गीतकारांची दुनिया

0
80

संगीत श्रवणाचा प्रयोग म्हणजे अभ्यासाचा विषय आहे. नक्की एखादं गाणं आपण का ऐकतो? ऐकताना मनात काय विचार येतात? किंवा ऐकण्यापूर्वी त्या गाण्याबद्दल काय भाव असतात? हिंदी चित्रपट संगीताच्या खजिन्यातील कित्येक हजारो गाणी दिवसभर विविध माध्यमातून कानावर आदळत असतात; परंतु आपली स्वत:ची आणखी गाणी आपण ऐकण्याचं ठरवतो तेव्हा काही विशिष्ट गाण्यांकडे वा काही ठराविक काळातील गाण्यांकडेच आपला ओढा असतो. ज्याला आपण कलेक्शन म्हणतो, अशीच गाणी जिवापाड जपून त्यांची पारायणे चाललेली असतात. कधी गाण्याची चाल, ताल तर काही वेळा त्या गाण्याचा अर्थ आपल्या जीवनातील घटना, प्रसंगाशी निगडित असतो. काही काही गाण्यांमध्ये आपला जीव अडकला असतो. अशी गाणी ज्या चित्रपटातील असतात तो चित्रपट बर्‍याचदा पाहिलाही नसतो, परंतु तरीही ती गाणी आपली म्हणून जपली असतात. याचा अर्थ त्या गाण्याच्या गीतकाराने तो अनुभव त्याच्या शब्दातून जसाच्या तसा उभा केला असतो. कधी दर्द तर कधी खुशी त्यालाही वेगवेगळे कंगोरे. दु:ख म्हणाल तर विरहाचं, नैराश्याचं, त्यातून आलेल्या वैफल्याचं आनंद म्हणाल तर प्रेमाचा वर्षाव, प्रिय व्यक्तींचा सहवास, त्यातील रोमांच आणि रोमान्स. हे सर्व ऐकणारा जो श्रोता तो मात्र ‘जिंदादिल रसिकच’ असायला हवा. श्रवणक्रियेत एकाग्रता असेल तरच दृष्टीतूनही गाणं ऐकता येतं. त्या गाण्यातील शब्दार्थाचा अनुभव त्याच क्षणी नजरेसमोर तरळत राहतो. बर्‍याचदा त्या सिनेसंगीतातील प्रसंगाचे नायक किंवा नायिका तुम्ही आम्हीच असतो.
चित्रपट गीताचं लेखन कवी, शायर, गझलकारासाठी स्वप्नवत वाटावा असा क्षण असतो. सिनेमासाठी सुचवलेले दृश्य, प्रसंग कवीच्या नजरेतून ते वेगवेगळ्या कोनातून तो पाहत असतो. कधी चालीवरील सुरावटीवर बेतलेले शब्द, ते तालातील वाटचालीत कोणतीही बाधा न आणता सहजगत्या चालायला हवेत, अशी काही बंधनं पाळून गीतकार संगीतकाराच्या मनाशी सहमत होतो. संगीताच्या प्रस्तुतीत सर्वप्रथम गीतकार व संगीतकरांची दिलजमाई व्हायला हवी. त्यातून शब्दाने जरी चालीवर मात केली तरीही संगीतकाराला ठेच लागू नये, अशी त्याची मानसिकता हवी. कारण सर्वप्रथम गीतातील शब्द महत्त्वाचे असतात. चाल शरीर, तर शब्द प्राण आहेत. म्हणून ‘श्रवणानंदा’त संगीताचा परिचय शब्दाने केला जातो. मी कुठलं गाणं ऐकतोय? हे महत्त्वाचं असंत; परंतु श्रोता मी कोणत्या गायकाचं गाणं ऐकतोय, हे आधी सांगतो. गाणं ऐकण्याचे उद्देश वेगवेगळे जरी असले तरी त्या गाण्याचा ‘जीव’ असणारे असे ते काव्य, गीत तुम्हाला कदापि वेगळं करता येणार नाही, पण आपलं दुर्दैवी असं की, हिंदी सिनेसंगीतातील गीतकारांना गाणं जरी लक्षात असलं तरीही विसरलो असतो. बहुधा आवडीच्या गाण्याचे गीतकार कोण? असा प्रश्‍न विचारला तरीही हमखास गफलत होते. कारण त्याचं नावच ठाऊ क नसतं.
