विद्यापीठातले देशद्रोह्यांचे अड्डे मोडणे जरुरी

0
204

जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा देण्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या उमर खालिदला रामजस महाविद्यालयात बोलावण्यावरून सुरू झालेल्या आंदोलनामुळे दिल्ली ढवळून निघाली. पण दिल्ली म्हणजे देश नव्हे. यानंतर सुरू झालेल्या सोशल मीडियावरील वादातही विविध क्षेत्रातील असंख्य लोक ओढले गेले. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा एखाद्या लोकशाही देशात किती अतिरेक होऊ शकतो, हे यानिमित्ताने सलग दुसर्‍या वर्षी पहावयास मिळाले.
गतवर्षीचा फेबु्रवारी आणि मार्च महिना दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांच्या आंदोलन-प्रतिआंदोलनांनी प्रकाशझोतात आला होता. डावी विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांनी संसद हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार मोहम्मद अफजल याला देण्यात आलेल्या फाशीचे उदात्तीकरण केले होते. त्याचवेळी काश्मीरच्या स्वातंत्र्यासह देशविघातक घोषणा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या होत्या. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपप्रणीत विद्यार्थी संघटनेने मैदानात उडी घेतली होती.
कथित अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्यावरून राजधानी दिल्लीतील वातावरण ढवळून निघाले आहे. दोन विद्यार्थी संघटनांमधील वादात विविध राजकीय पक्षांनी उड्या घेतल्यामुळे वातावरण तापले. दोन्ही बाजूंनी मोर्चे काढले गेले. आरोप-प्रत्यारोपाचे युद्ध सुरू झाले. या वादाला देशभक्त आणि देशद्रोही यांच्यातील संघर्षाचे रूप आले आहे.
प्रसारमाध्यमांची दिवाळखोरी
दिल्लीतल्या महाविद्यालयातली प्रथम वर्षाची मुलगी देशातले सर्व प्रश्‍न बाजूला टाकण्याइतकी महत्त्वाची बनावी, ही प्रसारमाध्यमांची दिवाळखोरी आहे. सोशल मीडियाचा बेजबाबदारपणाही याला कारणीभूत आहे. एका फुटकळ घटनेची चिंता काहींना पडली आहे. घटनेच्या मुळाशी जाण्याआधीच आपले मत मांडणे यातुन वैचारिक गुलामगिरी स्पष्ट होते.
दिल्लीतल्या लेडी श्रीराम कॉलेजची गुरमेहर कौर ही विद्यार्थिनी या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे. तिचा वापर झाल्याचे दिसते आहे. या तरूण विद्यार्थिनीच्या मनात असे प्रदूषित विचार कोण घुसवत आहे, असा सवाल आहे. वादाचे मूळ रामजस कॉलेज होते. त्याला बळी गुरमेहर झाली. गुरमेहर कौर रामजस महाविद्यालयाची विद्यार्थिनी नव्हे. हा प्रसंग घडला तेव्हा रामजस महाविद्यालयात हजरही नव्हती.मूळ प्रसंगांशी तिचा थेट संबंध नाहीच. तिच्या रूपाने डाव्यां संघटनांना एकदम उपयुक्त चेहरा सापडला. कारण ती नुसतीच तरुण स्त्री नव्हे, तर दहशतवादी अभियानात हौतात्म्य पत्करलेल्या सैन्य अधिकार्‍याची मुलगी आहे. हुतात्मा सैनिकाच्या मुलीने अभाविपच्या विरोधात आवाज उठवण्याला जास्त महत्व आहे.
