साप्ताहिक राशिभविष्य

0
766

रविवार, १२ ते १८ मार्च २०१७
सप्ताह विशेष
•सोमवार, १३ मार्च- करिदिन, धूळवड, धूलिवंदन, वसंतोत्सव, सिंधूबाईसाहेब जयंती- श्रीसमर्थवाडी (अमरावती); •मंगळवार, १४ मार्च- श्री तुकाराम महाराज बीज, रवि मीन राशीत १७.३०; •बुधवार, १५ मार्च- छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीनुसार), जागतिक ग्राहक दिन; •गुरुवार, १६ मार्च- संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय रात्री ९.४८); •शुक्रवार, १७ मार्च- रंगपंचमी, रवि उत्तराभाद्रपदा नक्षत्रात २५.२१, बुधाचा पश्‍चिमेस उदय;
•शनिवार, १८ मार्च- नाथषष्ठी, श्री एकनाथ महाराज षष्ठी, पैठण यात्रा, माधवनाथ महाराज पुण्यतिथी- चित्रकूट,
बगाजी महाराज यात्रा- वरूड (अमरावती).
संक्षिप्त मुहूर्त- साखरपुडा- १८ मार्च; बारसे- १८ मार्च; जावळे- १५ मार्च; गृहप्रवेश- १५ मार्च.

मेष : उत्साह, आनंदाचे वातावरण
या आठवड्यात आपला राशिस्वामी मंगळ राशिस्थानात आहे. याशिवाय षष्ठात गुरू, व्ययस्थानात बुध-शुक्र, भाग्यात शनी तर रवि लाभात आहे. चंद्र पंचमस्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर अष्टम स्थानात येईल. प्रामुख्याने नोकरी- व्यवसायात आपणास या अनुषंगाने विशेष संधींचा लाभ मिळू शकेल. नवीन नोकरी मिळणे किंवा बढतीचे योग येऊ शकतात. नवा व्यवसाय सुरू करू इच्छिणार्‍यांना काही उत्तम संधी व त्यात कुटुंबाची चांगली साथ मिळेल. स्थावर मिळकत, जमीन-जुमल्याचे व्यवहार फायदेशीर ठरू शकतात. कुटुंबात काही मंगलकार्याची मुहूर्तमेढ होऊन उत्साह व आनंदाचे वातावरण राहील. उत्तरार्धात मात्र काहींना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. शुभ दिनांक- १५, १६, १७.
वृषभ : अनुकूल संधी मिळावी
या आठवड्यात आपला राशिस्वामी शुक्र लाभ स्थानात बुध व हर्शलसोबत आहे. शुक्र सध्या वक्री आहे. मंगळ व्ययस्थानात आहे. योगकारक शनी अष्टमात व रवि दशमात आहे. चंद्र चतुर्थातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर सप्तमस्थानात येईल. विशेषतः व्यवसायात एखादी उंच झेप घेता येऊ शकेल अशा प्रकारची संधी या आठवड्यात आपणास लाभू शकते. सुरुवातीलाच प्रामुख्याने आपल्या कामातील अडचणी दूर होऊन दिलासा मिळावा. नोकरी-व्यवसायात महत्त्वाकांक्षा वाढीस लागून आपले ईप्सित पूर्ण करण्यासाठी अनुकूल संधी चालून येतील. या सार्‍याने आपला उत्साह आणि जिद्द वाढेल. मित्रवर्ग व कुटुंबीयांची उत्तम मदत मिळू शके ल.
शुभ दिनांक- १३, १४, १८.
मिथून : प्रलंबित कामांना वेग
या आठवड्यात आपला राशिस्वामी बुध दशमस्थानी शुक्रासोबत आहे. तो सध्या अस्तंगत असला तरी आठवडाअखेर उदित होणार आहे. याशिवाय शनी सप्तमात, मंगळ लाभात आहे. गुरू सुखस्थानात आहे. चंद्र पराक्रम स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर षष्ठात जाईल. आपल्या आतापर्यंत प्रलंबित राहिलेल्या कामांना वेग मिळून ती पूर्णत्वास जाऊ शकतात. आपल्या आर्थिक योजना देखील पूर्ण व्हाव्या. विशेषतः व्यवसायात असणार्‍यांना आवर्जून हे अनुभवता येईल. व्यवसायवाढीच्या नवीन संधी मिळतील. नवीन गुंतवणूक, नव्या क्षेत्रात पदार्पण करता येईल. नोकरदार वर्गाला नोकरीत दबदबा, स्पर्धकांवर वचक, अधिकार्‍यांची मर्जी प्राप्त करता येईल. शुभ दिनांक- १५, १६, १७.
