डोके बुवा (समाधी इ. स. १८७७)

0
260

विदर्भातील संतपरंपरा

डोकेबुवांच्या परंपरेतील श्‍लोक असा-
आदावादि गुरूं हरिंच सततं श्रीरामचंद्रं मुनिम्‌॥
योगाधीश मुकुंदराज विबुधं श्रीमन्नृसिंह परम्‌॥
सच्चिन्मात्र जगत्पतिंच सहजं श्रीरंगकं केशवम्‌॥
वंदे शंकर विश्‍वनाथ मनिशं गोविन्दवै लक्ष्मणम् भजेत्‌॥
यावरून यांची परंपरा मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांचे आजेगुरू श्री हरिनाथ महाराजांपासूनची आहे असे दिसते. ही परंपरा अशी- श्रीहरिनाथ-रघुनाथ-मुकुंदराज-नृसिंहस्वामी-सहज-रंगनाथ-केशव-शंकर-विश्‍वनाथ-गोविंद-लक्ष्मण. यातील शेवटले गोविंद म्हणजे चंद्रपूर येथील प्रसिद्ध गोविंदस्वामी. चंद्रपूरला यांचा मठ आहे. गोविंदस्वामींपासून लक्ष्मणबुवा डोके यांनी अनुग्रह घेतला. चंद्रपुराहून ते नागपूरला आले. डोके घराणे हे माध्यंदिन शाखेचे असून मौनस गौत्रीय आहे. लक्ष्मणबुवांच्या साधुवृत्तीवर लुब्ध होऊन द्वितीय रघुजीने त्यांना इ.स. १७८७ मध्ये कुंभारी (तह. रामटेक) हे गाव मोकासा (इनाम) दिले. चैत्र वद्य ८, इ.स. १७९० या रोजी लक्ष्मण बोबांनी समाधी घेतली. समाधी घेण्यापूर्वी त्यांनी संन्यास घेतला होता, असे कळते. प्रसिद्ध विनोदी साहित्यिक (कै.) प्राचार्य राम डोके हे या लक्ष्मणबोवांच्याच वंशातील होते. लक्ष्मणबोवांपासून प्रा. राम डोके यांची सातवी पिढी आहे.
लक्ष्मणबोवांप्रमाणेच यांच्या घराण्यातील दुसरी प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे सच्चिदानंद ऊर्फ यादवबोवा डोके. हे लक्ष्मणरावांचे बंधू भिकाजी यांचे पुत्र होते. यांचा जन्म इ.स. १८०० चा. मौंजीबंधन झाल्यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी यादवबोवांनी आपल्या चुलत्याचा लक्ष्मणबोवांचा मंत्रोपदेश घेऊन संन्यास घेतला. त्यांनी चतुर्थाश्रमातील नाव ‘सच्चिदानंद’ असे ठेवले. लहानपणापासूनच सच्चिदानंद स्वामी आपल्या चमत्कारपूर्ण व समाजोपयोगी जीवनाने लोकांत प्रसिद्ध झाले.
डोके घराणे पूर्वीपासूनच विठ्ठलोपासक होते. यादवबोवांनी स्वत: एक मठ तयार करून त्यात विठ्ठलाची स्थापना केली. स्वामी महाराज भगवद्भजनात नेहमी तल्लीन रहात. कृष्णलीला हे तर त्यांचे नित्याचेच खेळ होते. विठ्ठलाच्या मूर्तीप्रमाणेच त्या मूर्तीला ठेवण्याकरिता त्यांनी एक पाळणाही तयार केला. मूर्तीला पाळण्यात ठेवून स्वामींचे भजन सुरू होई. एकदा प्रेमळ भजन सुरू झाले की, पाळणा आपोआप हलू लागे. ही मठाची अवर्णनीय शोभा पाहून प्रत्येकाच्या मुखातून धन्यतेचे उद्गार निघत. स्वामींच्या पहिल्याच तानेने श्रोतृवर्गाचे चित्त त्यांच्याकडे आकर्षिले जात. मग श्रोते त्या अवर्णनीय आनंदाने आपले देहभान विसरून त्यांच्या भजन-कीर्तनाच्या तालावर हात जोडून, डोळे मिटून डोलू लागत. अशा या आनंदाच्या समयी लोकांना आपल्या कामाचीही पर्वा रहात नसे. जो तो आपले काम सोडून या भजनाचा आनंद घेण्यासाठी गर्दी करीत. भजनातून उठून जावे, असे कोणासच वाटेना. आठ-आठ तास भजन झाले तरी त्यांना असे वाटे की, अर्धा तासच झाला. भजनापुढे लोकांना खाण्या-पिण्याचेही भान रहात नसे. प्रत्यक्ष परमेश्‍वर जेथे बुवांच्या मंजुळ स्वराने पाळण्यात डुलत तेथे मानवाची काय कथा. स्वामींच्या भजनाच्या दिव्य शैलीची जेवढी तारीफ करावी तेवढी थोडीच आहे.
