्रपतींना एक पत्र लिहिले गेले. दोन वेळच्या भोजनाचीही ददात असलेली लक्षावधी माणसं इथं सर्वार्थानं उपेक्षित राहिली असताना, दोन वर्षांत २२,००० लक्ष मे. टन धान्य उघड्यावर राहिल्यानं, पावसात त्याची नासाडी झाल्याची बाब चीड आणणारी ठरणार नाही तर काय? यावर काहीतरी उपाय करा म्हणून केलेल्या विनंतीवर काही दिवसांनी एफसीआयचं चार ओळींचं एक पत्र आलं- धान्याची नासाडी थांबविण्यासाठी भविष्यात करण्यात येणार्‍या उपायांबाबत. पत्रात उल्लेख असलेले उपाय, म्हटले तर थातुरमातुरच होते. करायला सहज शक्य असलेले आणि तरीही योजण्यात न आलेले. उपाशी राहणार्‍या १९.५ कोटी माणसांबाबत तर अवाक्षरही त्यात नव्हतं. क्षणभर नाउमेद झाली, राष्ट्रपतींना पत्र लिहिणारी व्यक्ती. पण क्षणभरच! नाहीतरी पत्रातून क्रांती घडण्याची अपेक्षा तशी चुकीचीच होती. आपण स्वत:च काहीतरी करायला हवं, अशी गाठ मनाशी बांधून तो तयारीला लागला.
चंद्रशेखर कुंडू! पश्‍चिम बंगालातल्या आसनसोल शहरात एका खाजगी संस्थेत संगणक विज्ञान शिकवणारा एक सामान्य शिक्षक. त्यानं मनाशी केलेल्या निर्धाराला दोन विद्यार्थ्यांची सोबत मिळाली अन् एका आगळ्या चळवळीचा पाया रचला गेला. उपक्रमाची सुरुवात तशी छोटीशीच होती. जवळच्याच एका होस्टेलच्या व्यवस्थापनाची भेट घेतली. तिथल्या सर्वांची जेवणं आटोपल्यावर रोज उरणारं अन्न उकिरड्यावर फेकण्यापेक्षा आम्हाला द्या… आम्ही ते रोज इथनं घेऊन जाऊ. सकाळी व संध्याकाळीही. ज्यांना त्याची खरोखरीच गरज आहे, त्यांच्यापर्यंत ते पोहोचवू. काहीसा जगावेगळा वाटणारा तो प्रस्ताव ऐकून होस्टेलच्या व्यवस्थापकाच्या चेहर्‍यावर काहीसे तसलेच भाव उमटले- जगावेगळे! पण, बंगालातल्या गरिबीची पुरेशी कल्पना असल्यानं आणि सगळ्यांची पोटं भरल्यावर उरलेल्या अन्नाचं काय करायचं, हा रोज आ वासून उभा राहणारा प्रश्‍न यानिमित्तानं परस्परच निकाली निघणार असल्यानं, होस्टेल व्यवस्थापनाकडून होकार मिळाला अन् चळवळीचा आरंभ झाला. होस्टेलमधल्या स्वयंपाकघरात दुपारी-रात्री उरणार्‍या अन्नातून तिकडे फुटपाथवरच्या पंगती रंगू लागल्या… एखाद्या भांड्यात जमा केलेले इकडचे पदार्थ कधी जवळच्या झोपडीत जाऊन, कधी कुठल्याशा झाडाखाली, तर कधी थेट फुटपाथवरच भुकेल्यांना रांगेत बसवून वाढायचे अन् मग दुर्मिळ अन्न ताटात बघून त्यांच्या चेहर्‍यांवर उमटणारे भाव टिपत, आनंदाच्या त्यांच्या विश्‍वात आपणही रमायचं…
अगदीच एका छोट्याशा प्रयोगाने सुरू झालेली एक मोहीम आता चळवळीत रूपांतरित झाली आहे. त्याची व्याप्तीही एव्हाना विस्तारली आहे. अभिजित देवनाथ, डॉ. अपूर्व चॅटर्जी, अमिताभ चक्रवर्ती, संजय महापात्रा अशा सहकार्‍यांसोबतच, सोबतीने मैदानात उतरलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही हळूहळू वाढू लागली. कालपर्यंत त्या एका होस्टेलमधूनच अन्न संकलित व्हायचं. आता शहरातल्या अन्य होस्टेल्सची, वेगवेगळ्या कॅण्टीन्सची त्यात भर पडली आहे. शिवाय शहरात जिथेकुठे म्हणून पार्टी असेल, एखादा मोठा विवाहसोहळा आयोजित करण्यात आला असेल, तिथे चंद्रशेखर कुंडू आणि त्यांचे सहकारी हजर होतात. आयोजकांशी बोलतात. कार्यक्रमानंतर उरणार्‍या शिजवलेल्या अन्नाची मागणी करतात. म्हटलं तर हेही भीक मागणंच असतं. दरवेळीच काही स्वागतच होतं असं नाही. कित्येकदा उपेक्षा वाट्याला येते. अपमान पदरी पडतो, पण त्याची खंत बाळगायची नाही. मनाची तशी तयारी करूनच जायचं प्रत्येकाच्या दारात. मग अन्न असो वा शिव्याशाप, जे पदरी पडेल ते घेऊन बाहेर पडायचं. शिव्या, शाप, अपमान, रिक्तहस्ते होणारी बोळवण… यातलं काही असेल, तर ते स्वत:जवळ ठेवून घ्यायचं अन् अन्न मिळालं असेल तर चारचौघांत वाटून मोकळं व्हायचं, ही परिपाठी आताशा या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्याही अंगवळणी पडलेली. आणि हो! लोकही बदलताहेत बरं का आता! चांगल्या घरची तरुण पोरं, आपल्या दारात पदर पसरून उभी राहतात, ती काही स्वत:साठी नाही, हे ध्यानात आल्यावर लोक आदरानं वागू लागले आहेत. उरलेलं अन्न स्वीकारून ते गरजूंपर्यंत पोहोचविणारे कार्यकर्ते अशी ओळख निर्माण झाली आहे आता या कार्यकर्त्यांची एव्हाना.
