दस्तक

0
206

तिच्या शोधपत्रकार सहकार्‍याचा फोन तसा अवेळीच वाजला होता. तिने नाराजीनेच फोन उचलला. ‘‘का फोन करतो आहेस? आपलं काय ठरलं होतं? तिसरं महायुद्ध सुरू होतंय का? का त्सुनामीनं एखादा खंड गिळलाय? की सहारात माऊंट एव्हरेस्ट उगवलाय?’’
‘‘असं काहीही झालेलं नाहीय? पण जे झालंय, ते याहूनही भयंकर झालंय. एक व्हिडीओ व्हायरल झालाय.’’
‘‘म्हणून तू मला फोन करतोयस?’’
‘‘तो बघ जरा अन् मग ठरव, काय ठरवायचं ते.’’
तो व्हिडीओ अतिरेक्यांनी प्रसारित केला होता. मेलोडी (तिचं टोपण नाव) एका कोचावर बसलेली दिसत होती. तिनं बुरख्यानं (हिजाब) आपला चेहरा झाकलेला होता. फक्त डोळे तेवढे दिसत होते. तिची- मेलोडीची झोप एकदम उडाली. विस्फारलेल्या डोळ्यांनी आ वासून ती बघत राहिली व कान टवकारून ऐकू लागली.
‘‘जगातील बांधवांनो, हा चेहरा नीट निरखून लक्षात ठेवा. जिथे असेल तिथून हुडकून काढा. तिने अल्लाचा अपमान केला आहे. ती सापडताच इस्लामी कायद्यानुसार तिला ठार करा. ती तासन्‌तास तडफडत राहिली पाहिजे. तिनं इस्लामला वाकुल्या (मॉक) दाखवल्या आहेत. त्याची किंमत तिला रक्तानं मोजावी लागेल. ती कुत्र्यापेक्षाही अपवित्र आहे. दगडानं ठेचा.’’ फतवा जारी झाला होता.
कोण होती ही मेलोडी? मेलोडी हे तिचं टोपणनाव होतं. तशी तिची आणखीही टोपणनावं होती. तिचं खरं नाव कधीच कळणार नव्हतं. सर्व हकीकत संबंधित सर्वांची नावे, गावे वगळूनच बाहेर येईल, अशी काळजी ती नोकरी करीत असलेल्या वृत्तपत्रानं घेतली होती.
फतवा अबू बिलालने जाहीर केला होता. बिलाल फ्रेंच व अरेबिकमध्ये किंचाळत होता. तिनं व्हिडीओ बंद केला. दुसर्‍यांदा तो बघण्याची तिची हिंमतच नव्हती. आवश्यकताही नव्हती. शब्दन्‌शब्द आयुष्यभर लक्षात राहणार होता.
अनेक पत्रकारांप्रमाणे तिचाही (मेलोडी) फेसबुकवर खोट्या नावानं अकाऊंट होतं. यामुळे इतरांच्या नकळत घटनांवर नजर ठेवणं सोपं असतं.
फेसबुकवरची ही मेलोडी वीस वर्षांची कुमारिका होती. म्हणजे खर्‍या (ती तरी खरी होती कुठे?) मेलोडीनं वयाची थोडीथोडकी नव्हेत, तर १५ वर्षे तरी नक्कीच चोरली होती.
एक दिवस ती मुख्य संपादकांच्या केबिनमध्ये गेली आणि भाडभाड बोलू लागली. ‘‘मला इसिसच्या जिहादींवर लिहायचंय. लोक एवढे जिवावर उदार कसे काय होतात? ते मला जाणून घ्यायचंय. जगातील शेकडो मुली त्यांच्यावर कशा काय भाळतात? हे जाणून घ्यायचंय.’’ मुख्य संपादक तिच्याकडे काहीही न बोलता पहातच राहिले. ‘‘हे वेड तुला कसं काय लागलं?’’
‘‘मी यू ट्यूबवर जिहादींनी लोकांचे केलेले हाल बघितले आहेत.’’
