ही तर २०१९ च्या विजयाची नांदीच!

0
84

संपूर्ण देशाचे लक्ष ज्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे लागले होते, तो निकाल एकदाचा घोषित झाला आणि राज्याच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व असे मतदान करून सर्वांना योग्य तो संदेश दिला. धर्म आणि जातिपातीच्याच जोखडात स्वातंत्र्यापासून बंदिस्त करून ठेवलेल्या उत्तरप्रदेशच्या जनतेने यावेळी दाखवून दिले की, आता लोक धर्म आणि जातिपातीच्या राजकारणाला कंटाळले आहेत. त्यांना विकास हवा आहे, रोजगार हवा आहे, आपल्या मुलाबाळांना चांगले शिक्षण हवे आहे, आरोग्याच्या सोयी हव्या आहेत, राहण्यासाठी छोटेसे का होईना, स्वत:चे घर हवे आहे… म्हणूनच त्यांनी जातिपातीच्या आणि धर्माच्या राजकारणाला तिलांजली देत, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्‍वास दाखविला. पण, या विश्‍वासाला सार्थकी लावण्यासाठी भाजपाच्या व्यूहरचनेचा आणि संघटनेचाही तेवढाच वाटा आहे, हे नजरेआड करून चालणार नाही. ज्याचे श्रेय भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही द्यावेच लागेल.
आपण आठवा, ज्या वेळी भाजपाने उमेदवारांची यादी प्रकाशित केली, त्या वेळी भाजपाच्या अनेक असंतुष्टांनी खूपच अकांडतांडव केले होते. पण, अमित शहा यांनी उत्तरप्रदेशातील बदलत्या स्थितीचा अगदी बारीकसारीक अभ्यास करून अमुक मतदारसंघात कोणता उमेदवार मजबूत ठरेल, याचा सखोल अभ्यास करूनच तिकीटवाटप केले. त्यानंतर हा असंतोष दूर करण्यासाठी सर्व बंडखोरांना शांत करण्याची जबाबदारी अमित शहा यांच्यासोबतच राज्यातील सर्व नेत्यांवर सोपविण्यात आली. हा प्रयोग किती फायद्याचा ठरला, हे निकालानंतर दिसून आले. तिकडे समाजवादी पक्षात ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘यादवी’ने उग्र रूप धारण केले. याचा प्रभाव कितीतरी दिवस जाणवत राहिला. मुख्यमंत्री अखिलेशने, आपले पिता मुलायमसिंह यादव यांना दूर सारले. सोबतच काका शिवपाल यादव यांनाही खड्यासारखे बाजूला केले. रामगोपाल यांना हाताशी धरले. पण, रामगोपाल यांची राज्यावर पकडच नव्हती. ही यादवी भडकत असतानाच, अखिलेशने कॉंग्रेससोबत युती करण्याची सर्वात मोठी चूक केली. मुलायम, शिवपाल यांचा या युतीला तीव्र विरोध असतानाही, अखिलेशने आपला अट्‌टहास कायम ठेवला. हे कमी होते की काय, अखिलेशने कॉंग्रेसला शंभरावर जागा दिल्या. यामुळे आगीत तेल ओतण्याचे काम झाले. शिवपाल यादव यांनी आपल्या लोकांना कॉंग्रेसविरुद्ध अर्ज भरण्यास सांगितले. त्यामुळे तर गोंधळात अधिकच भर पडली. समाजवादी पक्षात कधी नव्हे एवढे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. अगदी अखेरच्या टप्प्यापर्यंत मुलायम कॉंग्रेससोबत युती करण्यास आपला विरोध दर्शवीतच राहिले.