कर्क : दुर्घटनांपासून सावध राहावे
आपला राशिस्वामी चंद्र या आठवड्यात धनस्थानातून भ्रमण सुरू करीत असून तो अखेरीस पंचम स्थानात जाईल. याशिवाय शनी षष्ठात व रवि अष्टमात आहेत. दशमात मंगळ, भाग्यात बुध व शुक्र आणि पराक्रमात गुरू आहे. या आठवड्यात काहींचा आध्यात्मिकतेकडे ओढा वाढू शकतो. संततीची उत्तम प्रगती व कुटुंबातील वातावरण मानसिक समाधान देईल. काहींना मात्र आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते. मुलांच्या हाती वाहने देताना काळजी घ्या. स्वतःही वाहने काळजीपूर्वक चालवावी. दुर्घटनांपासून सावध राहायला हवे. प्रलोभने व व्यसनांपासून दूर राहावे. विद्यार्थ्यांसाठी उत्साह व आनंदाचा आठवडा. विद्यार्थ्यांनी सामाजिक उपक्रमातही वेळ द्यावा. शुभ दिनांक- १२, १६, १७.
सिंह : प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी
या आठवड्यात आपला राशिस्वामी रवि सप्तम स्थानात आहे. याशिवाय राशिस्थानी राहू, धनात गुरु, पंचमात शनी, भाग्यात मंगळ व अष्टम स्थानात बुध व शुक्र आहेत. चंद्र आपल्या राशीतून भ्रमण सुरू करीत असून आठवडाअखेर तो चतुर्थ स्थानात जाईल. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या चढ-उताराचा असणार आहे. त्यामुळे आपणास आर्थिक घडी बसविण्यासाठी मेहनतीसोबतच कौशल्यही वापरावे लागणार आहे. नोकरदार वर्गाला अधिकारी वर्गाची मर्जी राखता येईल. हाताखालचे कर्मचारी सहकार्य करून आपली प्रतिमा उंचावण्यास मदतच करतील. प्रकृतीच्या संदर्भात मात्र किरकोळ तक्रारी निर्माण होऊ शकतात. कुटुंबात काही असमाधान, काहीसा असंतोष निर्माण होऊ शकतो. शुभ दिनांक- १२, १३, १४.
कन्या : कामाचे समाधान मिळेल
या आठवड्यात आपला राशिस्वामी बुध सप्तमस्थानी शुक्र व हर्शलसोबत आहे, आपल्या राशीत गुरू आहे. बुध सध्या अस्तंगत असला तरी आठवडाअखेर उदित होणार आहे. याशिवाय शनी सुखस्थानात, मंगळ अष्टमात आहे. चंद्र व्यय स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर पराक्रम स्थानात जाईल. सुरुवात फारशी उत्साहजनक नसली तरी आठवड्याचा उत्तरार्ध प्रगतीचा ठरू शकेल. व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक उलाढाल वाढू शकेल. मालमत्ता खरेदी व गुंतवणुकीच्या कामासाठी उत्तम काळ. नोकरीत समाधानाची स्थिती राहील. अधिकारी व सहकारीवर्ग तुमच्यावर खुश राहील. कामाचे समाधान मिळेल. धार्मिक व सामाजिक कार्यातही रुची निर्माण होऊन सहभाग वाढेल. युवांना नोकरीत बदलाचा निर्णय घ्यावयास हरकत नाही.
शुभ दिनांक- १३, १४, १५.
तूळ : कुटुंबात आनंदी वातावरण
या आठवड्यात राशिस्वामी शुक्र षष्ठात गुरूच्या शुभ दृष्टीत व बुधासोबत आहे. मंगळ सप्तमात, शनी पराक्रमात तर रवि पंचमात आहे. चंद्र लाभ स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर तो आपल्या धनस्थानात येईल. सरकारी कामकाजातील गुंतागुंत वाढेल. मुलांना शिक्षण, नोकरी, विवाह, संततीसुख या अनुषंगाने शुभदायक फले मिळतील. युवांना उत्कर्षास फायदेकारक ठरणार्‍या संधी लाभतील. विद्यार्थ्यांनी थोडी मेहनत, प्रतीक्षा, संयम यांची आपल्या प्रयत्नांना जोड द्यावी. महिलांचे मनोबल वाढेल. त्यांच्या कार्यक्षमतेवर त्याचे शुभ परिणाम दिसू लागतील. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंदी व सहकार्याचे राहील.
शुभ दिनांक- १५, १६, १७.
वृश्‍चिक : प्रगतीचा वेग मंदावणार
या आठवड्यात राशिस्वामी मंगळ षष्ठात आलेला आहे. याशिवाय शनी धनस्थानी, रवि सुखस्थानात आहेत. गुरू लाभात व बुध-शुक्र पंचमात आहते. चंद्र दशम स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर तो आपल्या राशिस्थानी येणार आहे. आठवड्याची सुरुवात समाधानकारक असली, तरी भरपूर संघर्ष, जास्त मेहनत आणि त्यामानाने प्राप्ती कमी असा हा आठवडा राहाणार आहे. जिवाचा खूप त्रागा होईल. नोकरी- व्यवसायातील प्रगतीचा वेग अतिशय संथ राहील. व्यावसायिक मतभेद, नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखण्यात कसोटी लागेल. स्पर्धकही बळावतील. या सार्‍यात आपले मनोबल टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीसंबंधी काही तक्रारी निर्माण होऊ शकतात.
