योग्य प्रमाणातील ताण फायदेशीर

0
98

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १ मार्च
आजकाल ताण-तणाव कमी करायला हे करा, हे करू नका, ताण-तणाव टाळायचे विविध उपाय, ताणविरहित जीवन… असे शब्द वारंवार कानावर पडत असतात आणि ताण नाहीसा करण्याची हमी देणार्‍या ऑनलाईन पोस्ट्सकडे किंवा उत्पादनांवर सगळ्यांच्या उड्या पडतात. दिवसेंदिवस धकाधकीच्या होत जाणार्‍या जीवनात, असे साहजिक आहे. ताणापासून मुक्ती मिळवू पाहणारे आपण सर्वजण हे करून काहीच चुकीचे करीत नाही. पण, योग्य प्रमाणात ताण असेल तर त्याचे फायदेही असतात.
कोणतेही संकट आपल्यासमोर आले की, आपल्यापुढे दोन पर्याय असतात. एकतर त्या संकटांशी लढणे किंवा आपल्याच फायद्यासाठी तात्पुरती माघार घेत पलायन करणे. म्हणजे जंगलात वाघ समोर आल्यावर त्याच्याशी नि:शस्त्ररीत्या मुकाबला करणे हा निश्‍चितच चांगला पर्याय ठरणार नाही. त्या वेळी पोबारा केलेलाच बरा!
पण आपल्यासमोर संकट आले आहे याची तरी आपल्या मनात नोंद व्हायला हवी ना! संकटाची जाणीवच झाली नाही, तर त्यापुढची पावले आपण उचलणार तरी कशी? योग्य प्रमाणात असलेला ताण, अशा वेळी महत्त्वाचा ठरतो. ताणाचे फायदे
योग्य प्रमाणात ताण असला, तर आपल्याला परिस्थितीचा योग्य अंदाज घेणे शक्य होते. या वेळी समोरच्या संकटावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. आपले लक्ष केंद्रित होण्याकरिता उपयुक्त, अशा रसायनांच्या निर्मितीप्रक्रियेचा वेग आपल्या मेंदूमध्ये या वेळी वाढतो.
योग्य प्रमाणात आणि सांभाळता येईल असा ताण असला की, त्याचा आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही चांगला परिणाम होतो. आपल्यासमोर एखादे संकट किंवा परिस्थिती उभी येऊन ठाकल्यावर, आपले शरीर लढण्याच्या मार्गावर उभे ठाकते. अशा वेळी आपली रोगप्रतिकारक शक्तीही तात्पुरती का होईना पण आणखी सक्षम होते.
ताणाखाली राहून त्याचा चांगला मुकाबला केल्याने आपले शरीर आणि मन या दोहोंना त्याचा फायदा होतो.
ऑफिसमध्ये एखादी डेडलाईन जवळ येत असेल तर त्या वेळी आपल्या मनात काय भावना असतात हे आठवा आणि आपण त्या नकारात्मक भावनांवर मात करीत ती डेडलाईन गाठली की मनात भरून राहिलेले समाधान आठवा! ताणाशी योग्य प्रकारे झुंजायची सवय आपल्याला हितकारकच ठरते.
विनाकारण ताणामुळे आपली नकारात्मकता वाढू शकते. प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आपण इतरांना न सुचलेला एखादा नवा मार्ग शोधून काढतो आणि त्यामुळे त्या समस्येवरचा एक नवीन उपाय मिळतो, हे विशेष.
ताण योग्य प्रमाणात असेल, तरच तो फायदेशीर असतो. प्रत्येकाची ताण सहन करण्याची क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे आपल्यावर असलेल्या ताणाचे योग्य नियमन करणे महत्त्वाचे ठरते व जर आपल्या सहन करण्याच्या मर्यादेपलीकडे ताण जाणवत असेल, तर वैद्यकीय सल्ला घेणेही अतिशय निकडीचे असते.