तिकडे बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा बहेन मायावती- ‘दलित की बेटी’ने दिल्लीच्या जामा मशिदीच्या इमामाची मनधरणी करून त्यांना आपल्या बाजूने वळवून घेतले. जामा मशिदीच्या इमामाला कवडीची किंमत नाही, हे माहीत असतानाही मायावतींनी केवळ दलित-मुस्लिम हे राजकारण खेळले. ही खेळी जशी मुस्लिमांना आवडली नाही तशीच ती दलितांनाही आवडली नाही. एकीकडे मायावती थेट धर्म आणि जातीच्या नावावर राजकारण खेळल्या, तर दुसरीकडे समाजवादी पक्षातील यादवी थांबण्याचे नाव घेत नव्हती. धर्म आणि जातीच्या नावावर समाजवादी आणि बसपा हे दोघेही डाव खेळतानाचे चित्र मतदारांना आवडले नाही. ही सर्व स्थिती चाणाक्ष अमित शहा यांच्या नजरेतून सुटती तरच नवल. त्यांनी या सर्व स्थितीचा योग्य लाभ उठवून आपली सर्व टीम उत्तरप्रदेशात कामाला लावली. एकीकडे टीमचे कप्तान पंतप्रधान मोदी हे पायाला भिंगरी लावल्यागत सभांवर सभा घेत होते, तर दुसरीकडे स्वत: अमित शहा, राजनाथसिंह, नितीन गडकरी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री प्रचाराची आघाडी सांभाळत होते. स्वत: राजनाथसिंह यांनी राज्यात १३१ सभा घेतल्या. मोदींनी आपल्या भाषणातून समाजवादी आणि बसपाच्या घृणित, गुन्हेगारीच्या राजकारणावर टीका करतानाच, विकासावर सर्वाधिक भर दिला. मतदारांच्या मनात एक विश्‍वास निर्माण केला. मतदारांनी सपा आणि बसपाला दूर सारून भाजपाच्या पारड्यात भरभरून मते टाकली. या निकालांचे वैशिष्ट्य म्हणजे, यावेळी भाजपाला समाजाच्या सर्वच घटकांनी सहकार्य केले. त्यात मुस्लिम बंधू-भगिनींचाही मोठा सहभाग राहिला.
निवडणूक प्रचारात मोदी आणि अमित शहा यांनी तिहेरी तलाकच्या मुद्यावर मुस्लिम महिलांना कायद्यानुसार संपूर्ण अधिकार देण्याचे आश्‍वासन दिले आणि त्याचा मोठा लाभ भाजपाला झाला. बुरख्यातील मुस्लिम महिला कुणाला मत देणार याबाबत वाहिन्यासुद्धा निश्‍चित सांगू शकल्या नव्हत्या. पण, या महिलांनी भाजपाला साथ दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. या निवडणूक प्रचारात राममंदिराचा मुद्दा भाजपाच्या अजेंड्यावर नव्हता तर विकासाचा मुद्दा होता. पण, वाराणसीच्या भाजपा कार्यालयात मुस्लिम बांधवांनी राममंदिराच्या समर्थनार्थ नारे लावले. यावरून राममंदिराभोवती फिरणारे गलिच्छ राजकारण एकदा संपून मंदिराचा मार्ग मोकळा व्हावा आणि विकासाची वाट खुली व्हावी, अशीच भावना मुस्लिमांमध्ये दिसली. तिकडे सर्व विरोधक, भाजपाला- सांप्रदायिक पक्षाला- मते देऊ नका, अशीच टीका करीत राहिले. अखिलेशने या निवडणुकीत नोटबंदीचा मुद्दा वारंवार उपस्थित करून पाहिला. पण, त्याला मतदारांनी भीक घातली नाही. यावरून मोदींच्या नोटबंदीचे राज्याच्या जनतेने समर्थन केल्याचेच दिसून येते. समाजवादी पक्षाकडे अखिलेशच्या रूपाने नव्या दमाचा चेहरा होता. सोबत कॉंग्रेसचे राहुल गांधी यांचाही चेहरा होता. त्यांच्या सभांना गर्दीही खूप होत होती. भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा दिला नव्हता, तरीही जनतेने मोदींवर विश्‍वास ठेवून भाजपालाच मते दिली. ही एक लक्षणीय बाब या निवडणुकीत खास नमूद करावीशी वाटते. मतदारांच्या मनात मोदींनी भाजपाच्या विकासाच्या अजेंड्याबद्दल जो विश्‍वास निर्माण झाला त्याचे प्रतिबिंब निकालातून दिसले. मोदींच्या सभांना झालेली हजारोंची गर्दी पाहता, पुन्हा लोकसभेसारखीच लाट उत्तरप्रदेशात आली की काय, असे वातावरण निर्माण झाले. जनतेने ती लाट खरी ठरविली. या निवडणुकीत सर्वाधिक पीछेहाट कॉंग्रेसची झाली. २०१२ मध्ये असलेल्या २८ जागांवरून कॉंग्रेस कशाबशा १० जागा मिळवू शकली. राहुलचा करिष्मा येथे फोल ठरला. कॉंग्रेसचे नेते शकील अहमद म्हणाले, ‘‘समाजवादी पक्षासोबत युती करावी की नाही, याबाबत पक्षातील अनेक नेत्यांत मतभेद होते. २० वर्षांपासून आम्ही उत्तरप्रदेशात सत्तेवर नव्हतो. पण, मोदींना रोखण्यासाठी आम्ही ही युती केली. मतदारांनी जो कौल दिला त्याचा आम्ही आदर करतो.’’