शुभ दिनांक- १३, १४, १८.
धनू : आर्थिक व्यवहारात सावध
या आठवड्यात राशिस्वामी गुरु दशमात असून शनी राशिस्थानात आहे. मंगळ पंचमात तर बुध व शुक्र सुखस्थानात आहेत. रवि पराक्रमात आहे. चंद्र भाग्यस्थानातून भ्रमण सुरू करणार असून तो आठवडाअखेर व्यय स्थानात जाणार आहे. आठवड्याची सुरुवात प्रसन्न राहील. हाती घेतलेल्या कामात प्रगती होऊन यश मिळू शकेल. व्यावसायिक व नोकरदारांना काहीसा चढ-उतार अनुभवास येईल. मात्र, प्रतिष्ठा जपण्यात यशस्वी होऊ शकाल. आर्थिक गुंतणूक वा मोठे आर्थिक व्यवहार करताना पुरेसे सावध असावे. बौद्धिक कामात आपली चुणूक दिसेल. जनसंपर्क वाढेल. नवीन ओळखी, नव्या क्षेत्रात पदार्पण, नोकरीत बदल असे काहीसे घडून येण्याचीही शक्यता आहे. शुभ दिनांक- १५, १६, १७.
मकर : महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील
या आठवड्यात राशिस्वामी शनी व्ययस्थानात आहे. तथापि गुरूने आपल्या राशीचा डोलारा सांभाळलेला आहे. याशिवाय रवि धनात, बुध व शुक्र पराक्रमात व मंगळ सुखस्थानात आहे. चंद्र अष्टम स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवडाअखेर लाभस्थानी जाणार आहे. आपल्या भाग्योदयातील अडथळे दूर करणारा हा आठवडा आहे. महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळून महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आर्थिक बाजू भक्कम राहील. जुणी येणी वसूल व्हायला हवीत. नोकरी- व्यवसायात प्रतिष्ठा, मानसन्मान लाभावेत. कुटुंबात काही मोठे कार्य आकारास येईल. त्यानिमित्ताने पाहुणे, मित्रमंडळींचा सहवास आनंद व समाधान वाढवेल. आठवड्याच्या मध्यात काहींना कौटुंबिक कलहास सामोरे जावे लागू शकते. शुभ दिनांक- १३, १४, १५.
कुंभ : सामाजिक कार्यात ओढा
या आठवड्यात राशिस्वामी शनी लाभस्थानात असून राशीत रवि व केतू आहेत. गुरू अष्टमात, बुध व शुक्र धनस्थानात व मंगळ पराक्रमात आहे. सप्तमात राहू आहे. चंद्र सप्तम स्थानातून भ्रमण सुरू करीत असून आठवडाअखेर तो दशम स्थानी जाईल. कुटुंबाच्या उत्तम सहकार्यामुळे आपल्याला ईप्सित गाठणे शक्य होऊ शकणार आहे. आर्थिक आणि कौटुंबिक आघाडीवर समाधानाचे वातावरण राहील. नोकरी व व्यवसायातील चांगल्या संधी पदरी पाडून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सामाजिक कार्यातील ओढा वाढेल. प्रतिष्ठा लाभेल. पण हे सारे करीत असताना आपल्या खिशाला खार लागणार नाही याचीही काळजी घ्यायला हवीच. खर्चावर नियंत्रण ठेवावयास हवे. शुभ दिनांक- १५, १६, १७.
मीन : कामाचा बोजा वाढेल
या आठवड्यात राशिस्वामी गुरू सप्तम स्थानात असून राशिस्थानात उच्चीचा शुक्र, बुध व हर्शल आहे. याशिवाय धनस्थानात मंगळ, दशमात शनी, तर व्ययात रवि आहे. चंद्र षष्ठ स्थानातून भ्रमण सुरु करीत आठवड्याच्या शेवटी भाग्य स्थानात जाणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला काही विशेष व्यावसायिक निर्णय आपणास घ्यावे लागू शकतात. त्याचा दीर्घकालीन प्रभाव जाणवेल. हे व्यवहार फायद्याचे ठरू शकतात. नोकरीत असणार्‍यांवर कामाचा अतिरिक्त बोजा पडू शकतो. मात्र, त्याने विचलित होण्याची गरज नाही. यातूनच आपल्या क्षमतेची खात्री पटेल व पुढे त्याचा लाभ मिळू शकेल. अधिकारीवर्गाची मर्जी राहील. मुलांच्या संदर्भातील काही समस्या मात्र मनस्ताप देतील.
शुभ दिनांक- १३, १४, १८.
मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६