चरित्र निर्माण न भुले

0
133

होळी दोन दिवसांवर होती. एक मित्र दुसर्‍याला सांगत होता, ‘‘तू पण ये, पियेंगे, नाचेंगे, मजा करेंगे.’’ नकळत तो नव्या पिढीचा जीवनमंत्रच सांगत होता. या मंत्राचा परिणाम दाखविणारी कितीतरी उदाहरणे क्षणात डोळ्यासमोर आलीत.
मध्यंतरी एक बातमी होती. व्हलेंटाईन डे च्या दिवशी एका फ्लॅटमध्ये नाच गाण्यांचा आवाज असह्य झाल्यामुळे शेजार्‍यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी त्या सर्वांना पकडून पोलिस ठाण्यात नेले. कारण ती दारू प्यालेली होती. सर्व मुले-मुली पंधरा सोळा वर्षांची होती. सर्वांनी पार्टीकरिता पालकांना पैसे मागितले होते. मुले आता परवानगी मागत नाहीत. पार्टी आहे, पैसे द्या, असा सरळ आदेश देतात. पार्टीत काय करणार, असे आम्ही विचारू शकत नाही. तसे केले तर घरात तमाशा होणार, अशी बिचार्‍या हतबल पालकांची तक्रार होती.
एका मुलाने वडिलांजवळ मोटरसायकलची मागणी केली. ती मिळाली नाही, तर कॉलेज सोडून देण्याची धमकी दिली. वडिलांनी त्या कुुलदीपकाला सत्तर-ऐंशी हजारांची मोटरसायकल घेऊन दिली. त्यानंतर विशेष म्हणजे महाविद्यालयात हजेरी कमी असल्यामुळे त्याला परीक्षेला बसता आले नाही.
उत्तम मार्कांनी मुलगी दहावी पास झाली म्हणून वडिलांनी चौदा-पंधरा हजाराचा लेटेस्ट मोबाईल घेऊन दिला. काही दिवस आनंदात गेले. मुलगी आता मोबाईलला इतकी ऍडिक्ट झाली की सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत मोबाईल कानालाच असतो. त्याकरिता आता घरात रोज कटकटी होतात. मोबाईल तिला इतका महत्त्वाचा वाटतो की त्यासाठी आई-वडिलांनाही ती वाट्‌टेल ते बोलते. घरातल्या कोणत्याही गोष्टीकडे तिचे लक्ष नसते. तिने घरी आल्यावर दोन शब्द बोलावे म्हणून आजी, आजोबा, आई, वडील आसुसलेले असतात. पण मित्र-मैत्रिणींच्या व्हॉट्‌सअपवर पडलेल्या गराड्यातून तिला वेळच मिळत नाही.
काही दिवसांपूर्वी एका परिचितांकडे सकाळी जाण्याचा योग आला. दोघेही नोकरीचे असल्यामुळे घाईची वेळ होती. आई स्वयंपाक करत होती. वडील केर काढत होते आणि त्यांचा वीस-बावीस वर्षांचा मुलगा कानाला ईअरफोन लावून सोफासेटवर लोळत पडला होता.
विज्ञानाच्या प्रचंड प्रगतीमुळे विविध प्रकारच्या लसी माणसाने शोधून काढल्या. त्यामुळे साथीच्या रोगांवर नियंत्रण आले. पण रोगराई कमी झाली नाही. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत मोठ्या प्रमाणात जे रोग वाढले, त्यांना लाइफस्टाइल डिसीझेस म्हणतात. विशेष म्हणजे हे रोग आपण पैसा खर्च करून घरी आणतो. घरच्या जेवणाची जागा पिझ्झा, बर्गर, पास्ता, वडापाव, प्रक्रिया केलेले तयार पदार्थ यांनी घेतली, तसेच पाण्याऐवजी सॉफ्ट ड्रिंक्स, फ्रुट ड्रिंक्स आले. याचा पचनसंस्थेवर ताण पडतो आहे. रात्री उशिरापर्यंत सोशल नेटवर्किंग अपडेट करताना किती वेळ जातो, हे त्यांनाही कळत नाही. वर कामाचा ताण, स्पर्धेत टिकण्याची धडपड, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, वाढते हॉटेलिंग, व्यसने या सर्वांमुळे हार्मोन्सचे असंतुलन होत आहे. त्याचा परिणाम मूड, कार्यक्षमता व आत्मविश्‍वासावर होत आहे. या क्षेत्रातल्या तज्ज्ञ अंजली श्रोत्रिय म्हणतात, ‘‘सध्याच्या जीवनशैलीचे पर्यवसान आरोग्यमंदिरात न होता टॉवरमध्ये होतेय्. ज्याचा पाया कच्चा आणि कळसासारखी टॉवरला पॉलिश असते. विचार करावासा वाटतो ही जीवनशैली की मरणशैली.’’ नक्की आपण कोठे कमी पडतोय्?
तंत्रज्ञानात आपण प्रगती केली आहे. सुविधांच्या साधनात अमाप वाढ झाली आहे. पण अंगावर जबाबदार्‍या पडल्या की परीक्षा सुरू होते. रोज स्वयंपाकही करावा लागतो. टॉयलेटही स्वच्छ करावा लागतो, वृद्ध आई-वडिलांची किंवा सासू-सासर्‍यांची सेवाही करावी लागते. स्वातंत्र्यावर मर्यादा येतात. अनेक समस्यांवर फक्त पैशाने उत्तर शोधता येत नाही, हे लक्षात येते. मग जीवन बोअर होतं. त्यातूनच अनेक कुटुंबांत समस्या उभ्या झालेल्या दिसतात.
मुळांनाच पोषण मिळाले नाही तर वृक्ष बहरत नाही. आपली संस्कृती महान आहे, असे आपण म्हणतो. पण त्या जीवनदृष्टीचे संस्कार, त्या मूल्यांचा जीवनरस या मुळांना मिळतो का? नव्या पिढीला केवळ दोष देऊन काय उपयोग? पालक, शिक्षण व्यवस्था, सामाजिक वातावरण या सर्वांचाच गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. केवळ सत्ता आणि भौतिक विकासाच्या नादी लागून समाजाचा सांस्कृतिक विकास होत नसतो. सांस्कृतिक प्रदूषण करणार्‍या विचारांचा कचरा या होळीला जाळून नवी पालवी फुटण्याची आशा करू या.
रवींद्र देशपांडे,८८८८८०३४११