‘‘सलाम आलेकुम, तू माझे व्हिडीओ बघतेस, असं मला कळलंय. तू मुस्लिम आहेस का?’’ अबू बिलाल बोलत होता.
पॅरिसमधल्या फ्लॅटमध्ये एका कोचावर बसून मेलोडी फेसबुकवर असताना बिलालनं तिच्याशी संपर्क केला होता. सीरियातील एका छावणीतून तो बोलत होता. तो पस्तिशीचा असावा. तो एसयूव्हीमध्ये बसून बोलत होता. एसयूव्ही हा एक लहानसा, सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज असा ट्रक असतो. हा ट्रक रस्त्यावर किंवा रस्ताविरहित जमिनीवरही चालू शकतो. त्याचा चेहरा मैदान मारून आलेल्या सैनिकासारखा थकलेला असावा, असे तिला वाटले. त्याने आपले नाव अबू बिलाल असे सांगितले. जगप्रसिद्ध रे-बॅन कंपनीचा गॉगल त्याच्या डोळ्यांवर होता. पाठीमागे बुलेटप्रुफ जाकीट व मशीनगन लटकवलेली दिसत होती. तो तोतया नक्कीच नव्हता. पुढे हळूहळू तिला कळले की, तो गेली पंधरा वर्षे जिहादी प्रमुख होता. लवकरच तिला कळले की, तिच्या खाजगी इनबॉक्सवर एक नाही दोन नाही तर तीन मेसेजेस आहेत.
‘‘तुझा सीरियाला यायचा विचार आहे का?,’’ एका मेसेजमध्ये पृच्छा होती.
मेलोडीने उलट जबाब पाठविला, ‘‘आलेकुम सलाम, मला वाटले नव्हते की, एका जिहादी नेत्याला या नाचीजशी बोलण्यासाठी वेळ काढता येईल? तुला तर खूप कामं असतील ना?’’
मेसेजेसची देवाणघेवाण होत राहिली. मेलोडीने सांगितले की, ती एक धर्मांतरित मुस्लिम आहे, पण तिच्या घरी हे माहीत नाही. तिने उत्तरे पाठविताना जाणीवपूर्वक बाळबोध भाषा वापरली होती व स्पेलिंगच्या चुका जाणीवपूर्वक केल्या होत्या. (युरोपातील तरुणींनाच नव्हे, तर जगातील अनेक मुलींना इस्लाम व जिहादींबद्दल आकर्षण आहे. त्या जिहादींवर सहज भाळतात, त्यांच्यावर फिदा होतात व गुपचूप इस्लाम कबूल करतात. घरच्यांना याचा पत्ताही नसतो. युरोपातील मुली ख्रिश्‍चन आईबापांच्या पोटी जन्माला आलेल्या असतात. व्यक्तीला ख्रिश्‍चन धर्म जन्मत: प्राप्त होत नाही. तो त्याला जाणीवपूर्वक व स्वेच्छेने स्वीकारावा लागतो.)
‘‘रात्रीचे अकरा वाजले आहेत. आता थांबू या गडे. आई यायची वेळ झाली आहे,’’ एक दिवस बोलणं थांबवण्यासाठी ती (मेलोडी) म्हणाली.
‘‘ठीक आहे, पण उद्या स्काईप करायचं, असं कबूल कर अगोदर.’’ अबू बिलाल रंगात आला होता. ‘‘तू इस्लाम कबूल केला आहेस ना? मग आता हिजिरासाठी- त्या पवित्र प्रवासासाठी- तू तयार असलंच पाहिजेस. (हजरत महंमद साहेबांनी आपल्या जिवाला धोका असल्यामुळे अनुयायांसह मक्केहून मदिनेला इसवि सन ६२२ च्या जून महिन्यात केलेल्या प्रवासाला हिजिरा असे नाव आहे.) मी सगळी व्यवस्था करतो.’’
कमाल आहे, मेलोडी स्वत:शीच म्हणाली, ओळख ना पाळख आणि हा गडी मला चक्क भूतलावरील सर्वात जास्त रक्तरंजित प्रदेशात बोलावतोय.
