समुद्र

0
133

रंगभूमीवरून…

प्रस्तावना
या भूतलावरील मानवी जीवनाचा काहीच थांगपत्ता लागत नाही त्यामुळे माणसाला संपूर्णपणे ओळखणं वा जाणून घेणं केवळ अशक्य होय! वर्षांनुवर्षे एकत्र आयुष्य घालवूनही माणसं एकमेकांना ओळखू शकत नाहीत, समजू शकत नाहीत हेच कदाचित मानवी नातेसंबंधात होणार्‍या गुंतागुंतीचे मूळ असू शकते! मी ‘त्याला चांगला ओळखतो’ असा दावा करणारी व्यक्ती ‘हमखास तोंडघशी पडते’ हा बहुतेक जणांचा अनुभव ऐकिवात आहे. खरंतर आपण तरी पूर्णत: स्वत:ला ओळखतो का? हाच मोठा प्रश्‍न असून यातच याचं गमक दडलेलं आहे. मग इतरांच्या आपसी नात्यांचा लेखाजोगा मांडण्यात हशील ते काय? यातील एकाच, ‘पतिपत्नी’ या नात्यामध्ये एकुणात सर्व मानवी नात्यांचा सार आढळतो. त्यानुसार समज, गैरसमज, राग, लोभ, बरोबरी, तुलना, असूया, हेवेदावे, अशी मानवी नात्यातील समस्त प्रकारांची सरमिसळ होऊन पर्यायाने होणारी गुंतागुंत अटळ असते. ज्याने या नात्याची गोम समजून, उमजून आत्मसात केली, त्याची गोडी चाखली, जोपासली, तो या समाजातील ‘सर्वसंमत व सर्वप्रिय’ व्यक्ती म्हणुन गणला जाऊ शकतो! या नात्याचा पाया ‘विश्‍वास, पारदर्शकता, प्रेम व वचनबद्धता’ या मूळ चार स्तंभांवर आधारित असतो त्यामुळे यातील एकजरी स्तंभ डगमगला तर संसाराचा डोलारा कोसळायला सुरुवात होते. माणसाचा मुलत:च स्वभाव चंचल असल्याने त्याच्या मनातील गुंतागुंत व द्वंद्व ना कधी त्याला स्वत:ला ना त्याच्या भोवताली वावरणार्‍या व्यक्तींना उमजलेलं आहे. म्हणूनच मानवी संबंधातील पेच, गुंतागुंत व पर्यायाने समस्या अटळ आहेत. आता खरं खोटं परमेश्‍वरच जाणो परंतु मानवाने ‘सुखी, समाधानी व आनंदी’ असल्याचा ‘दावा व दिखावा’ कितीही केला तरीही कुठेतरी पाणी मुरतच असल्याने तो सपशेल फोल ठरतो.
धाडसी संकल्पना
सध्याच्या युगात माणसाने प्रगती केल्याचे दावे सर्वत्र केले जातात, चांगली गोष्ट आहे! संसारिक, आर्थिक व सामाजिक प्रगतीच्या वाटचालीचे गोडवे व प्राप्त मुक्त जीवन प्रणालीचे पोवाडे कितीही ऐकवले तरीही मूळ मानवी संबंधातील गुंतागुंतीने माणसाला आतून पोखरले आहे व त्याची शिकारच केली आहे, हे सत्य नाकारताच येणार नाही. अर्थात माणसाच्या जीवनातील या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर खुली चर्चा वा मुक्त आचारविचारांचे आदानप्रदान झाल्याचे केवळ अभावानेच आढळते, ही शोकांतिकाच होय. परंतु लेखक मिलिंद बोकील यांनी त्यांच्या ‘समुद्र’ या कादंबरीच्या माध्यमाने प्रथमच व उघडपणे या विषयाला विस्तृतपणे मांडले आहे. त्यांनी अत्यंत स्पष्टपणे, रोखठोक पद्धतीने तरी परंतु अतिशय तरलतेने माणसाच्या आयुष्यातील प्रेम, आपुलकी, विश्‍वास, निखळ पारदर्शकता, सांसारिक व सामाजिक जबाबदार्‍या व एकुणात बेफिकिरी अशा सर्वांगाने एकूणएक कंगोरे उलगडत या विषयाची हाताळणी केली आहे. तरीसुद्धा या विषयाचे महत्त्व, गहनता व गरज लक्षात घेता व त्यावर चर्चाच न झाल्याने एक संपूर्ण कादंबरीसुद्धा कमी पडल्याचे, लेखकाला व वाचकांनाही प्रकर्षाने जाणवले आहे. असे असूनही या कादंबरीवर आधारित नाटकाचे लेखन करणे हेच मुळी धाडसाचे ठरते. तरीसुद्धा हा विषय नाट्यरूपांतरित करून साभिनय सादर करण्याची कल्पना आजचा आघाडीचा व अभिनय, लेखन व दिग्दर्शन या तीनही क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणारा ‘चिन्मय मांडलेकर’ याला सुचली आणि त्याने हे शिवधनुष्य लीलया व समर्थपणे पेलल्याचे कौतुक करावेच लागेल. मग या नाटकाच्या निर्मितीची जबाबदारी तेवढाच सक्षम, आघाडीचा व यशस्वी निर्माता ‘प्रसाद कांबळी’ याने स्वीकारल्याने बाकी सर्व अडचणी आपोआप दूर होत गेल्या आणि मग ‘स्पृहा जोशी’ सारखी अभिनेत्री या नाटकाला लाभल्याने ‘लेखन, दिग्दर्शन, अभिनय व निर्मिती’ या चार मजबूत दर्जेदार स्तंभावर या नाटकाची सेलेबलिटी वाढल्यास नवल ते काय?
