३० किलो सालई डिंक जप्त

0
194

दोन युवकांसह दुचाकी ताब्यात
तभा वृत्तसेवा
धारणी, १० मार्च
महाराष्ट्र राज्यासह मेळघाटच्या जंगलातील सालई झाडातून डिंक काढणे प्रतिबंधित असताना स्थानिक रहिवाशांकडून मोठ्या प्रमाणात अनैसर्गिकपणे डिंक काढून झाडांना इजा पोहोचविण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे. साद्राबाडी गावाजवळ देडतलई मध्यप्रदेश मार्गावर ढाकणाचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत भुजाडे यांनी दुचाकीवर ३० किलो डिंकाची तस्करी करताना दोघांना ताब्यात घेतले आहे.
दोन दिवसापूर्वी देडतलई-झिल्पी मार्गावर दुचाकी क्र. एमपी १२ बी ७५६५ वर रमेश दारसिंबे आणि मुन्ना शेंड्या देवडे हे दोघे डिंक तस्करी करून सरळ मध्यप्रदेशात जाताना भुजाडे आणि सहकार्‍यांनी विरुद्ध दिशेने येऊन त्यांना पकडल्याने पुन्हा डिंकाची तस्करी प्रकाशात आलेली आहे. कोणाकडून डिंक खरेदी केला अथवा जंगलात प्रत्यक्षात कोणत्या इसमांनी झाडांना इजा करून डिंक काढला, हे तपासण्यासाठी सतत चौकशी सुरू ठेवण्यात आलेली आहे. बाजारात या मालाची किंमत १ लाख रुपये असून अत्यंत ज्वलनशील असलेल्या सालई डिंकापासून हवन उपयोगी राळ आणि इतर विस्फोटक वस्तू बनविण्यात येत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात बहुमूल्य असून फार मागणीचे असते. झाडांना कोरून डिंक काढण्यात येत असल्याने दोन-चार वर्षानंतर झाडे सुकून नष्ट होत असतात. यामुळे राज्य शासनाने वृक्ष तोडणे, डिंक काढण्यावर बंदी आणून सालईला शासकीय सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे.