सागवान तस्करांची वनकर्मचार्‍यांवर दगडफेक

तापी नदीजवळ लाखाचे सागवान जप्त

0
83

तभा वृत्तसेवा
धारणी, १० मार्च
सागवान तस्करांना पकडण्यासाठी वनकर्मचार्‍यांनी नदीच्या पात्रात रात्र जागून काढली. आरोपी मुद्देमालासह दिसताच त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दगडफेक केल्याने ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. मात्र, एक लाखाचे सागवान वनविभागाच्या हाती लागले.
शुक्रवार १० मार्च रोजी भल्या पहाटे सहायक वनसंरक्षक कोलनकर यांच्या नेतृत्वात तापी नदीच्या किनारपट्टीवर मध्यप्रदेशातून धारणी शहराकडे येणारी एक लाख किमतीच्या चिरलेल्या सागवानाची लाकडे पकडण्याची ही कारवाई करण्यात आली. सागवानाचा हा माल आरोपींसह पकडण्यासाठी वन कर्मचारी रात्रीपासूनच नदीपात्रात तळ ठोकून होते. परंतु, नदीतील दगडांचा मारा करून वनकर्मचार्‍यांना मागे ढकलण्यात तस्करांना यश आल्याने ७-८ तस्करांना पळून जाण्याची संधी मिळाली.
पश्‍चिम मेळघाटच्या धारणी रेंजमधील खार्‍या भागाच्या मध्यप्रदेशला लागून असलेल्या घुटीघाट जवळ १० मार्चच्या पहाटे वनकर्मचार्‍यांनी ७-८ लोकांना तापी नदी ओलांडताना पकडण्याचे प्रयत्न केले; पण अंधारात दगडफेक करून डोक्यावरील चरपट, तख्ते, चौकटा फेकून आरोपी मध्यप्रदेशकडे परत पळाले. मोठ्या प्रमाणात चिरलेल्या साईजची खेप एकाच ठिकाणी धारणीत येत असल्याची माहिती धारणी रेंजर प्रशांत भुजाडे यांना प्राप्त झाल्यावर तापी नदीच्या काठी रात्री कर्मचार्‍यांनी तळ ठोकला होता. सहायक वनसंरक्षक एस. कोलनकर तथा क्षेत्रपाल भुजाडे यांच्या मार्गदर्शनात वर्तुळ अधिकारी विवेक यवतकर, वनरक्षक राजकुमार थोटे, नितीन कांबळे, सुभाष गायकवाड, मो. मुश्ताक, नितीन अहिरराव, रामनाथ धुर्वे यांनी या कारवाईत भाग घेतला.