उत्तरेत भगवी लाट; सपा, बसपासह कॉंग्रेस भुईसपाट!

0
279

सायकल पंक्चर, हत्ती थकला अन पंजा गोठला
पंतप्रधानांकडून उत्तरप्रदेशातील जनतेला धन्यवाद
मोदी लाट कायम, नोटाबंदीचा फायदा भाजपालाच
भाजपाच्या संसदीय मंडळाची आज बैठक
चार राज्यांत भाजपा सरकार स्थापन करणार?
उत्तरप्रदेश, उत्तराखंडात विकासाच्या मुद्याला प्राधान्य
अखिलेशला कुटुंबातील यादवी भोवली
मुस्लिमबहुल भागातही भाजपाने मारली मुसंडी
उत्तराखंडात भाजपाला दोनतृतीयांश बहुमत
मुख्यमंत्री हरीश रावत दोन्ही मतदारसंघात पराभूत
गोव्यात भाजपा सत्तेपासून दूर, मुख्यमंत्री पराभूत
मणिपुरात कमळ फुलले, सत्तेसाठी युती करावी लागणार
पंजाबात कॉंग्रेसला बहुमत, अकाली दल-भाजपाला नारळ

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ११ मार्च
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडात भगवी लाट आली असून, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि कॉंग्रेससह सगळे विरोधक भुईसपाट झाले आहेत. उत्तरप्रदेशात भारतीय जनता पार्टीने ४०३ पैकी ३२५ जागा जिंकून सत्ताधारी समाजवादी पार्टीची सायकल पंक्चर केली आहे, तर कॉंग्रेसचा पंजा गोठवून टाकला आहे. बसपाच्या हतीची चाल आधीच मंद झाली होती, त्या हत्तीला एकाच जागी साखळदंडाने बांधून ठेवण्यात भाजपाला यश मिळाले आहे. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल हे २०१९ साली होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर परिणाम करतील आणि त्यामुळेच ही निवडणूक म्हणजे सेमीफायनल आहे, अशी चर्चा बराच काळ केली गेली. ही सेमीफायनल भाजपाने जिंकल्याने २०१९ साली काय होणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. उत्तराखंडातही भाजपाने ७० पैकी ५७ जागा जिंकत कॉंग्रेसला चारीमुंड्या चीत केले आहे. राजकारणाच्या मैदानातील ‘मास्टरब्लास्टर’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मारलेल्या फटक्याने सगळे विरोधक घायाळ झाले असून, २०१४ ची लाट आजही कायम असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गोवा आणि मणिपूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेस यांच्यात बरोबरीची लढत झाली असली, तरी भाजपाने मिळविलेले यश लक्षणीय मानले जात आहे. पंजाबमध्ये अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेसला यश मिळाले असून, अकाली दल व भाजपाचा सफाया झाला आहे.