हिंदी सिनेसंगीतातील अतीव लोकप्रिय ठरलेल्या आणि गाजलेल्या चित्रपटातील, संग्रही असलेल्या गाण्यात शेकडो गीतकारांमधून आज काही मोजक्याच गीतकारांबद्दल दोन कौतुकाचे शब्द जर लिहायचे ठरवले तर सर्वप्रथम मजरूह सुलतानपुरी, हसरत जयपुरी आणि साहिर लुधियानवी यांच्याबद्दल लिहावे लागेल. कारण हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगात जे रमलेले बुजुर्ग असे सिनेरसिक आहेत त्यांचे याच गीतकारांवर सर्वाधिक प्रेम असल्याचे दिसून येईल. त्यानंतर शैलेंद्र, शकील बदायुनी, राजेंद्रकृष्ण, आनंद बक्षी, भरत व्यास, प्रेम धवन, इंदिवर, राजा मेहदी अली खॉं, अंजान, गुलजार, पं. नरेंद्र शर्मा, नीरज वर्मा, मलीक अशा काही गीतकारांचा उल्लेख करता येईल. गीतग्रहण आणि गीताचं रसग्रहण रसिकतेने करायचं म्हटलं तर सर्वप्रथम गीतकाराबद्दल आदर व्यक्त करावाच लागेल.
‘मजरुह सुलमानपुरी’ ऊर्फ ‘असरार उल हसन खान’ यांचा उत्तरप्रदेशातील जन्म. तिथल्याच मदरस्यामध्ये भाषांचा अभ्यास. पुढे ‘युनानी’ या वैद्यकीय विषयाची पदवी घेतली; परंतु शौक मात्र मुशायर्‍यातून शायरी, गझल, कविता ऐकवण्याचा. शौकिनांची त्याला उत्तम दाद मिळे म्हणून ‘युनानी’चा व्यवसाय सोडून ‘मजरूह’नी शायर बनायचं ठरवलं व १९४५ साली वयाच्या २६ व्या वर्षी ते मुशायर्‍यात भाग घेण्यासाठी मुंबईत आले. तिथे प्रसिद्ध चित्रपट निर्माते ए.आर. कारदारही आले होते. त्यांनी त्यांना ऐकले. ते भलतेच प्रभावित झाले होते म्हणून त्यांनी त्यांची भेट घेतली व आपल्या पुढील सिनेमासाठी गाणी लिहिण्याची विनंती केली. मजरुहना सिनेमाची गाणी लिहिणे मात्र कमीपणाचे वाटत होते, पण त्यांचे मित्र जिगर मुरादाबादी यांनी त्यांना हा व्यवसाय कसा पैसा व प्रतिष्ठा मिळवून देणारा आहे ते खुलासेवार सांगताच मजरुहचं मन बदललं व ते तयार झाले. ए.आर. कारदार त्यांना घेऊन नौशादजींकडे गेले. नौशादजींनी त्यांना एका चालीवर गाणं लिहायला सांगितलं. त्या ओळी वाचताच नौशादजींनी सिनेमाची सर्वच गाणी त्यांना लिहायला दिली. तो सिनेमा होता १९४६ सालचा ‘शहॉंजहान’ के.एल. सैगल यांचा गाजलेला सिनेमा. यातील संगीत के.एल. सैगल यांना फार प्रिय होते. विशेषत: ‘जब दिल ही टूट गया’च्या ते प्रेमात होते. त्यांच्या इच्छेनुसार हे गाणं त्यांच्या अंत्ययात्रेत वाजविण्यात आलं होतं. ‘चाह बरबाद करेगी’, ‘ए दिले बेकरार झुम’ आणि जे गाणं चालीवर लिहायला दिले ते ‘जब उसने गेसू बिखराये बादल आया झूमके.’ शमशादचे गाणेही फारच मधुर आहे. अशी एकूण १० गाणी पहिल्याच चित्रपटासाठी लिहिण्याची संधी त्यांना मिळाली.