या निकालानंतर मायावतींनी, संपूर्ण निवडणूकच पुन्हा कागदी मतपत्रिकेने घ्याव्यात, अशी मागणी करून आपल्या बालिशपणाचे दर्शन घडविले. मग पंजाबातही निवडणूक पुन्हा घ्यायची का? पराभव पचविण्याचीही ताकद राजकारण्यांमध्ये असली पाहिजे. पण, आपल्या पराभवाचे खापर त्यांनी भाजपा आणि निवडणूक आयोगावर फोडले. निकालानंतर शिवपाल यादव यांनी, ‘‘हा पराभव अखिलेशच्या अहंकाराचा पराभव आहे. त्यांनी पित्याला दूर सारून मुलायमसिंह यांचा अपमान केला. हा अपमान मतदारांना मुळीच रुचला नाही. आतातरी यापासून अखिलेशने धडा घेतला पाहिजे,’’ अशी पहिली प्रतिक्रिया दिली. तिकडे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तर बॉम्बच फोडला! ‘‘२०१९ ची निवडणूक विसरून जा, आतापासूनच २०२४ च्या तयारीला लागा!’’ असा सल्लाच त्यांनी देऊन टाकला. यामागील कारण नमूद करताना अब्दुल्ला म्हणाले, ‘‘देशात आणि राज्यांमध्येसुद्धा मोदींच्या तोडीचा एकही नेता कोणत्याही पक्षाकडे नाही. मोदींना केवळ केंद्रानेच नव्हे, तर राज्यांनीही स्वीकारले आहे, याची जाण ठेवा.’’ उत्तरप्रदेशात भाजपाला जे अभूतपूर्व यश मिळाले, त्यामुळे आता भाजपावरची जबाबदारी शतपटीने वाढली आहे. जनतेला दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करण्याचे काम आता येत्या पाच वर्षांत झाले पाहिजे. मुस्लिम महिलांना त्यांचे समान अधिकार मिळाले पाहिजेत. असे झाले तर आणखी २० वर्षे तरी भाजपाला कुणी धक्का लावू शकणार नाही!
उत्तरप्रदेशापासून विलग झालेल्या उत्तराखंडमध्येही भाजपाने अशी काही मुसंडी मारली की, उत्तरप्रदेशसारखेच दोनतृतीयांश बहुमत तेथेही मिळाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री हरीश रावत हे दोन मतदारसंघांतून उभे होते. पण, या दोन्ही ठिकाणी त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. उत्तराखंडमध्ये नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने रस्त्यांची खूप कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी बदरीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारधाम यात्रेकरूंसाठी चौपदरी रस्ता बांधण्याचे महत्त्वाकांक्षी कार्य हाती घेण्यात आले आहे. यावर ११ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. या मार्गामुळे, मार्गात येणार्‍या अनेक शहरे व गावांतील नागरिकांना मोठा रोजगारही मिळणार आहे. या मार्गामुळे उत्तराखंडची जनता भाजपावर खुष दिसली. शिवाय मानस सरोवरपर्यंतही चौपदरी रस्ता बांधण्यात येणार आहे. येथेही मतदारांनी विकासाला केंद्रस्थानी ठेवून भाजपाला मतदान केले.