आसनसोल! पश्‍चिम बंगालातलं एक मोठं शहर. लोकांच्या नशिबी आलेली इथली गरिबी मात्र कोलकात्याशी स्पर्धा करणारी. कधी चौकातल्या सिग्नलवर उभ्या राहणार्‍या गाड्या, झिडकारून पुढे निघून जाईपर्यंत काचेपलीकडून याचना करणारे हात, तर कधी उकिरड्यावर फेकण्यात आलेले अन्न चिवडणारी पोरं… नुसती कल्पना केली तरी त्या कल्पनेतल्या ओंगळवाण्या दृश्यानेही अंगावर सऽऽर्रकन् काटा उभा राहावा. पण, ते चित्र तर रोज प्रत्यक्षात बघायला मिळते इथे. किंबहुना त्यांच्यासाठीच सारी धडपड चालली आहे सृजनांची- वंचितांसाठीची. दिवसाकाठी निदान दीडशे-दोनशे लोक जेवू घालता येतील इतके अन्न एव्हाना रोज संकलित होते. वेगवेगळ्या ठिकाणांंहून संकलित होणारे अन्न एका केंद्रावर जमा करायचे अन् तिथनं गरजेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी वितरणासाठी न्यायचे, अशी कामाची पद्धतही प्रचलित झाली आहे. शिवाय, या चळवळीतून काही गोष्टी निश्‍चितपणे साध्य झाल्या आहेत. एकतर, कालपर्यंत उकिरड्यावर फेकलं जाणारं, जनावरांच्या पुढ्यात टाकलं जाणारं, किंबहुना वाया जाणारं अन्न, ज्यांना खरोखरीच त्याची गरज आहे, अशा ‘माणसांसाठी’ वापरलं जाऊ लागलं आहे. समर्पित भावनेनं या उपक्रमात सहभागी होणार्‍यांची संख्याही दिवसागणिक वाढते आहे. नाही म्हणायला अन्नाची नासाडीही बरीचशी नियंत्रित झाली आहे. एरवी टाकून दिले जाणारे अन्न गरजूंपर्यंत पोहोचते आहे. पार्ट्या, लग्न प्रसंगात परवा परवापर्यंत एक विदारक चित्र असायचं. आता झगमगाट, श्रीमंतीचा थाट, चमचमीत पदार्थांची रेलचेल अन् त्याच मंडपाच्या बाहेर भीक मागण्याकरिता उभी राहणारी पोरं… हे दृश्य, निदान या मर्यादित टापूत तरी आता हद्दपार होण्याच्या टप्प्यात आहे. कारण हा उपक्रम आसनसोलच्या पलीकडे दक्षिण कोलकात्यापर्यंत केव्हा पोहोचला, हे तर या कार्यकर्त्यांनाही कळलं नाही!
एका बाजूला भुकेनं व्याकुळ झालेली माणसं. वीतभर पोटाची खळगी भरण्यासाठी जिवाचा आटापिटा करणारी. त्यासाठी भीक मागायला भाग पाडणारी परिस्थिती अन् दुसरीकडे फूड कार्पोरेशच्या कोठारांच्या बाहेर आवारात पावसात सडलेले लक्षावधी टन धान्य… या प्रचंड विरोधाभासाने निर्माण केलेली कालवाकालव. त्यातून जन्म झालेल्या एका उपक्रमाचे पुढे एका चळवळीत झालेले रूपांतर… लोकांच्या वेदना अलगद टिपायला म्हणून सरसावलेल्या ओंजळींची संख्याही दिवसागणिक वाढतेय्. आणि हो! आता ही चळवळ एकट्या चंद्रशेखर कुंडूंची राहिलेली नाही. संगणकासारखा तांत्रिक विषय शिकवणारे शिक्षक आणि तो शिकणारे विद्यार्थीही त्या चळवळीचा एक भाग झाले आहेत. सभोवतालचा समाजही त्या चळवळीची व्याप्ती दिवसागणिक रुंदावण्याचा प्रयत्न करतोय्…
सुनील कुहीकर,९८८१७१७८३३