मजरुह स्वत:विषयी म्हणतात, ‘‘मै अकेलाही चला था जानिबे मंझिल मगर, लोग साथ आते गये और कारवॉं बनता गया.’’ मजरुह सामाजिक भान असलेला परंतु डाव्या विचारसरणीचे कवी होते. बलराज सहानी त्यांच्याच पथातील. त्या काळी त्यांनी लिहिलेल्या काव्यांवर आक्षेप घेऊन सरकारने त्यांना तुरुंगातही टाकलं होतं. मजरुह असे एकमेव गीतकार होते ज्यांनी आपल्या ८० वर्षांच्या जीवनयात्रेत, ५४ वर्षांच्या कारकिर्दीत नव्या पिढीतील ‘आनंद मिलिंद’, ‘जतीन ललित’ आणि ‘ए.आर. रेहमान’ अशा सृजनशील संगीतकारांबरोबरही तितक्याच उमेदीने काम केलं होतं.
‘जलते है जिसके लिये’ (सुजाता), ‘शाम ए गम की कसम’ (फूटपाथ), ‘जाईये आप कहॉं’ (मेरे सनम), ‘रहे ना रहे हम’ (ममता) अशी दोन हजारांहून अधिक गाणी चित्रपटांसाठी लिहिली. नव्या पिढीने बेधुंद आनंद घ्यावा असे चित्रपट म्हणजे ‘तिसरी मंझिल’, ‘दिल देखे देखो’, ‘प्यार का मौसम’, ‘कारवॉं’, ‘यादों की बारात’, ‘हम किसी से कम नही’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘जमाने को दिखाना है,’ ‘कयामत से कयामत तक.’ त्यांच्या चित्रपट गीताप्रमाणेच ते अत्यंत समृद्ध जीवन जगले. जुन्या चित्रपट गीतांचा आस्वाद घेताना, ‘मि. मिसेस ५५’, ‘आरपार’, ‘सीआयडी’, ‘पेईंग गेस्ट’, ‘काला पानी’, ‘नौ दो ग्यारह’, ‘सोलवा साल’ अशा चित्रपटांना डावलताच येत नाही. नामांकित संगीतकार व बड्या प्रॉडक्शनसाठी काम करणारे मजरुह सुलमानपुरींचं नाव ओठावर येतं तेव्हा ‘दोस्ती’तील ‘चाहूँगा मैं तुझे…’ हे पुरस्कारप्राप्त गीत सर्वार्थाने त्यांची ओळख म्हणून आपल्या लक्षात राहतं.
