काळसर्प-१

0
218

केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विजयन हे मुख्यमंत्री झाल्यापासून संघविचारी कार्यकर्त्यांवर जाणीवपूर्वक योजना आखून हल्ले होत आहेत. आजवर २५० च्यावर घटना घडलेल्या आहेत. ज्यांनी अखलाखचे वेळी छाती पिटून आक्रोश केला होता, त्यांच्या पर्यंत या बातम्या पोहोचल्या नसतील असे नाही. पण संघाच्या कार्यकर्त्यांना आणि अन्य हिंदुत्ववाद्यांना कुठे मानवाधिकार लागू होतो?
मागच्या वर्षी याच दरम्यान जेएनयू व रोहित वेमुला घडून गेले, उमर खालिद आणि त्याचे अन्य सहकारी देश तोडण्याच्या घोषणा देऊन गाजले. आता गुरमेहर अवतरली…. ‘मानवाधिकार व विचार स्वातंत्र्य’ हे फक्त देशद्रोही घोषणा देणार्‍यांनाच लागू असते. कॉंग्रेसच्या काळापासून साम्यवादी विचारधारा महाविद्यालयात जाणीवपूर्वक रुजवण्यात आली. त्याविरुद्ध जो बोलेल तो जातीयवादी अथवा घटनाविरोधक ठरवला जाऊ लागला. माध्यमात बाजू सावरून घ्यायला त्यांचे बगलबच्चे बसले आहेतच. ते विविध पुरस्कारप्राप्त असल्यामुळे बुद्धी वगैरे फक्त त्यांच्याकडे असते, असा त्यांचा आणि माध्यमांचा समज असतो. हे लोक मार्क्सवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या वेळी शहामृगासारखे भुईत तोंड खुपसून बसलेले असतात. त्यामुळे त्याबद्दल त्यांना काहीच माहिती नसते. नक्षलवादी सगळे फार प्रामाणिक आणि गरीब बिच्चारे असतात असा केवळ यांचाच समज असतो. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ते बोलूच शकत नाहीत. शोषित आणि वंचितांची बाजू घेणारे असे ते असतात ना…! मग त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात कसे बरे उभे करायचे?
मुद्दाम या लोकांच्या पूर्वसूरींचा इतिहास खंगाळून बघा. आपण आश्‍चर्यचकित होऊन जाऊ अशा गोष्टी आढळतील. असे जागतिक काळसर्प बनलेले हे लोक असून त्यांची वाढ आपल्याकडे कशी होते आहे, याचे आश्‍चर्य वाटते. तथापि सारे काही नाकारायचे, हे खूप सोपे असते आणि त्याला कष्ट लागत नाहीत. म्हणून यांचे तथाकथित तत्त्वज्ञान पाय पसरते आहे. तोंडाने गरीब, शोषित, वंचित, कामगार, आदिवासी असा जप करत त्यांच्या भल्यासाठी आपण काम करतो आहोत, असे दाखवत प्रस्थापित व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे स्वप्न तरुणांना दाखवायचे हे यांचे काम होय. त्यासाठी तोंडात गांधी आणि बगलेत पिस्तुल असा खाक्या अवलंबायला देखील ते मागेपुढे पहात नाहीत. यांच्या(अ) विचारांचा उदोउदो करणारे थोर साहित्यिक आणि विचारवंत म्हणून सर्वत्र गौरवले जातात.
रोबर्ट कॉंक्वेस्टचे ‘द ग्रेट टेरर’ वाचले तर आपल्याला कम्युनिस्टांच्या खुनशीपणाची कल्पना येते. १९१७ मध्ये रशियात सत्तापालट झाला. बोल्शेव्हिकांनी क्रांती करून झारशाही उलथून टाकली. १७२१ मध्ये पीटर द ग्रेट याच्या अधिपत्याखाली रशियन साम्राज्य उदयाला आले होते. जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश म्हणजे रशिया होय, अशी ओळख होती. पुढे रशियाच्या पंधरा प्रांतांचे पंधरा देश झाले आणि मार्क्सवाद कोसळून पडला. पहिल्या महायुद्धाच्या काळात क्रांती झाली आणि व्लादिमिर इलिच उल्यानोव्ह लेनिन हा सर्वेसर्वा झाला. त्याला मार्क्सच्या विचारानुसार बांधणी करायला एक मोठा देश मिळाला. मार्क्सवाद म्हणजे शोषण, गरिबी, विषमता आणि साम्राज्यवाद या विरुद्ध युद्ध होय. अर्थात युद्धात माणसे मरणारच आणि ते क्षम्य असणार, कारण मरणारे हे शोषकच असणार. अशा या युद्धात किमान दोन लक्ष रशियन नागरिक ठार करण्यात आले. त्यात धर्मोपदेशक, बुद्धिमंत, श्रीमंत, जमीनदार, उजवे, बंडखोर, भांडवलदार आदी होते. शेतीच्या सामुदायिकीकरणाच्या निर्णयामुळे शेतकरी नाराज झाले. कम्युनिझममध्ये नाराजीला थारा नसतो. अशांना गोळी हेच उत्तर असते. त्यानुसार किमान तीन लक्ष शेतकर्‍यांना ठार करण्यात आले. लेनिन नंतर आलेल्या स्टालिनने कुलक म्हणजे श्रीमंत शेतकर्‍यांविरुद्ध केलेल्या कारवाईत सुमारे एक कोटीहून अधिक लोक ठार केले. लेनिन आणि स्टालिन यांच्या साम्यवादी राजवटीने रशिया आणि अन्य देशातील किमान दहा कोटी, पन्नास लक्ष माणसे ठार केल्याचे माहिती वर नमूद केलेल्या पुस्तकात दिली आहे.