‘‘तुझा कुणी बॉय फ्रेंड आहे का गं?,’’ स्काईप केल्यावर अबू बिलालनं विचारलं?
‘‘याला कशाला हव्या आहेत नसत्या पंचायती?,’’ मेलोडी स्वत:शीच मनातल्या मनात म्हणाली.
‘‘मी तुझा बॉय फ्रेंड झालेलो आवडेल तुला? ते सांग अगोदर.’’ अबू बिलालच्या बोलण्यातली अधिरता तिला जाणवत होती,
पण तीही अस्सल फ्रेंच तरुणी होती. काहीही न बोलता तिनं फेसबुक बंद केलं. तिनं घड्याळात पाहिलं, ती दोघं तब्बल दोन तास बोलत होती. या चॅटिंगच्या काळात मोजून १२० मेसेजेसची देवाणघेवाण झाली होती.
मुख्य संपादक तिला म्हणत होते, ‘‘तुला वाटेल तेव्हा तू बाहेर पडू शकतेस. आतापर्यंत जे मिळालं आहे तेही खूप आहे.’’
मेलोडीनं मदिनेला जायचं ठरविलं, पण संपादक म्हणाले की, ‘‘काहीही झाले तरी तुला एकटीला मी ही जोखीम उचलू देणार नाही. आपला फोटोग्राफर आंद्रे तुझ्या सोबतीला असेल. सुरुवातीला स्काईप होतानाचे फोटो कोचाच्या मागे दडून तो घेईल. व्हिडीओ क्लिप तयार करील. पुढे तुझी सोबतही करील. तू एकटी जाणार नाहीस हे मात्र नक्की.’’
मी चांगली पस्तीस वर्षांची बाई आहे. ती त्याला (अबू बिलालला) वीस वर्षांची टवटवीत तरुणी कशी वाटणार ? मेलोडीला काही सुचत नव्हते. शेवटी हिजाबच्या (डोईचे कसे व मान झाकतो) जोडीला जिलाबाही (पूर्ण देह झाकणारे अंगभर व पूर्ण बाह्या असलेले एकजिनसी वस्त्र) परिधान करावा, असे ठरले, पण चेहर्‍याचे काय? रंगरंगोटीनं तारुण्य फुलवायचं असं ठरलं. माझ्या पोटात सतत भीतीचा गोळा उठायचा. माझा झाकलेला का असेना, पण चेहरा तो (अबू बिलाल) पाहणार. तोही (अबू बिलालही) मूळचा फ्रेंचच होता. शोध घेत कधीही फ्रान्समध्ये येऊ शकला असता.
एक दिवस स्काईपसाठी आम्ही सज्ज झालो. आंद्रे कोचाअडून फोटो घेणार होता. एक तास झाला पण काहीच घडेना. मेलोडीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आपलं बिंग फुटलं तर नाही ना? शेवटी एकदाचा अबू बिलाल आला. लढाई मारून तो थकूनभागून आला होता. जीन्स व स्वेटर झाकण्यासाठी मी जिलाबा व डोके झाकण्यासाठी हिजाब परिधान केला. बोटातली अंगठी काढून ठेवली होती. मनगटावरील टॅटू फाऊंडेशन चोपडून झाकले होते. कारण असा थिल्लरपणा अबू बिलालला आवडला नसता. चेहरा वय उघड न करो, अशी प्रार्थना केली, पण त्याला डोळ्यांशिवाय फारसं काही दिसणारच नव्हतं.
आणि स्काईपचे चित्रीकरण आंद्रेने कोचाअडून सुरू केलं. संपादकांनी बजावलं होतं, अतिरेक्यांचे हेरगिरी ओळखण्याचे तंत्र अद्ययावत असते. जराही शंका आली तर स्काईप बंद कर. मेलोडीचा खोटा फोन नंबर व खोटा स्काईप अकाऊंट अगोदरपासूनच तयार होता.
रिंगटोन आला. मेलोडीनं एक दीर्घ श्‍वास घेतला व बटन ऑन केलं. अबू बिलालचे भेदक डोळे आपला चेहराच नव्हे, तर जिलाबानी झाकलेला देहही निरखीत होते, असे तिला वाटलं.