डाव्या विद्यार्थी संघटनांनी या कॉलेजात उमर खालीदचे व्याख्यान आयोजित केले. आता हा खालीद कोणी विचारवंत, तत्त्ववेत्ता वगैरे नव्हे. एरवी याची दखल विद्यार्थ्यांनी घेतलीही नसती. अभाविपच्या विरोधानंतर हे व्याख्यान रद्द झाले. जेएनयूवर सत्ता राखणार्‍या डाव्या पक्षांचे जुने स्वप्न आहे, ते दिल्ली विद्यापीठावर (डीयू) कब्जा करण्याचे. डीयूवर उजव्या पक्षांचे प्राबल्य आहे. खालीदच्या निमित्ताने डाव्यांनी अभाविपच्या विरोधात मोहीम सुरू केली.
उमर खालीद म्हणजे मागे घडलेल्या जेएनयू प्रकरणात भारतविरोधी घोषणा देणारा विद्यार्थी. अश्या देशद्रोही माणसाला आम्ही दिल्ली विश्‍वविद्यालयात भाषण करू देणार नाही, असा पवित्रा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ह्या विद्यार्थी संघटनेने घेतला. त्यावरून ह्या कार्यक्रमाच्या वेळी डाव्या विचारसरणीच्या ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन (खड) आणि अभाविप ह्या संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. पुरी आझादी, स्वतंत्र काश्मीरचा अपप्रचार करणार्‍यांसाठी गुरमेहर प्रभावी हत्यार ठरली. वयाची विशीही न ओलांडलेल्या गुरमेहरचे कारगिल युद्ध, भारत-पाकिस्तान संबंधांवरचे भाष्य हास्यपद होते. विद्यापीठात सापडणार्‍या पाचपन्नास विद्यार्थी नेत्यांसारखा असणारा कन्हैया देशात विनाकारण प्रसिद्धीस पावला. तीच चूक गुरमेहरच्या बाबतीत आज मिडिया करते आहे.
देशद्रोह्यांचा अपप्रचार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डाव्या पक्षांचे लक्ष्य असल्याची बाब नवी नाही. पंतप्रधान मोदी म्हणजे देशाची फाळणी, मोदी म्हणजे हिंदू राष्ट्र, मोदी म्हणजे अराजक हा प्रचारमोहिमेचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून अत्यंत पद्धतशीरपणे पुरोगामी विचार आणि विचारवंतांची गळचेपी सुरू असल्याचा अपप्रचार करण्यात येत आहे.
ऑल इंडिया स्टुडंट्‌स युनियन आणि अभाविपच्या विद्यार्थ्यांच्या गटात महाविद्यालयाच्या आवारात जोरदार हाणामारी झाली. ही दगडफेक करणार्‍यात खलिदही होता. पोलिसांनी महाविद्यालयाच्या आवारात घुसून हा संघर्ष रोखला. देशविद्रोही शक्तींना डाव्या विचारांच्या संघटना जाणून-बुजून खतपाणी घालत आहे. त्यात लेडी श्रीराम कॉलेजमध्ये शिकणार्‍या विद्यार्थिनी गुरमेहर कौर हिने आपल्या छायाचित्रासह आपण अभाविपला घाबरत नाही, या घटनेचा निषेध तर करायलाच हवा, पण त्याबरोबरच विद्यार्थ्यांनी एकजुटीने झुंडगिरीचा सामना करायला हवा, असा मजकूरही तिने सोशल मीडियाद्वारे प्रसारित केला. तिच्या या टिप्पणीवर सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. आपण अभाविपविरोधी सुरू केलेल्या मोहिमेमुळे आपल्याला धमक्या आल्याची जाहीर तक्रार तिने केली. आपल्या या धमक्या नेमक्या कुणी दिल्या, हे मात्र तिने सांगितलेले नाही. तिला या धमक्या नेमक्या कुणी दिल्या याचा तपास पोलिस लावतीलच.