कथासार
या कथानकाचा नायक भास्कर, त्याची सुविद्य व बुद्धिमती पत्नी नंदिता व मुलगा राजू यांच्या भोवती मुलत: या नाटकाचे कथानक बेतलेले आहे. आपल्या स्वकर्तृत्वावर व अविश्रांत मेहनतीच्या बळांवर ‘भास्करने’ जलशुद्धीकरणाचा कारखाना उभारलेला असतो. आपली सुंदर, सुविद्य व बुद्धिवान पत्नी नंदिता व एकमेव अपत्य राजू, जो बोर्डिंगमध्ये राहून शिक्षण घेतो आहे, अशा कोणीही हेवा करावा अशी आर्थिक, संसारिक व सामाजिक उत्तम परिस्थिती या कुटुंबाची आहे. त्यामुळे या सुखी, समाधानी व आनंदी परिस्थितीचा भास्करला अभिमान आहे किंबहुना यातच तो गुंतलेला व रमलेला आहे. परंतु हीच सत्यपरिस्थिती आहे का असा प्रश्‍न पडावा अशी घटना घडते व भास्करच्या कल्पनाविश्‍वाला तडा जातो. जेव्हा त्याला आपल्या लाडक्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची माहिती कुठूनशी मिळते, त्याच्या पायाखालची जमीनच सरकते, त्याची मतीच गुंग होवून जाते आणि त्याच्या सोकॉल्ड सुखी संसाराला प्रचंड मोठा हादराच बसतो. परंतु त्याची ‘सुविद्य व बुद्धिमती पत्नी नंदिता’ मात्र ‘वैवाहिक व विवाहबाह्य’ संबंध ही दोन्ही नाती अत्यंत समझदारीने, कुशलतेने व जबाबदारीने पेलत असल्याने स्वत:च्या कल्पनाविश्‍वाला व अक्कलहुशारीला गोंजारण्यातच आनंद मानत असते. आपली संसारिक, आर्थिक व सामाजिक पत लक्षात घेऊन ही कोंडी फोडायची जबाबदारी भास्करवरच आलेली असते. सुशिक्षित व उच्चभ्रू समाजात वावरतांना अकस्मात, अकल्पित व अनैतिक प्रश्‍नांची उकल करण्याची पद्धत भास्करला निश्‍चितच ज्ञात असते म्हणूनच तो समुद्रकिनारी पर्यटनाची योजना आखतो. जरी त्याच्या मनामध्ये ‘खवळलेल्या समुद्राचा गाज रोंरावत’ असला तरी वरकरणी नेहमीची देहबोली, हावभाव व आवाजावरील नियंत्रणासह त्यांच्यातील संवाद घडतील याची काळजी भास्करने घेतली होती. सुरुवातीला आडून व सूचकपणे संवाद साधत त्याचे ‘सत्य परिस्थितीचे खनन’ सुरू होते व सरतेशेवटी अगदी स्पष्टपणे तिला ‘तिच्या आणि गणेश ग्रामोपाध्ये’ यांच्यातील संबंधांबाबत विचारपूस करतो. मूलत: नंदिनीसुद्धा हुशारच असल्याने तिलाही त्याच्या मनाची घुसमट, घालमेल व अस्वस्थता जाणवतच असते त्यामुळे तिचा पवित्रा डिझाइंड, डिफाइंड, पक्का व रोखठोक असतो. ती त्याला स्पष्टपणे खुलासा करते की गणेश हा माझा मित्र आहे, त्याला माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट, भावना समजते. त्यामुळे आमची मैत्री दृढ होत गेली, अगदी अनवधानाने, अलगद व सहजगत्या आमचा ‘शरीरसंबंध’ आला. परंतु तुझ्याशी प्रतारणा केल्याची भावना माझ्या मनाला कधीही शिवलेली नाही. ‘भास्करची पत्नी व गणेशची मैत्रीण’ या दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा, संबंध व जबाबदार्‍या मी एकमेकांपासून वेगळ्या व अलिप्त ठेवलेल्या आहेत. या दोन परस्परविरोधी संबंधांची सरमिसळ होणार नाही याची काळजी घेऊन त्यांना एकत्र आणण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. केवळ त्याचमुळे माझ्या आयुष्यातील ‘तुझ्या व त्याच्या’ पूर्णत: स्वतंत्र अशा स्थानांना कदापिही धक्का पोहोचलेला नाही व आजवर ही दोन्हीही नाती अबाधित आहेत.