आश्‍विन व कार्तिक या दोन महिन्यांत स्वामींच्या मठात विशेष उत्सव होत. कार्तिकात स्वामींच्या अंगात जणू श्रीकृष्णाचा संचार होई. दोन महिने अगदी दोन क्षणासारखे जात. कार्तिक मासात प्रात:काळी काकड आरती होई. त्या वेळेस कृष्णलीला होई. ‘‘चला, आपणही कृष्णलीला पाहू या’’ या विचाराने अलोट स्त्री-पुुरुषांची त्या ठिकाणी गर्दी जमे. स्वामी स्वत: बाळकृष्णाच्या लीला करीत. कधी चोरी, कधी मंथन, कधी रास याप्रमाणे लीला स्वामी करीत. श्रीकृष्णाच्या दर्शनाने व स्वामींच्या चमत्कारपूर्ण भजन श्रवणाने भाविक स्वत:ला धन्य समजत. भजनात रंगून जात. देहवृत्ती विसरून स्वामींबरोबर नाचावयास लागत. साक्षात गोकुळ अवतरले असा त्या ठिकाणी भास होई.
स्वामी स्वत: ब्रह्मनिष्ठ आत्माराम असले तरी श्रीकृष्णप्रेमरंगात आले की, ‘मी कोण आहे, कुठचा आहे’ हे सर्व विसरून, कृष्णाप्रमाणे लहान होऊन त्याच्या लीला करीत. डोक्यावर मुकुट, त्यावर मोरांची पिसे व हातात मुरली घेऊन ते नृत्य करीत. कधी भाविक भक्तांना गोप करून विटीदांडू, लगोरी व गोट्यांचा खेळ मांडीत. एखाद्यावर खेळातील डाव आला की, ‘हरिविठ्ठल’ असे गर्जून सर्व टाळी देत. त्या आवाजाने श्रोते व प्रेक्षक बरेच जमत. स्वामी कधी कधी फुगड्याही खेळत. कृष्णजन्मापासून तो मथुरागमनापर्यंतच्या सर्व लीला मठात होत.
स्वामींच्या लीला पाहण्याकरिता वेश्याही येत. त्यांनाही स्वामी आपल्या लीलांमध्ये सामील करून घेत. त्यातील एक प्रौढ व पोक्त वेश्या यशोदेचे काम करी, तर एक तरुण वेश्या राधिकेचे काम करी. त्यांच्याबरोबर मंथन, राधागृहागमन अशा नाना तर्‍हेच्या लीला होत. त्या जरी वेश्या असल्या तरी मठामध्ये मात्र त्यांना व्रज युवतींचा मान मिळे. राधाकृष्णांच्या लीला सुरू झाल्या की, स्वामी एखाद्या तरुणीची चेष्टा करीत. तेव्हा लोकांना विलक्षण मौज वाटून ते मोठ्याने नामगजर करीत. वस्त्रहरणप्रसंग व रासप्रसंग तर कमालीचा बहारीचा होत असे. मध्ये स्वत: मोरपिसाचा मुकुट घालून स्वामी उभे रहात आणि गोपी फेर धरीत. भाविक लोक वाद्यांचा गजर करीत आणि गाणी म्हणत. नंतर श्रीकृष्ण मूर्ती समोर आणून त्याभोवती गोपी नाचत. मध्येच कृष्ण गुप्त होई तेव्हा विरहाने गोपी आक्रोश करीत. कृष्णाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर रमणीमुखमंडळावर आनंदाचा, मीलनानंदाचा उमाळा येई. स्वामी तरुणींबरोबर अशा प्रकारे चेष्टा करीत तरी कामविकारापासून अगदी अलिप्त असत. या सत्पुरुषाच्या मनाला ही क्षुद्र कल्पना कधीच स्पर्श करू शकली नाही. अवतारी पुरुषांची लीलाच अपार असते. या लीलेत देहभाव नसतो. या ज्या लीला होत त्या ‘नसोनी उमाळा कामाचा’ अशा अवस्थेत होत. ‘मन रामी रंगून, अवघे रामरूप कोंदले’ अशी ज्याची अवस्था झाली आहे, त्याला बिचारा काम काय करू शकणार? संतांच्या स्थितप्रज्ञ स्थितीत स्वप्नातदेखील फरक पडत नाही.