‘‘सलाम आलेकुम’’- मेलोडीनं चाचरतच म्हटलं, ‘‘सीरियातील मुजाहिदा (गनिमी काव्याने लढणारे अतिरेकी) बरोबर बोलताना मी पार बावरून गेले आहे. आम्हा मुलींना तुम्ही जिहादी खूप आवडता. (दुर्दैवानं हे मात्र सत्य आहे) तुला स्काईप करता आलं?’’
‘‘परमेश्‍वर कृपेने सीरियात सर्व सोयी आहेत. हा स्वर्गच आहे. अनेक सुंदर्‍या या ईश्‍वरासाठी लढणार्‍या आम्हा योद्ध्यांच्या अवतीभवती विहार करीत असतात,’’ अबू बिलाल फुशारकी मारीत म्हणाला.
‘‘पण मी ऐकलंय की, या स्वर्गात दररोज अनेक लोकांची हत्याही होत असते, म्हणून,’’ मेलोडी धैर्य एकवटून म्हणत होती.
‘‘तू म्हणतेस ते खरं आहे, पण या हत्या, हत्या थांबवण्यासाठीच होत असतात. इथे आमच्यासमोर शत्रू नाहीत, हैवान आहेत. त्यांना संपवायलाच हवं, पण ते जाऊ दे. मला सांग, तू हिजाब रोज घालतेस का? अल्लाने दाखवलेल्या वाटेला तू कशी काय वळलीस? इस्लाम कसा काय कबूल केलास?’’
मेलोडीला देव आठवले. इस्लाम कबूल केलेल्या मेलोडीच्या तथाकथित नातेवाईकांबद्दल तिने तोपर्यंत काहीही विचार केला नव्हता. काहीशी चाचरत व काहीशी अडखळत ती म्हणाली, ‘‘काय झालं, माझा एक दूरचा भाऊ आहे. त्यानंही इस्लाम कबूल केला आहे. यानंतर त्याला मन:शांती लाभली, असं त्याचं म्हणणं आहे. त्यानंच मला गाईड केलंय.’’
‘‘अल-शामला यायची तुझी इच्छा आहे, हे त्याला माहीत आहे का?’’ अबू बिलालने विचारले.
देवा रे देवा, हा तर सगळं गृहीतच धरून चाललाय. ‘‘सीरियात येण्याबद्दल मी अजून काहीच विचार केलेला नाही,’’ मेलोडीनं भीतभीतच म्हटलं.
‘‘मेलोडी, हे बघ. मी तुझी सगळी काळजी घेईन. माझ्यासाठी तू कोण आहेस, म्हणून सांगू? तू जर माझ्याशी लग्न करायला तयार झालीस ना, तर अगदी राणीसारखं ठेवीन बघ तुला.’’
मेलोडीनं स्काईप बंद केला. हिजाब व जिलाबा काढून दूर भिरकावला. ती थरथरतच कशीबशी उभी झाली. मागे पाहते तो आंद्रेही स्क्रिनिंग थांबवून डोळे विस्फारून व भेदरून तिच्याकडे पहात होता. असं असूनही त्यानं कॅमेर्‍याकडे बोट दाखवलं. व्हिडीओ क्लिप तयार झाली होती.
‘‘काय सांगू रे? मला काहीच सुचत नाहीय,’’ मेलोडीनं आंद्रेलाच विचारलं.
आतापर्यंत तो काहीसा सावरला होता. तो मिस्कीलपणे हसत म्हणाला ‘‘अगं, तुझ्यासारखी ऐन विशीतली कुमारिका सीरियाला एकटी कशी काय जाणार? भाऊ असेल बरोबर म्हणून सांग.’’
हे बोलणं पूर्ण होतं न होतं तोच अबू बिलाल पुन्हा स्काईपवर आला.