नंदिताचा हा ‘खरा, स्पष्ट व समर्थनीय विचार व त्याबरहुकूम कृती’ भास्करच्या आकलनशक्तीपलीकडे असल्याने त्याच्या पचनी पडणे अशक्यच होते. आपल्या कुटुंबाची आर्थिक, संसारिक, सामाजिक व नैतिक पत व प्रतिमा लक्षात घेता भास्करला नंदिताने अनावश्यक अशी केलेली प्रतारणा फार मोठी जखम पोहोचवते आणि या पार्श्‍वभूमीवर ‘आपल्या दोघांमध्ये आता कोणत्याही प्रकारचं नातं शिल्लकच राहू शकत नाही’ असा निर्णायक पवित्रा तो घेतो. नंदिताला असा हा भास्करचा अप्रोच खचीतच पटत नाही. आपल्या आणि गणेशच्या संबंधाचा एवढा बाऊ करण्याची बाब तिच्या आकलनापलीकडे ठरते आणि तिच्यासाठी हा एक मोठा प्रश्‍न उभा राहतो. पूर्वार्धात हा सगळा या कुटुंबाचा चलतपट सरकल्यानंतर उत्तरार्धात नक्की काय घडतं, हे प्रत्यक्ष बघणेच इष्ट होय!
सादरीकरण
आधीच सविस्तरपणे प्रस्तावित केल्यानुसार ‘मिलिंद बोकील’ यांच्या ‘समुद्र’ या गाजलेल्या कादंबरीचं नाट्यरुपांतर करण्याची कल्पना ‘चिन्मय मांडलेकर’ ला सुचली, लेखन, दिग्दर्शन व प्रमुख भूमिका ही त्रिविध जबाबदारी, तद्वतच नंदीताच्या भूमिकेसाठी ‘कास्टिंग डिरेक्टर’ च्या भूमिकेतून ‘स्पृहा जोशी’ ची केलेली सार्थ निवड करून हे ‘शिवधनुष्य’ त्याने समर्थपणे पेलले, असे कौतुकाने नमूद करावेच लागेल! साधा, सरळमार्गी व स्वकष्टांवर विश्‍वास बाळगणारा, यशस्वी राहून सुखी संसाराच्या हिंदोळ्यावर झुलणारा ‘भास्कर’ चिन्मयने आपल्या अभिनय क्षमतेच्या बळावर सुयोग्य साकारला आहे. आपल्या लाडक्या पत्नीच्या प्रतारणेने प्रचंड दुखावलेला, मुळापासून हादरलेला तरीही शांततेने एकूण परिस्थितीवर मार्ग शोधणारा व तिच्या पवित्र्याने दिङ्‌मूढ झालेल्या भास्करची मानसिक घालमेल व सगळी स्थित्यंतरं हे सर्वकाही ‘वेळोवेळी व चपखल’ पद्धतीने दाखवलेली आहेत. तद्वतच स्पृहा जोशी ही नंदिताचं रूप, शिक्षण, बुद्धिमता, वैचारिक व निर्णायक पवित्र्यासह पत्नी व प्रेयसी या दोन्ही भूमिका, त्यांचं व्यक्तित्व सक्षमपणे पेलत पुरेपूर खरी उतरली आहे. राजन भिसे यांच्या नेपथ्यातून समुद्रकिनारी ही कॉटेज असल्याचं नेमकेपणाने भासतं. मयूरेश माडगावकरांच्या संगीतसंयोजनातून समुद्राचा गाज वापरल्याने ‘पात्रांच्या मनातील खळबळ’ अधोरेखित होते. जयदीप आपटे यांनी नेपथ्याला पूरक प्रकाशयोजना केल्याने दृश्यअदृश्य प्रसंगांचे मूड्स गहिरे केले आहेत. नाटकातील केवळ दोनच पात्रे आणि यातील विषयाची गहनता व गांभीर्याचा ‘वाईड कॅनव्हास’ असल्याने लेखकाला जे काही म्हणायचं आहे ते या ‘अव्हेलेबल रिसोर्स’ चा वापर करून मांडायची जबाबदारी दिग्दर्शकावर होती. परंतु रंगावृत्ती तयार करतांना चिन्मय मांडलेकर याने विचार केल्याने त्यात सुलभता व सुसूत्रता ओघाने आल्याचे दिसते. या दोन पात्रांसमवेत तिसरं पात्र म्हणजे ‘माणसाचा मानसिक व भावनिक संघर्ष’ व चौथं पात्र म्हणजे ‘समुद्र’ ज्याच्या साक्षीने ‘नंदिनी – भास्करचा’ माणूसपणाच्या दिशेने होणारा प्रवास उलगडत गेला आहे. यासाठी चिन्मयने अपरंपार मेहनत घेतल्याचे स्पष्टपणे जाणवते.