असो. अशा रीतीने प्रत्यक्ष गोकुळच पृथ्वीवर अवतरले आहे, असे वाटणार्‍या लीला संपल्यानंतर दिंडीला प्रारंभ होई. सर्व भाविक लोक भगवद्भजन गात स्वामींबरोबर निघत. इतर लोकही बरेच जमत. गुलाल, बुक्का फार उडे. आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी व महाशिवरात्र या दिंड्या देवस्थानातून निघून सुदामबोवाचा मठ, मोठे अयाचित मंदिर, तेलीबोवा, विश्‍वंभर आबा, लहान अयाचित मंदिर, आदितवार दरवाजाचा मारुती, आदिवारीतून जागृतेश्‍वर मंदिर, तेथून बुजुरकार राममंदिर, ठमके बोवाचा मठ, बालाजी मंदिर इतके फिरून वापस येत असे. आषाढ वद्य २ व कार्तिक वद्य २ या दोन दिंड्या फक्त मठालाच प्रदक्षिणा करीत असत. तीन प्रहर दिंडी झाल्यानंतर आरती होई. या प्रकारे अनेक जड जिवांस स्वामींनी श्रीकृष्णोपासनेस लाविले. नागपूर म्हणजे दुसरे पंढरपूरच झाले. पंढरपूरचे नवस नागपुरास फेडू लागले. याबाबतचा किस्सा असा-
नागपुरात गंगा नावाची बाई होती. ती पुत्रहीन होती. तिने त्यासाठी पंढरीरायास नवस केला की, ‘‘जर मला पुत्र होईल तर मी पंढरपूरला तुझे दर्शनास येऊन तुला अनरसे अर्पण करीन.’’ विठ्ठलाची तिच्यावर कृपा झाली. तिला पुत्ररत्न झाले. नवस फेडण्याकरिता बाईने पंढरपुरास जाण्याची तयारी केली. तेव्हा श्रीविठ्ठलाने रात्री स्वप्नात येऊन सांगितले की, ‘‘नागपूरस्थ डोकेबुवा हे माझेच अंश आहेत. तेव्हा नवस फेडण्याकरिता पंढरपुरास न येता नागपूरलाच डोकेबुवांच्या मठात दर्शन घेऊन नवस फेडावा.’’ या श्रीहरि आज्ञेप्रमाणे बाईने अनरसे करून स्वामींकडे आणले. स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवताच स्वामी म्हणाले, ‘‘तुज कथिले की स्वप्नी?’’ स्वामींचे वाक्य ऐकताच बाईस त्यांच्यातील सत्पुरुषाची ओळख पटली. स्वामींच्या चरणावर तिने लोटांगण घातले. या प्रसंगामुळे स्वामींची जिकडे तिकडे कीर्ती झाली. अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले.
एकदा स्वामी स्वशिष्य समवेत विश्‍वनाथाच्या मोक्षदायिका पुरीस गेले. तेथे रात्रंदिवस भजनाचा रंग चालत असे. ब्रह्मस्थितीत असलेल्या महाराजांचे भजन ऐकण्याकरिता काशी नगरीतील भाविक लोक अलोट गर्दी करीत. असेच एकदा भजन चालले असता उंच माडीवर एक मुलगा बसला होता. तो वारंवार खाली वाकून बघत होता. इतक्यात अकस्मात त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. त्याचे मस्तक फुटले आणि बराच रक्तस्त्राव होऊन तो बेशुद्ध पडला. आता तो मरणार, हे पाहून मातापित्यांनी शोक आरंभिला. ‘‘अरे, माझा हा एकुलता एक असा सुंदर मुुलगा. त्याचे अंगावर कंठी, गोफ, कडे घालून मी त्याला कधीच कडेवर घेतले नाही. हाय! मी आता कुणाकडे पहावे? सांगा कुणीतरी सांगा.’’
अरे! मी नाही घेतले कडे|
घालोनि कंठी गोफ-कडे
आता मी पाहू कोणाकडे|
सांगा निवाडे कोणी पै
असा शोक चालला असता ते वृत्त डोकेबुवांच्या कानी गेले. स्वामी तेथे आले. त्यांनी त्याच्या देहावर आच्छादन टाकून भजन आरंभिले आणि भगवंताची बरीच विनवणी करून
शेवटी उठी उठी नामे करून|
करिता भूपाळी गायन
बाळ ते उठले खडबडोन|
जनां संपूर्ण देखता
बाळ एकदम खडबडून उठले. लोकांत एकच वार्ता पसरली. काशीक्षेत्रस्थ मंडळी स्वामींच्या भजनी लागली. ‘धन्य हो साधुसमर्थ| करिती अघटित क्षणार्धे|’ काशीतील बुटामंगल (फाल्गुनातील शेवटचा मंगळवार) उत्सव पाहण्याकरिता बाजीराव साहेब आले असता त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले होते. अशा प्रकारे काशीस आपली कीर्ती ठेवून स्वामी नागपुरास परतले.
डोकेबुवांचे नागपूरला दोन मठ होते. एक निकालस मंदिरासमोरच्या गल्लीत व दुसरा अवधूतबोवांच्या मठाजवळ मंगळवारीत जाण्याच्या रस्त्यावर. पहिला मठ हा लक्ष्मणबोवांचा असून, त्यांचे वंशज येथे रहात. दुसरा मठ हा यादवबोवांचा असून, त्यांची समाधी येथे होती. आज दोन्ही मठ नामशेष झाले आहेत. आठवण म्हणून यादवबुवांच्या पादुका पहावयास मिळतात. वैशाख शु. ५, इ.स. १८७७ या दिवशी यादवबोवा डोके समाधीस्त झाले.
डॉ. राजेंद्र डोळके/९४२२१४६२१४