वनवास संपला

उत्तरप्रदेशात भाजपाने आज शनिवारी ऐतिहासिक विजय प्राप्त केला. नोटबंदीच्या निर्णयावरून विरोधकांनी टीकेची झोड उठविली असतानाही, राज्यातील सर्वसामान्य जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुशासन आणि पारदर्शक कामकाजावर विश्‍वास व्यक्त केला आणि भाजपाच्या ३२५ उमेदवारांना विजयी केले. हा विजय अभूतपूर्व तर आहेच, शिवाय भाजपाच्या भवितव्यासाठीही उत्साहवर्धक आहे.
उत्तराखंडमध्येही भाजपाने ७० पैकी ५७ जागा जिंकून स्पष्ट बहुमतापेक्षाही जास्त भरारी घेतली. तर, पंजाबमध्ये कॉंगे्रसने ११७ पैकी ७७ जागा जिंकून सत्ता हस्तगत केली. मणिपूर आणि गोव्यात कॉंगे्रस वरचढ ठरली.
उत्तरप्रदेशातील विजयासोबतच भाजपा तब्बल १४ वर्षानंतर या राज्यात स्वबळावर सत्तेत आली आहे. एकूणच, भाजपाचा १४ वर्षांचा वनवास आज संपला. या १४ वर्षांच्या काळात बसपा आणि सपा या दोनच पक्षांनी सत्ता गाजवली.
आज शनिवारी, मतमोजणीच्या अगदी सुरुवातीपासूनच भाजपाने उत्तरप्रदेशात आघाडी घेतली होती. अवघ्या दोन तासांतच भाजपाने बहुमताचा २०२ चा आकडा पार केला होता. त्यानंतर भाजपाची आगेकूच सातत्याने सुरू होती. उत्तरप्रदेशातील या ऐतिहासिक विजयामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, उत्तरप्रदेश आणि राजधानी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयापुढे फटाक्यांच्या आतषबाजीसह गुलालाची जोरदार उधळण करण्यात आली. उत्तराखंडमध्येही भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. देशभरातच मिठाई वाटून भाजपा कार्यकर्त्यांनी या विजयावर आनंद व्यक्त केला.
उत्तरप्रदेश
४०३ सदस्यीय उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने ३२४ जागा जिंकल्या असून, स्पष्ट बहुमतासह पुन्हा सत्तेत येण्याचा दावा करणार्‍या सपा आघाडीला केवळ ५५ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. तर, दलितांवरील अन्यायाचा मुद्दा उपस्थित करून, आपणच सत्तेत येऊ, असा दावा करणार्‍या मायावती यांच्या बसपाला अवघ्या १९ जागाच मिळाल्या. अपक्ष व इतर लहान पक्षांना फक्त पाच जागा मिळाल्या.
उत्तराखंड
७० सदस्यीय उत्तराखंड विधानसभेत भाजपाने ५७ जागा जिंकत दणदणीत यश प्राप्त केले. गेल्या पाच वर्षांपासून सत्तेत असलेल्या आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांत अडकलेल्या कॉंगे्रसला ११ जागा मिळाल्या. इतरांना दोन जागा मिळाल्या. विशेष म्हणजे, दोन मतदारसंघातून निवडणूक लढविणारे मुख्यमंत्री हरीश रावत यांना दोन्ही जागांवर पराभव पत्करावा लागला.
गोवा
४० सदस्यीय गोवा विधानसभेत सत्तेत असलेल्या भाजपाची पिछेहाट झाली आहे. भाजपाला केवळ १३ जागांवर विजय मिळाला असून, कॉंगे्रसने १७ जागा जिंकल्या आहेत. इतर लहान प्रादेशिक पक्षांना ७ जागा मिळाल्या आहेत. तीन अपक्ष उमेदवारही विजयी झाले. लहान पक्षांच्या मदतीने कॉंगे्रस पक्ष सरकार स्थापन करण्याची शक्यता बळावली आहे. गोव्यात आम आदमी पार्टीच सत्तेत येणार, असा वारंवार दावा करणार्‍या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला येथे भोपळाही फोडता आला नाही.
पंजाब
११७ सदस्यीय पंजाब विधानसभेत गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिरोमणी अकाली दल-भाजपा युतीला यावेळी मोठा धक्का बसला आहे. कॉंगे्रसने ७७ जागांवर दणदणीत विजय मिळविताना पंजाबची सत्ता खेचून आणली आहे. अकाली दल-भाजपा युतीला १८ जागा मिळाल्या. पंजाब आपलेच, अशा भ्रमात वावरणार्‍या आम आदमी पार्टीला केवळ २० जागांवरच समाधान मानावे लागले आहे. एकूणच, पंजाब आणि गोव्यात आम आदमी पार्टीच्या सत्तेच्या स्वप्नांचा मतदारांनी पार चुराडा केला.
मणिपूर
६० सदस्यीय मणिपूर विधानसभेत कॉंगे्रस आणि भाजपात काट्याची टक्कर झाली. या राज्यात कॉंगे्रसने २७ जागांवर, तर भाजपाने २२ जागांवर विजय मिळविला आहे. एनपीएफ या प्रादेशिक पक्षाने चार जागा जिंकल्या असून, अपक्ष व इतरांना सात जागा मिळाल्या आहेत. या राज्यातही कॉंगे्रस पक्ष इतरांना हाताशी घेऊन सरकार स्थापन करण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
त्रिकोणी संघर्षात भाजपाची मुसंडी
उत्तरप्रदेशात भाजपा, सपा-कॉंगे्रस आघाडी आणि बसपा असा त्रिकोणी संघर्ष होता. २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीचे भवितव्यही अवलंबून होते. त्यामुळे भाजपाने विशेषत: पंतप्रधान मोदी यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. गेल्या दीड वर्षांपासूनच यासाठी ठोस रणनीती तयार करण्यात आली आणि ती यशस्वी ठरली. आजवरच्या इतिहासात कोणत्याही राजकीय पक्षाला इतक्या जागा मिळाल्या नसतील, तितक्या जागा भाजपाला मिळाल्या. ४०३ पैकी ३२४ जागांवर भाजपाने दणदणीत विजय मिळविला. कॉंगे्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत हात मिळविल्यानंतर ‘युपी को ये साथ पसंद है’ अशी घोषणा देणार्‍या अखिलेश व राहुल यांच्या तरुण जोडीला मतदारांनी साफ नाकारले. तर, २००७ च्या निवडणुकीत राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करणार्‍या मायावती यांच्या बसपावा केवळ १९ जागांवर समाधान मानावे लागले. एकमेकांवर प्रखर टीका करणार्‍या आणि सत्तेसाठी एकत्र येणार्‍या अखिलेश आणि राहुल यांना सपशेल नाकारून, उत्तरप्रदेशच्या जनतेने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वावर आपल्या पसंतीची मोहर उमटवली.
चारही प्रदेश भगवामय
पश्‍चिम उत्तरप्रदेश, मध्य उत्तरप्रदेश, बुंदेलखंड व पूर्वांचल अशा चारही भागांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली. विशेष म्हणजे, पश्‍चिम उत्तरप्रदेशच्या मुस्लिमबहुल मतदारसंघातही भाजपाचा भगवा डौलाने फडकला. नोटबंदीच्या निर्णयाचेही प्रत्यक्षात निकालावर परिणाम झाला नसल्याचे या निवडणुकीत पाहायला मिळाले.
पंतप्रधान मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथसिंह, उमा भारती, प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य, खा. योगी आदित्यनाथ अशा मोजक्या स्टार प्रचारकांवर भाजपाच्या प्रचाराची धुरा होती आणि ती त्यांनी यशस्वीपणे पेलली.
भाजपाने या निवडणुकीत ‘अपना दल’सारख्या सहकारी पक्षांना सोबत घेऊन सर्व ४०३ जागांवर निवडणूक लढवली. अमित शाह यांनी ३०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्‍चित केले होते. ते लक्ष्य भाजपाने अतिशय सहजपणे पार केले.