सारांश
आयुष्यभर एकाच छताखाली राहूनही माणसं एकमेकांना कळतातच असे नाही. आपल्याला सुपरिचित भासणारी व भावणारी एखादी व्यक्ती जेव्हा अपेक्षेपलीकडचं बोलते व वागते तेव्हा आपला भ्रमनिरास होतो. कारण ‘परिचित वा अपरिचित’ माणूस पूर्णत: समजणं ही अशक्यकोटीतलीच गोष्ट होय! समस्त मनुष्यप्राण्यांच्या बाबतीत हेच सत्य आहे. पतिपत्नीच्या पवित्र नात्यामध्ये नितळ पारदर्शकता अपेक्षेपेक्षा गृहीतच जास्त धरलेली असते. वैवाहिक जीवनात सगळंच काही आलबेल आहे असं जरी मानलं तरीही ते कदाचित अज्ञानापायी असू शकेल. मिलिंद बोकीलांच्या ‘समुद्र’ या कादंबरीतले ‘भास्कर व नंदिनी’ हे पतिपत्नी अशाच गर्तेत सापडलेले आहेत. सत्याचा व त्यातून उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करताना सरतेशेवटी उलगडा जरी होत असला तरीही माणसाला समजण्याच्या प्रक्रियेतील त्रुटींचा हा परिपाकच होय!
एका गहन विषयाला नाट्यरूपांतरित करून प्रेक्षकांच्या समोर सादर होतांनाच पुनश्‍च चाकोरीबद्ध वाटच चोखाळावी लागते, हे सत्य अधोरेखित होतं. नंदिताला बुद्धिमती ठरवतानाच तिने गणेशची केलेली निवड व त्याच्याशी जोडलेले विवाहबाह्य संबंध कितपत विचारी व योग्य, या प्रश्‍नालाही उत्तर शोधण्यास भाग पाडले आहे. यावर गणेशचा विचार तर केवळ सर्वसाधारणच ठरतो. तरीही आपल्या वर्तनाचं ठोस, पुन:पुन्हा केलेलं समर्थन स्वीकारणं कठीण होतं, भास्करलाही व प्रेक्षकांनाही! ही कथानकातील उणीव स्पष्ट होते. गणेशच्या प्रेमात गुंतलेली नंदिनी या त्याच्या वर्तनाने पूर्णत: कोलमडून जाते. तिचा हा भ्रमनिरास तिला पचवताच येत नाही. त्याच्या या विचारांनी व वर्तनाने ‘स्त्री-पुरुष’ मैत्रीसंबंधातील नंदिताच्या दाव्यांना पूर्णत: झूट ठरवलं आहे किंबहुना ‘माणुसकीचं सत्त्व’ नाहीसं झाल्याची अनुभूती मिळते. याचा अर्थ असाही होत नाही की गणेशच्या एकुणात ‘अप्रोच व वर्तन’ या पतिपत्नीच्या संबंधांना ‘पूरक वा विरोधी’ ठरू शकेल. या जर-तर च्या गुंतागुंतीमुळेच कदाचित नाहक भरडला जाणारा, सरळमार्गी व ‘नवरा-बायको’ या पवित्र संबंधांचा पुरस्कर्ता भास्कर हा माणूस म्हणून श्रेष्ठ ठरतो. माणूस विचारवंत व प्रगल्भ असल्याचे कितीही दावे केले गेलेत तरीही अंततः त्या केवळ वल्गनाच असल्याच्या सत्यापुढे हार मानवी लागते. या दोघांमधील संबंध केवळ ‘गणेश’ मुळेच नसल्याने अनेक प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यात प्रेक्षक गुंतून जातात. जर त्याच्या वर्तनावर यांचे संबंध अबाधित राहतील तर माणसाच्या प्रगल्भतेच्या प्रवासाला सलाम! अर्थात हेही बरोबर की चूक हे आपल्यालाच ठरवायचं असतं!

एनसी देशपांडे/९४०३४९९६५४