‘‘मी एकटी कशी येणार? यास्मीन ही माझी बहीणसुद्धा १५ वर्षांचीच आहे.’’ आपली सबब लंगडी आहे हे मेलोडीला कळत होते. पण, काहीतरी सांगून वेळ मारून न्यायलाच हवी होती ना?
‘‘अगं, इथे चौदा वर्ष आटोपली ना, की मुली मोठ्याच मानल्या जातात. तिच्यासाठीसुद्धा एखादा फक्कडसा नवरा शोधून देईन की. त्यात काय मोठंसं?’’
मुळात यास्मीन होतीच कुठे? पण कितीतरी खर्‍या यास्मीन भुरळ पडून सीरियात जात असतील, नाही का? मेलोडीच्या मनात एकच काहूर माजलं होतं.
‘‘बिलाल, हे बघ आता थांबायला हवं, आतापर्यंत ती दोघं एकमेकांना नावानं संबोधू लागली होती. आई यायची वेळ झालीय, बघ.’’
‘‘ठीक आहे, उद्या पुन्हा भेटूच, गुड बाय, बेबी!’’ अबू बिलालने स्काईप बंद केला.
‘‘बघू, बघू, आमची बेबी कशी दिसते ते?’’ फोटोग्राफर आंद्रेचीही भीती व भीड दोन्ही आतापर्यंत बरीच चेपली होती. त्यानं कॅमेरा ऑफ करता करता मेलोडीला खिजवलं.
मेलोडी सीरियाला जाणार हे कळताच फेसबुकवरच्या तिच्या अनेक मैत्रिणी तिला भंडावून सोडू लागल्या. सीरियाला जाण्यासाठीचा सर्वात सुरक्षित मार्ग कोणता? महिलांसाठीची सगळी, म्हणजे अगदी सगळी बरं का, वस्त्रे तिथे मिळतील का गं? जसं काही मेलोडी स्वत: सीरियात बरीच वर्षे राहत आली होती. ‘‘ए, स्वीमिंग सूट बरोबर नेला तर चालेल का?’’ एका कुमारिकेनं दबलेल्या आवाजात विचारलं, ‘‘सोबत अतिशय आखूड अंतर्वस्त्रे (थॉंग अंडरवेअर) आणलेली पाहून तिथल्या लोकांना काय वाटेल गं? ही मुलगी विनयशील नाही, असं नाही ना वाटायचं त्यांना? नकोच ते, नाही का?’’ मेलोडी प्रश्‍नांचा हा भडिमार ऐकून स्तंभितच होत होती. ती मनातल्या मनात ओरडत होती, बायांनो, नरक आहे तो नरक. तिथं कशाला मरायला जायचे डोहाळे लागले आहेत तुम्हाला? नरकाकडे जायचा एकमार्गी रस्ता आहे तो. परतीची वाटच नाही, पण काय करणार? गप्प राहणं भागच होतं.
पण आता मेलोडीची भीड व भीती पुरती चेपली होती. ती आता मुळीच डळमळत नव्हती की डगमगत नव्हती. सीरियात जायचंच. अतिरेक्याच्या गुहेचे दार ठोठवायचंच, दस्तक द्यायचीच, असा तिने निश्‍चय केला. ती अबू बिलालशी सतत बोलत राहिली. त्याला शंका यायला नको, याची काळजी घेत राहिली. तिचा अभिनय इतका उत्तम वठत होता की, खुद्द आंद्रेलाही (फोटोग्राफर) शंका येऊ लागली की, ही बया खरंच अबू बिलालच्या प्रेमाबिमात पडली आहे की काय? पण मेलोडी त्याला सांगत होती, ‘‘अरे, कसंच काय? अरे, तो प्रेमात येऊन बोलतो ना, तेव्हासुद्धा भयानकच दिसतो आणि आपल्याकडच्या या बावळट मुली त्यांच्यावर फिदा होतात. मूर्ख, बावळट की भुरळ पडलेल्या? काय म्हणायचं, त्यांना?’’
अबू बिलाल तर आता तिला पत्नी म्हणूनच संबोधू लागला. सीरियातील राक्का हे अतिरेक्यांचे एक मजबूत केंद्र आहे. तिथल्या काझीशी बोलून त्यानं निकाबाबतीतल्या सगळ्या विधींची व्यवस्था पूर्ण केली होती.