देशद्रोहाचे अड्डे
गुरमेहरच्या फेसबुकवरच्या वादग्रस्त मजकुरासह प्रसारित झालेल्या छायाचित्रांवर दिल्लीत आणि देशभरातही जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. या मुलीच्या मनात कोण विष कालवत आहे? आपल्या शक्तिशाली सैन्याने युद्ध रोखले. आजवर भारताने कधीही आक्रमण केलेले नाही. उलट भारतावरच इतरांनी आक्रमण केल्याची प्रतिक्रिया प्रसारित केली. प्रत्येक नागरिकाला बोलण्याचे स्वातंत्र्य असले, तरी देश दुबळा व्हावा, यासाठी तुम्ही काहीही घोषणा द्याव्यात, असे नव्हे, असेही त्यांनी बजावले.दाऊदने त्याच्या राष्ट्रविरोधी भूमिकेचे समर्थन करताना निदान त्याच्या वडिलांच्या नावाच्या (दाऊदचे वडील पोलिस होते) कुबड्या तरी घेतलेल्या नाहीत. गुरमेहर आणि तिला साथ देणार्‍यांची वक्तव्ये सामाजिक एकतेत फूट पाडणारी आणि राष्ट्रीय ऐक्याला सुरंग लावणारी असल्याने, सरकारला त्याची गंभीर दखल घ्यावीच लागेल.
वर्षभरापूर्वी हाच वाद जवाहरलाल नेहरू विद्यापीठात उपस्थित झाला होता, त्या वेळी तेथे विद्यार्थ्यांच्या एका समूहाने देशविरोधी घोषणा दिल्याचा मुद्दा खूप गाजला होता. त्या वेळीही या मुद्यावरून देशातील वातावरण ढवळून निघाले होते. कन्हैयाकुमार, उमर खालीद आणि अन्य विद्यार्थ्यांनी त्या वेळी काश्मीरच्या आझादीच्या घोषणा दिल्या होत्या. काश्मीर आणि बस्तरच्या आजादीच्या घोषणा देणार्‍या ९० टक्के विद्यार्थ्यांना आपण काय करत आहे, याची जाणीवच नसावी, असे वाटते. डाव्या नेत्यांनी दिशाभूल केल्यामुळे त्यांनी असे केले असावे, अशी शंका घ्यायला पूर्ण जागा आहे. या विद्यार्थ्यांची राजकीय नेत्यांनी दिशाभूल करू नये.
सतत सैन्य/सरकारच्या विरोधात प्रचार
या धमक्या राष्ट्रवादानीच दिल्या, असे संशयाचे वातावरण निर्माण करणे मुळीच बरोबर नाही. रामजस महाविद्यालयात भाषणासाठी बोलवलेल्या त्या खालीदने जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा दिल्या होत्या. त्या टोळीतही तो आणि त्याचा सहकारी सहभागी होता. तरीही त्याला या महाविद्यालयात भाषणासाठी बोलवले गेले, ते राष्ट्रविरोधी विचारांचा प्रसार करायसाठीच, या आरोपात नक्कीच तथ्य आहे. राजधानी दिल्लीतले जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि अन्य केंद्रीय विद्यापीठे ही देशद्रोही राजकारण्यांचे अड्डे झालेले आहेत. गलेलठ्ठ पगार घेणारी या विद्यापीठातली प्राध्यापकांची काही टोळकी तथाकथित पुरोगामी विचारांचे आपण कट्टर समर्थक असल्याचे सांगत, राष्ट्रविरोधी कारवाया विद्यापीठांच्या आवारातच करणार्‍या डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांना चिथावण्या देत असल्याचे उघडही झाले आहे. या आधी संसदेवर हल्ला चढवणार्‍या कटाचा सूत्रधार अफजल गुरूचा स्मृतिदिन याच जवाहरलाल नेहरू विद्यापीठात साजरा करणार्‍यांनी, आपल्या पुरोगामी विचारांचे बेशरमपणे समर्थनही केले होते. विद्यापीठे आणि महाविद्यालये ही सतत सैन्य/सरकारच्या विरोधात प्रचार करतात. अशा घटनांनी विद्यापीठांचे शैक्षणिक वातावरण प्रदूषित होते, याचे भान या पुरोगामी विचाराच्या टोळ्यांना आणि डाव्या विचारांच्या संघटनांना राहिलेले नसल्यानेच, आपल्या कारवायांना विरोध म्हणजे लोकशाही-स्वातंत्र्यावर घाला, असा टाहो ही मंडळी सातत्याने फोडत आहेत. सरकारने विद्यापीठातले हे प्रतिगाम्यांचे अड्डे कठोरपणे मोडून काढत, त्यांच्या वर्चस्वातून ही विद्यापीठे मुक्त करायला हवीत.
विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न जरुरी
केवळ गुरमेहर कौरला काय वाटतं ते तिला हव्या त्या शब्दात सांगायचा हक्क आहे, मग ती मते इतरांना देशविरोधी का वाटेनात. पण तिच्या विधानाला कुणी हरकत घेतली, मग ती कितीही सभ्य शब्दात का असेना, ती व्यक्ती लगेच असभ्य, शिवराळ ट्रोल ठरवली जाते. कारण विचारवंत माफियाने ठरवलेल्या भूमिकेशी विसंगत अशी भूमिका ह्या देशात कुणी घेऊच कसे शकते?
गुरमेहेरने २८ फेब्रुवारी रोजी केलेल्या ट्वीटमध्ये आपण या आंदोलनातून माघार घेत असल्याचे सांगितले. नेमका मुद्दा काय आहे हे लक्षात न घेता माझ्या कुटुंबाला या वादात उगाचच ओढले जात आहे, असे माध्यमांसमोर सांगून ती जालंधर येथील आपल्या घरी परतली. फुटीरतावादी शक्तींना ज्या पद्धतीने चंचुप्रवेश करून दिला जात आहे ते मात्र देशाच्या दृष्टीने दीर्घकालीन विचार करता अतिशय घातक ठरणारे आहे
आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्रशासनाचा, पोलिसांचा तसेच सरकारच्या विरोधात घोषणा देण्याचा अधिकार आहे, पण देशाच्या विरोधात घोषणा देण्याचा अधिकार नाही. कोणतेही अभिव्यक्तिस्वातंत्र्य देशाच्या विरोधात घोषणा देण्याची परवानगी देऊ शकत नाही. मुळात अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे काय, हे या विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या राजकीय मार्गदर्शकांनी समजून घेण्याची गरज आहे. तसेच आपण ज्याला आदर्श मानतो, ते आपल्याला चुकीच्या मार्गाने तर नेत नाही, आपली दिशाभूल करत नाही ना, हे या विद्यार्थ्यांनीही समजून घेतले पाहिजे आणि चुकीचा मार्ग सोडून योग्य मार्गावर आले पाहिजे. विद्यार्थ्यांनी भावनेच्या भरात वाहून जाणे योग्य नाही. विद्यार्थ्यांना आंदोलनच करायचे असेल तर देशात असे अनेक मुद्दे आहेत, त्यावर ते आंदोलन करू शकतात. देशाचा फायदा होईल, अशा मुद्यांवर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले पाहिजे. सरकारच्या कामगिरीची चिकित्सा, आर्थिक नीती, उद्योग धोरण, कृषी चिंतन यापेक्षा नको त्या विषयांवरचे वाद मीडियाला आवडतात. दंगलखोरीला विद्यापीठात थारा मिळता कामा नये हा निर्णय विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे. विद्यार्जनासाठीचा अमूल्य काळ देशद्रोही राजकारणाची पोळी भाजण्यात वाया घालवला, तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल.
आपल्या आंदोलनामुळे देशाची एकता आणि अखंडता धोक्यात येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. आसाममधील विद्यार्थ्यांनी बांगलादेशी घुसखोरीविरुद्ध आंदोलन केले होते. देशातील विद्यार्थी आंदोलनाचा असा गौरवपूर्ण इतिहास आहे, याची जाणीव ठेवली पाहिजे.
राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी दिशाभूल झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, त्यात विद्यार्थ्यांचे आणि देशाचेही हित आहे.