दिवस हिस्लॉप कॉलेजचे

0
126

आठवणी नागपूरच्या
नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजने आणि नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाने जे संस्कार मला दिलेत ते शब्दातीत आहेत. एके क्षणी हिस्लॉप कॉलेजच्या सूचना फलकावर इंग्रजी भाषेत लावलेली सूचना न कळल्यामुळे माझा गोंधळ झाला होता. तोच ग्रामीण विद्यार्थी आयुष्यात पुढे इंग्रजी व राज्यशास्त्राचा कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक झाला, याचे श्रेय मला शिकविणार्‍या समस्त प्राध्यापकांना आहे. आजही पदोपदी त्यांची आठवण येते.

माझ्या जन्मगावी डोणगाव (जि. बुलडाणा) येथील श्री शिवाजी हायस्कूलमधून मी सन १९६१ मध्ये दहावीची शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मी नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये प्रि. युनिव्हर्सिटी कला शाखेच्या वर्गात प्रवेश घेतला. माझे एक दिवंगत बंधू तेव्हा नागपूरच्या पोलिस दलात साधे शिपाई होते, म्हणून मला नागपूरला उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. ग्रामीण भागातील एका सामान्य विद्यार्थ्यांने हिस्लॉप कॉलेजमध्ये प्रवेश घेणे म्हणजे एका लहानशा जलाशयातून सागरात जाण्यासारखे होते. प्रारंभी या महाविद्यालयात मी अक्षरश: गोंधळलो होतो, पण हळूहळू स्थिरावलो. या महाविद्यालयाने मला जन्मभराची ज्वलंत देशभक्तीची व अक्षय ज्ञानाची शिदोरी दिलेली आहे. आमच्या कला शाखेचे वर्ग सकाळी सातला सुरू व्हायचे आणि आमचे प्राध्यापक हजर असायचे हे आता कदाचित विश्‍वसनीय वाटणार नाही. या महाविद्यालयातील इंग्रजी, मराठी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व इतिहासाचे प्राध्यापक एकनिष्ठेने अध्यापन करायचे. तरीही काही विशेषत्वाने स्मरणात आहेत. डॉ. अ. ना. देशपांडे आणि डॉ. वसंतराव वर्‍हाडपांडे यांच्या मराठी अध्यापनाची अनुभूती घेतल्यानंतर मी मराठी वाङ्‌मय विषय न घेतल्याची खंत जीवनभर राहिली. राज्यशास्त्राचे प्रभावी व सखोल अध्यापक करताना डॉ. गो. मा. कुळकर्णी यांनी तत्कालीन राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेला नागडे करत आमच्यावर स्वच्छ चारित्र्याचे व प्रखर राष्ट्रभक्तीचे संस्कार कधी केले ते कळलेच नाही. इतिहासाचे प्राध्यापक के. एम. केशट्टीवारांच्या अध्यापन शैलीचा फार मोठा प्रभाव माझ्या अध्यापन शैलीवर होता. वर्गात उभे राहून आणि डावा हात कमरेवर ठेवून लेक्चर देण्याची त्यांची एक खास शैली होती. महाविद्यालयाच्या तिमाही व सहामाही परीक्षेत इतिहासात सर्वाधिक गुण मिळायचे म्हणून मी त्यांच्याशी अधिक परिचित होतो. इतिहासाचे अध्यापन करताना त्यांनी अगदी सहजपणे आम्हा विद्यार्थ्यांवर जाज्वल्य देशभक्तीचे अक्षय संस्कार केलेले आहेत. अर्थशास्त्राचे प्राध्यापक पिंप्रीकर यांना माझ्यासारख्या ग्रामीण विद्यार्थ्यांप्रति किती आस्था होती याचा अनुभव उद्धृत करणे सयुक्तिक ठरेल.
बी. ए. च्या अंतिम वर्षाला असताना शुक्रवारी आमचा पहिला तास सकाळी सात वाजता, तर शेवटचा एक तास अकरा वाजता असायचा. दरम्यान, घरी जाऊन येणे शक्य नसल्यामुळे मी मित्रांसोबत गार्डीनर होस्टेलच्या समोरच्या मैदानावर विटी-दांडू खेळायला सुरुवात केली. एक दिवस प्रा. पिंप्रीकरांच्या हे लक्षत आल्यावर त्यांनी मला बोलावले आणि म्हणाले, ‘‘दिनोरे बी. ए. चे अंतिम वर्ष आहे आणि विटी-दांडू काय खेळताय्?’’ असे म्हणून मला ते कॉलेजच्या वाचनालयात घेऊन गेले आणि अर्थशास्त्राची इंग्रजी माध्यमाची पुस्तके वाचायला दिली. माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांप्रति त्यांची कळकळ मला विसरणे शक्य नाही.
सन १९६५ मध्ये बी. ए. झाल्यावर मी नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर अध्यापन विभागाच्या एम. ए. राज्यशास्त्राला प्रवेश घेतला. त्याकाळी एम. ए. चे माध्यम इंग्रजी होते आणि एम. ए. चे वर्ग हडस हायस्कूलजवळ असणार्‍या विद्यापीठाच्या वाचनलयाच्या इमारतीत भरत असत. राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभागाचे प्रमुख होते डॉ. एन. आर. देशपांडे. चेहर्‍यावर नेहमी स्मित असणारे डॉ. देशपांडे ‘मराठा पॉलिटी’ शिकवायचे. एम. ए. राज्यशास्त्र करताना ज्यांनी माझ्यातल्या भावी शिक्षकाला योग्य दिशा दिली, ते होते डॉ. प. ल. जोशी आणि प्रा. एन. जी. एस. किनी! शिक्षक कसा असावा हे मी त्यांच्याकडून शिकलो. डॉ. प. ल. जोशी आम्हाला डिप्लोमसी शिकवायचे. एके दिवशी ते वर्गात आले, रोल कॉल घेतला आणि म्हणाले, ‘सॉरी, टुडे आय काण्ट कंटिन्यू युअर क्लास ऍज आय हॅव्ह कम हिअर विदाऊट प्रिपरेशन. हेन्स, सॉरी’ असे म्हणून त्यांनी वर्ग सोडून दिला. राज्यशास्त्रावरील पुस्तकांचे लेखक अहंभाव बाजूला ठेवून निर्मळ मनाने तयारी नसल्याचे सांगत होते. पुढे मी कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक झाल्यावर डॉ. जोशींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ‘नेव्हर एण्टर दे क्लासरूम विदाऊट थरो प्रिपरेशन’ हे तत्त्व मी शिक्षक म्हणून कटाक्षाने अनुसरले.
अतिशय साधी राहणी आणि दाढीची खुंटे नेहमीच वाढलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. एन. जी. एस. किनी. राज्यशास्त्रावर संशोधन करण्यात ते नेहमी मग्न असायचे. ते म्हणत असत ‘आय हॅव्ह नो टाईम टू शेव्ह.’ माझ्या स्मरणाप्रमाणे त्यांना ‘सिटी व्होटर्स इन इंडिया’ या विषयावर लिहिलेल्या प्रबंधासाठी डी. लिट. मिळाली. यासाठी मतदारांच्या मुलाखती घेणे होते. मी रघुजी नगरमध्ये राहात असल्यामुळे हनुमान नगरातील मतदारांच्या मुलाखती घेऊन माहितीचे संकलन करण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपविली होती. ‘मी कसा दिसतो यापेक्षा प्राध्यापक म्हणून मी कसा असलो पाहिजे’ हे मी डॉ. किनी यांचेकडून शिकलो.

जीवनसिंह दिनोरे