‘‘अरे, पण तिथला विवाह समारंभ असतो कसा, ते तरी सांगशील का?’’ मेलोडीनं धीर करून विचारलंच.
‘‘कसला समारंभ अन् कसलं काय? आपला निका झालासुद्धा आहे! आता आपण नवरा-बायको आहोत,’’ अबू बिलालने तिला पटवण्याचा प्रयत्न केला.
‘‘असं कसं होईल? मला समजेल असं काही बोलशील का?,’’ मेलोडीने आपला हेका कायम ठेवीत म्हटलं.
‘‘अगं, असं बघ. मी तुला निकाबद्दल विचारलं ना? तू हो म्हणालीस ना? मी काझीशी बोललो आहे. त्यानं सगळी कागदपत्रं तयार ठेवली आहेत. सगळ्या अटी, सगळे सोपस्कार पूर्ण झाले आहेत. आता तू माझी बायको आहेस. काय समजलीस?’’
मेलोडीला काहीच समजत नव्हतं. ती व आंद्रे मुख्य संपादकांना भेटले. मुख्य संपादकांना मिळाली तेवढी माहिती पुरेशी वाटत होती. सर्व संपादकांची खलबतं झाली. झालं एवढं पुरे झालं, असंच त्यांना वाटत होतं. पुरेसे पुरावे हाती लागले होते. व्हिडीओही तयार होता, पण मेलोडी आता मागे हटायला तयार नव्हती. तिनं अबू बिलालला कळवलं की, ती आणि यास्मीन प्रथम मस्टरडॅमला व तिथून इस्तंबूलला येत आहेत.
‘‘ये. लगेच ये. राक्का इथला राजवाडा आपल्या राणीच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे.’’ अबू बिलाल अतिशय अधीर झालेला मेलोडीला जाणवत होतं.
त्या दोघी म्हणजे ती व यास्मीन नव्हे, तर प्रत्यक्षात ती दोघं म्हणजे मेलोडी व आंद्रे इस्तंबूलमध्ये दाखल झाले. एक वयस्क मदर अम्मी तिथे येईल आणि तिला पुढे घेऊन जाईल, असे ठरलं होतं. मदर अम्मीच्या भेटीचंही चित्रण (व्हिडीओ) करण्याचं ठरलं होतं. लेखात मदर अम्मीचा फोटो महत्त्वाचा ठरणार होता. किल्ल नावाच्या गावी जायचं ठरलं. हे गाव तुर्कस्थानला लागून आहे. त्यामुळे तिथून निसटणं त्यातल्या त्यात सोपं असणार होतं.
या ठिकाणी ही कहाणी संपणार होती. मेलोडी सीरियाच्या सीमेवर उभी राहणार होती. या पृष्ठभूमीवर आंद्रे तिचा फोटो काढणार होता. एक महिला शोधपत्रकार नरकाच्या दाराशी हिमतीनं उभी राहणार होती. अतिरेक्यांच्या गुहेच्या दारावर दस्तक देणार होती. तिथेच दी एंड ठरला होता.
पण कहानी में ट्विस्ट म्हणतात ना, तसं घडलं. तिच्याजवळ काही पैसे आहेत का, असं अबू बिलालनं विचारलं. आईच्या डेबिट कार्डमधून चोरलेले पैसे मेलोडीजवळ आहेत, असे कळताच, अबू बिलालनं तिला काही अत्तरे व आफ्टर शेव्ह लोशन विकत घेण्यास सांगितलं. तिथं या वस्तू ड्युटीफ्री मिळाल्या असत्या. मदर अम्मी केव्हा येणार आहे, असे विचारताच, आता आणखी कुणीही येणार नाही. कारण तिच्यावर पाळत ठेवलेली असू शकते, असं अबू बिलालनं सांगितलं.