‘मजरुह सुलतानपुरी’ यांच्याप्रमाणेच हिंदी सिनेसंगीतातील मानाची सलामी द्यावी असे गीतकार म्हणजे ‘हसरत जयपुरी’ ऊर्फ इक्बाल हुसेन. १९४० साली मुंबईत बस कंडक्टरची नोकरी ११ रुपये पगारावर करणारे हसरतजीही मुशायर्‍यातून आपल्या कविता सादर करायचे. अशाच एका मैफिलीत पृथ्वीराज कपूर आले होते. त्यांनी त्यांना ऐकले व आपल्या सुपुत्राला राज कपूरला सिनेमाची गाणी लिहायला देण्याची सूचना केली. राज कपूर तेव्हा ‘बरसात’च्या संगीताची तयारी करीत होते. त्यांनी त्यांना दोन गाणी लिहायला दिली. संगीतकार शंकर जयकिशनने संगीतबद्ध केलेली ती गाणी होती ‘जीया बेकरार है’ व ‘छोड गये बालम’ आणि त्यानंतर हसरत जयपुरी राज कपूरकडे कायमचे रुजू झाले. ‘मेरा नाम जोकर’ व ‘कल आज और कल’च्या अपयशानंतर राज कपूरजींनी नवे संगीतकार व गीतकारांबरोबर काम करायला सुरुवात केली होती. पूर्वी त्यांनी ‘हिना’साठी गाणी हसरतजींकडून लिहूनही घेतली होती; परंतु रवींद्र जैन यांच्याकडे जेव्हा संगीताची जबाबदारी देण्यात आली तेव्हा त्यांनी हसरतजींची गाणी नाकारून स्वलिखित गाणी संगीतबद्ध केली. हसरत व शैलेंद्र राज कपूरच्या टीममधले सच्चे दोस्त होते. शैलेंद्र स्वत:कडे काम असलं की, आवर्जून हसरतलाही त्यात सहभागी करून घेत असत.
‘एहसान तेरा होगा मुझपर’, ‘दुनिया बनानेवाले’, ‘उनके खयाल आये तो’, ‘यह मेर प्रेम पत्र पढकर’, ‘बहारों फूल बरसाओ’, ‘आंसू भरी है’, ‘छोड गये बालम’, ‘धीरे धीरे चल चांद गगन में’, ‘गम उठाने के लिये,’ ‘एक घर बनाऊंगा’, ‘इस रंग बदलती दुनिया में’, ‘जाने कहॉं गये वो दिन’, ‘पंछी बनू उडती फिरू.’ हसरतजींनी हजाराहून अधिक गाणी सिनेमासाठी लिहिली आहेत, त्यांची गाणी अर्थपूर्ण आणि सहज, सोप्या शब्दातून मांडलेली आठवतील. पॅरिसमध्ये शूटिंगला ते गेले असताना एका नाईट क्लबमध्ये ते मित्रांसह ‘कॅब्रे’ पाहात होते. डान्सरने आपल्या अंगावर चमकणार्‍या दिव्यांचा ड्रेस घातला होता. ते पाहून त्यांना शब्द सुचले ‘बदन पे सितारे लपेटे हुये’ हे पूर्ण गीत तेव्हा शंकर जयकिशन यांनी ऐकलं आणि ते नंतर गाण्याच्या स्वरूपात शम्मी कपूरच्या ‘प्रिन्स’ चित्रपटात त्यांनी उपयोगात आणलं. ‘संगम’ सिनेमात एक पत्र लिहिण्याचा प्रसंग होता. गीत लिहिण्याची जबाबदारी हसरतकडे होती. हसरत तेव्हा ‘राधा’ नावाच्या हिंदू मुलीच्या प्रेमात होता. तिच्यासाठी त्याने एक कविता लिहिली होती. ‘यह मेरा प्रेमपत्र पढकर के तुम नाराज ना होना.’ ती हिंदू तर हसरत मुस्लिम म्हणून ते लग्न करू शकले नाहीत, परंतु ती कविता मात्र राज कपूरच्या सिनेमातील प्रसंगाचे एक अजरामर गीत झाली.
कवी, गीतकार, शायर नेहमीच जागरूक असतात. त्यांचं हृदय नेहमी धडधडत असतं, परंतु त्यातून निर्माण होणार्‍या संवेदना बोलक्या असतात. झोपेतही ते सूरमयी अवस्थेत असतं. शायराचं जीवन म्हणूनच कुणीही त्याच्यावर प्रेम करावं असं हळुवार अर्थपूर्ण असतं. ज्या गाण्याच्या शब्दावर प्रेम केलं जातं, त्यासाठीच ते ऐकलं जातं.
रत्नाकर लि. पिळणकर/९६१९२८७८४८