भाजपायुक्त भारत…!

0
326

विशेष संपादकीय

अंदाजांना भोवळ आणत आणि अपेक्षांना गवसणी घालत भाजपाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ‘मोदीत्व’ आणखी एकदा सिद्ध केले आहे. आता खर्‍या अर्थाने ‘कॉंग्रेसमुक्त भारत’ या संकल्पनेपेक्षा ‘भाजपायुक्त भारत’ या संकल्पनेकडे देश वाटचाल करू लागला आहे. कौतुक आणि अभिनंदनाच्या पलीकडे यश हेच भाजपाचे आता वास्तव होऊ लागले आहे, हे मोदींच्या नेतृत्वात सत्तेत आलेल्या भाजपाने अधिष्ठित केले आहे. एक्झिट पोलच्या अंदाजांना हुलकावणी देणे, ही मोदी आणि शाह यांच्या जोडीची सवय झालेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून याची सुरुवात झाली. त्यानंतर मोदी- निवडणुका आणि यश हे समीकरणच झाले आहे. गेल्या अडीच-पावणेतीन वर्षांत सत्तेत आलेली भाजपा जनसमर्थनाची परीक्षा अनेक पातळ्यांवर देत आहे. मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेताना म्हटले होते की, आम्ही दरवर्षी आमच्या कामाचा ताळेबंद मांडू. हे वचन त्यांनी देशाला दिले होते पण, देशाच्या अगदी कानाकोपर्‍यात त्यांनी सरकारची विश्‍वासार्हता वारंवार आणि अनेक पातळ्यांवर सिद्ध केली आहे. भाजपा सत्तेत आल्यापासून जवळपास १३ राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. पैकी १० राज्यांत भाजपाने निर्भेळ असे यश मिळविले आहे. जम्मू- काश्मीरपासून आसाम, मणिपूरपर्यंत जनतेने मोदींच्या नेतृत्वावर निव्वळ विश्‍वासच नव्हे, तर श्रद्धा दाखविली आहे. निवडणुका जिंकण्याचे आपले एक तंत्र असते, असे मानणारा एक वर्ग आहे. उत्तर प्रदेशात तंत्राचे माप ओलांडून अभिमंत्रित केलेला दिग्विजयच भारतीय जनता पार्टीने सिद्ध करून दाखविला आहे. आता झालेल्या पाचपैकी उत्तर प्रदेशवर सार्‍या देशाचेच नव्हे, तर जगाचे लक्ष लागले होते. जगातल्या अतिविशाल लोकशाही देशात निवडणुका कशा पार पाडल्या जातात, याचा अभ्यास करण्याची संधी म्हणून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचे अवलोकन करायला फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीच्या विद्यापीठातूृन अभ्यासकांच्या चमू आल्या होत्या. अर्थ आणि बाहुबळाच्या भरोशावरच भारतात निवडणुका लढल्या जातात, असा (गैर)समज असलेल्या या परदेशी पाहुण्यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केलेले नियोजन आणि त्याची होणारी तंतोतंत अंमलबजावणी आणि त्यातील संयमी विवेकवाद बघितल्यावर पुढारलेपणाच्या आपल्या संकल्पना किती मागास आहेत, हे किमान मनोमन मान्य करीत अमित शाह यांना निवडणुकांचे ‘व्यवस्थापकीय गुरू’ ही पदवी बहाल केली. आता विरोधकांचे कण्हणे सुरू झाले आहे. खरेतर त्यांनी या अपयशाच्या दुखण्यावर देशी इलाज करायला हवेत. चिंतनाची आंबेहळद लावायला हवे. चुका मान्य करण्याचा शेक घ्यायला हवा, मात्र आताही ते दुगाण्या झाडण्याच्या पेनकिलर्स घेऊन तात्पुरता आराम घेऊ पाहात आहेत. आपल्या पराभवाचे खापर ते इव्हीएम मशिनवर फोडत आहेत. यंत्र निर्जीव असतात मात्र, ते हाताळणारी माणसं जिवंत असतात. यंत्रांना जाणिवा असण्याचे काही कारण नाही पण, माणसांच्या जाणिवा समजून घेण्याची आपली कुवत संपलेली आहे, हे विरोधकांना कळत नाही, हे या देशाचे दु:ख आहे. सक्षम सत्ताधारी लोकशाहीच्या प्रकटीकरणासाठी जितके आवश्यक असतात तितकेच बुद्धीनिष्ठ, विवेकी आणि प्रबळ विरोधकही प्रजातंत्राच्या सुदृढ वाटचालीसाठी गरजेचे असतात. या देशाचे वर्तमान वास्तव हे सक्षम सत्ताधार्‍यांच्या एकाच बाजूने भक्कम आहे. दुसरी बाजू मात्र लंगडी आहे, हे दुर्दैव आहे. ते अजूनही यंत्रातच ठोके शोधत आहेत. या देशातील सामान्य माणसांची नाडी नेमकेपणाने मोदींनी पकडली आहे, हे त्यांना दिसत नाही. म्हणून मायावती यांच्यासारख्या कधीकाळच्या मुख्यमंत्रीदेखील लोकसभेच्या निवडणुकीत भोपळा भेटल्यावरही ताळ्यावर येत नाहीत. यंत्रामुळे आपण हरलो, असेच त्यांना वाटते हे हास्यास्पदच नाही तर करुण, दुर्दैवी आहे. गेली २० वर्षे उत्तरप्रदेशात बसपा आणि समाजवादी पार्टीची सरकारं सत्तेत आली. या दोन्ही पक्षांच्या सरकारांनी प्रदेशाचा विकास करण्याऐवजी स्वत:चाच विकास केला, जनतेच्या प्रश्‍नांकडे कायम दुलंक्ष केले. दोन्ही पक्षांच्या राजवटीत प्रदेशात कायदा-सुव्यवस्था स्थिती ढासळली, दिवसाउजेडी खून पडू लागले, खंडण्या मागितल्या जाऊ लागल्या, अपहरण होऊ लागले. लोक या सगळ्याला कंटाळले होते. ते पर्यायाच्या शोधात होते. लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने पर्याय शोधल्यानंतरही समाजवादी वा बसपावाले जागे झाले नाहीत. त्यांनी झोपेचे सोंग घेतले होते अन मोदींनी त्यांना झोपेची गोळी दिली होती. जनतेच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज घेण्यात सपा, बसपा आणि कॉंग्रेस अपयशी ठरलेत. परिणाम देशासमोर आहेत. मोदींकडून जनतेला आशा आहेत, अपेक्षाही आहेत. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी निश्‍चित पूर्ण करतील, याची खात्री वाटते.