पंजाबात भाजपाने आधीच आस सोडली होती. अकाली दलाविरुद्धचा प्रचंड असंतोष, मादक द्रव्यांचा सुळसुळाट, भ्रष्टाचार, मजिठीयाची दादागिरी यामुळे अकालींना धडा शिकविण्याचा निर्धार आधीच पंजाबच्या जनतेने केला होता. त्यांच्यापुढे दोन पर्याय होते. एक कॉंग्रेस व दुसरा आम आदमी पक्ष. पण, केजरीवालांची मुख्यमंत्री बनण्याची मनीषा, पैसे देऊन तिकीटवाटप, खा. भगवंत मान यांचे भरसभेत दारू पिऊन बरळणे यामुळे मतदारांनी आपला त्याची जागा दाखवून दिली. आम्हाला शीख व्यक्तीच मुख्यमंत्रिपदी हवी, अशी मागणी जनतेने केली. आपजवळ चेहरा नव्हता. कॉंग्रेसजवळ अमरिंदरसिंग हा चांगला चेहरा होता व त्यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून आधीच घोषित करण्यात आले होते. सोबत भाजपातून निघालेले नवज्योतसिंग सिद्धू हेही कॉंग्रेसमध्ये गेले. त्याचाही लाभ कॉंग्रेसला मिळाला. अकाली-भाजपा युतीला दारुण पराभव पाहावा लागला. पंजाबात अकालींसोबत युती नसती, तर भाजपाचे चित्र वेगळे दिसले असते. आता भाजपाला या युतीबद्दल विचार करावाच लागणार आहे. पंजाबमधील विजयाचे श्रेय कॉंग्रेस नेत्यांनी राहुल गांधींना दिले आहे. पण, यात तथ्य नाही. अमरिंदरसिंग यांच्यामुळेच पंजाबात कॉंग्रेसचा विजय झाला, ही वस्तुस्थिती आहे.
मणिपूरमधील स्थिती सध्या त्रिशंकू आहे. तेथे सत्तेची चाबी स्थानिक पक्षांच्या हाती राहणार आहे. पण, पहिल्यांदाच मणिपूरमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. २०१२ च्या निवडणुकीत भाजपाला एकही जागा मिळाली नव्हती. पण, यावेळी मात्र भाजपाचे सरकार येण्याची शक्यता राजकीय पंडितांकडून वर्तविली जात आहे. पूर्वांचलातील राज्यांचा इतिहास पाहता, जो पक्ष केंद्रात सत्तेत असेल, त्याच पक्षाला लोक पसंत करतात. कारण, या राज्यांना सर्व मदत ही केंद्राकडून येत असते. त्यामुळे छोटे पक्ष भाजपालाच सत्तास्थापनेसाठी मदत करतील, असे जाणकारांचे मत आहे. या निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागलेल्या शर्मिला इरोम यांचा पराभव तर झालाच, पण त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले! त्यामुळे त्यांनी अगदी निराश होऊन राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घोषित केला आहे. गोव्यात भाजपाचे सरकार येते की कॉंग्रेसचे, याकडे दोन्ही पक्षांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत भाजपाचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे पराभूत झाले आहेत. येथे दोन्ही पक्षात सत्तास्थापनेसाठी चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
एकूणच, या पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचे दूरगामी परिणाम होणार आहेत. धर्म आणि जातीच्या नावावर खेळले जाणारे राजकारण आता बंद करावे लागेल. विकासाची कास धरावी लागेल. देशाची एकता आणि अखंडतेला प्राधान्य देणारा पक्षच यापुढे तरणार आहे. उत्तरप्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. येथे विधानसभेच्या ४०२ जागा आहेत. त्यापैकी भाजपाला ३२० जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्यसभेत भाजपाला आपली संख्या वाढविण्यास मोठी मदत होणार आहे. शिवाय उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाबातील विधानसभा सदस्यांचीही संख्या वाढविण्यात भर पडणार आहे. सोबतच आगामी राष्ट्रपती निवडणुकीत भाजपाच्या पसंतीचा उमेदवार निवडण्याची संधी भाजपाकडे असणार आहे. सध्या भाजपाकडे १५ राज्यांमध्ये स्वत:च्या पक्षाची अथवा मित्रपक्षांची मिळून सत्ता आहे. यात गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आसाम, हरयाणा, राजस्थान या मोठ्या राज्यांसह झारखंड,
अरुणाचल प्रदेश या राज्यांचा समावेश असून, आता त्यात उत्तरप्रदेश व उत्तराखंडची भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जनतेत दिवसेंदिवस विश्‍वास निर्माण होत चालला आहे. ‘शतप्रतिशत भाजपा’च्या दिशेने घोडदौड सुरूच आहे…
बबन वाळके,९८८१७१७८२१