सोवियेत सेना अफगाणिस्तानात १९७९ मध्ये शिरली. पुढे १९८८ पर्यंत किमान साडे दहा लक्ष अफगाणींना गृहयुद्धात जीव गमवावे लागले.
चीनमधील माओची वेगळीच तर्‍हा होती. त्याने १९४९ मध्ये सत्ता हस्तगत करताच जमिनीच्या न्याय्य वाटपासाठी किमान पाच कोटी लोकांना मरावे लागेल असे जाहीरपणे सांगितले व सत्तेवर येताच लगोलग दहा लक्षांना ठार करून दाखवले. पुढे ‘द ग्रेट लीप फोरवर्ड’ ही योजना हाती घेतल्यावर जो जनक्षोभ उसळला. त्याला आटोक्यात आणण्यासाठी साडे चार कोटी चिनी नागरिकांना ठार केले. १९६६ च्या सांस्कृतिक क्रांतीत किमान तीन कोटी नागरिक मारले गेले. अलीकडच्या काळात तिआनमेन चौकात विद्यार्थ्यांवर रणगाडे घालून त्यांना ठार केल्याची घटना सर्वविदित आहे.
अहो खलभुजङ्‌गस्य विपरीतो वधक्रम:|
अन्यस्य दंशति श्रोत्रमन्य: प्राणैर्वियुज्यते॥
(दुर्जनरूपी सर्पाची मनुष्याला ठार मारण्याची तर्‍हा किती विचित्र आहे, तो एकाच्या कानाला डसतो आणि प्राण मात्र दुसर्‍याचे घेतो.)
कंबोडियात मार्क्सवादी पॉल पॉटच्या खमेर रूज राजवटीने केवळ चार वर्षांच्या काळात वीस लक्ष लोकांना ठार केले. उत्तर कोरियात आठ लक्ष तर व्हियेतनाममध्ये नऊ लक्षांना ठार करण्यात आले. जगभरात जिथे कम्युनिस्ट राजवट होती तिथे स्वर्ग अवतरल्याचे दिसत नाही उलटपक्षी लोकांच्या पदरी नरक यातना आल्याचे दिसते.
रुडोल्फ जोसेफ रुमेल या अमेरिकन राजकीय शास्त्रज्ञाचा परिचय त्याच्या पुस्तकातून करून देण्याचे काम आमचे स्नेही मल्हार कृष्ण गोखले यांनी केले. रुमेलने राजकीय हिंसा, युद्धातील हिंसा आणि सामुदायिक हिंसा यावर तब्बल चोवीस पुस्तके लिहिली आहेत. तो म्हणतो, आजवरच्या सर्व धार्मिक वा अन्य संघटनांमध्ये सर्वात हिंसक सांप्रदाय म्हणजे मार्क्सवाद होय. त्याच्यासमोर इन्क्विझिशन, कृसेड्स अथवा कॅथॉलिक व प्रोटेस्टंट यांच्यातील तीस वर्षांचे युद्ध या सर्व गोष्टी अगदी फिक्या पडतील. मार्क्सवाद म्हणजे खोटे न्यायालयीन खटले, भयानक यातनातळ, मनुष्यनिर्मित दुष्काळ, कायदेशीर ठरवलेल्या बेकायदा फाशीच्या शिक्षा, रक्ताळलेला दहशतवाद, मृत्यूच्या साहाय्याने केलेली साफसफाई थोडक्यात सामुदायिक हत्या आणि सामुदायिक वंशविच्छेद होय.
स्वर्ग प्रत्यक्षात आणण्यासाठी धर्मोपदेशक, श्रीमंत, जमीनदार, बुद्धिमंत, प्रतिक्रांतिकारक, भांडवलदार, बंडखोर आणि पांढरपेशा वर्गाला मरावेच लागेल, असे या कत्तलींच्या समर्थकांचे म्हणणे होते. मार्क्सने कदाचित काही एका उदात्त विचाराने दास कपिताल हा ग्रंथ लिहिला असेल. त्याची पुनर्मांडणी कोणीच केली नाही. मार्क्स मेल्यावर एंगल्सने त्याचे पुढील भाग लिहिले.
हा उदात्त आणि तेजस्वी (?) इतिहास आहे साम्यवादी काळसर्पाचा. विस्तारभयामुळे तो अगदी थोडक्यात दिला आहे. आपल्या देशात मात्र यांना जास्त थैमान घालता आले नाही. आता विविध माध्यमांतून आणि वेगेवेगळ्या विचारप्रणालीतून ते घुसण्याचा प्रयत्न करीत आहेत. सरकार बदलल्यामुळे त्यांच्या सर्व प्रकारच्या कार्यपद्धतींना एकाएकी खीळ बसली आहे. त्यांचे कित्येक एनजीओ बंद झाले आहेत. सांप्रत काळी त्यांच्या पिसाळण्याचे ते एक मोठे कारण आहे, इतकेच.
डॉ. सच्चिदानंद शेवडे