पण मदर अम्मी येईल, ती आम्हाला पुढे घेऊन येईल, असं ठरलं होतं ना? ही आमच्या सुरक्षिततेची हमी होती, असं तूच म्हणाला होतास ना?, मेलोडी आता खरंच धास्तावली होती, पण तिनं आपला मुद्दा सोडला नाही.
‘‘बकवास बंद कर,’’ अबू बिलाल एकदम खेकसला. ‘‘आता मी सांगतो तसंच करायचं. उर्फाची विमानाची दोन तिकिटं काढा आणि उर्फाला निघून या.’’ उर्फा हा अतिरेक्यांचा बालेकिल्ला होता. तिथून जिवंत बाहेर पडणं कठीणच नव्हे, तर अशक्यच होतं.
‘‘तू दिलेला शब्द पाळावास, असं मला म्हणायचं होतं. रागावतोस कशाला?,’’ मेलोडीनं पुन्हा एकदा सर्व धैर्य एकवटून म्हटलं.
‘‘नवर्‍याशी तोंड वर करून बोलताना शरम वाटत नाही तुला? बेशरम औरत? लक्षात ठेव. यापुढे मी म्हणेन तसंच वागायचंय तुला. बकवास बंद कर. मी कोण आहे माहीत आहे ना तुला? शंभर जिहादी माझ्या एका इशार्‍याची वाट पाहत आहेत. सत्य काय आहे, हे तुला माहीत नाही, असं दिसतंय.’’
आता मात्र मेलोडी पुरती भेदरली. अबू बिलालला तिचा संशय तर आला नसेल ना? तोच तिला खेळवत तर नसेल ना? मेलोडीनं सगळी इस्लामी वस्त्रं तत्काळ काढून फेकली. संपादकांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी तिला ताबडतोब फ्रान्सला परत येण्यास फर्मावलं.
फ्रान्सला परतताना मेलोडानं अबू बिलालला स्काईपवरच मेसेज पाठविला. एका अपरिचित व्यक्तीनं त्यांची उलटतपासणी केली आहे, बहुदा तो इन्स्पेक्टर असावा, अशी लोणकढी थाप तिनं मारली. त्यांच्यावर (मेलोडी व यास्मीन) कुणीतरी पाळत ठेवीत आहे, अशी त्यांना शंका आल्यामुळे त्या फ्रान्सला परत जात आहेत. परिस्थिती निवळताच आपण परत येऊ, अशी पुस्ती जोडण्यास ती विसरली नाही.
फ्रान्सला परत आल्यानंतर तिनं अनेक लेख लिहिले. व्हिडीओ क्लिप्सही होत्याच. सर्व शोधसंस्थांनी तिची जबानी नोंदविली. त्यांची एकूण संख्या २५४ आहे.
इकडे शोधसंस्थांनी अबू बिलालची साद्यंत हकीकत शोधून प्रसिद्ध केली. त्याला २०, २८ व ३९ वर्षांच्या तीन बायका आहेत. त्याची तीन मुलं १३ वर्षांपेक्षा लहान आहेत. मोठी दोन सीरियात कुठेतरी लढताहेत. (तो स्वत: नुकताच मारला गेल्याच्या वार्ता आहेत.)
मेलोडीला आता काहीसं सुरक्षित वाटू लागलं होतं. हिजाबमुळे फक्त डोळेच दिसत असल्यामुळे तिची व अबू बिलालची जी काय दृष्टादृष्ट झाली असेल तेवढीच. सतत झाकलेला असल्यामुळे तिचा चेहरा त्याला कधीच दिसला नव्हता.
पण आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणं अबू बिलालचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. फतवा निघाला होता. हालहाल करून ठार मारण्याची शिक्षा आता तिचा सदैव पाठलाग करणार होती. आता एकूणएक ओळखी पुसून टाकून अज्ञातस्थळी अज्ञातवासात राहणं व सतत निवासस्थान बदलणं भाग होतं. इसिसची गुप्तहेर शाखा जगात अव्वल समजली जात असल्यामुळं फ्रान्सला ही काळजी घेणं भागच आहे.
वसंत गणेश काणे/९४२२८०४४३०