आवळा देणे नि कोहळा काढणे

0
2096

विश्‍वसंचार

अल्पसंख्य मुसलमान समाज; त्याची बहुसंख्य हिंदू समाजावरील शिरजोरी; या शिरजोरीला स्वातंत्र्यपूर्व काळातल्या इंग्रज सत्ताधार्‍यांचा संपूर्ण पाठिंबा; त्यातून निर्माण झालेला द्विराष्ट्रवाद; स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर देशाची फाळणी; तेवढ्यानेही संतुष्ट न होऊन पाकिस्तानने आपल्यावर लादलेली १९४७-४८, १९६५, १९७१ आणि १९९९ अशी चार युद्धं; आणि या सर्व युद्धांत हाग्या मार खाऊनही पाकिस्तानच्या अखंडितपणे चाललेल्या रक्तपाती अतिरेकी कारवाया, यामध्ये आपलं सगळं चित्त एवढं एकवटलेलं असतं की, उत्तरेकडच्या एका जबरदस्त शक्तीकडे आपलं दुर्लक्ष होतं. ही शक्ती म्हणजे चीन.
चीनचं मात्र आपल्याकडे व्यवस्थित लक्ष आहे. राजधानी बीजिंगमधून चक्क ‘चायना-इंडिया डायलॉग’नावाचं एक मासिक निघतं. त्या मासिकाच्या ताज्या म्हणजे मार्च २०१७ च्या अंकात दाई बिंगुओ याची एक मुलाखत छापून आली; आणि जाणकार मंडळींच्या भुवया एकदम उंचावल्या. २ मार्च २०१७ च्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये ती मुलाखत हा बातमीचा विषय होता. मुलाखतीत दाई बिंगुओ म्हणतो, ‘चीन-भारत सीमेच्या पूर्वेकडील भागातील तवांगसहित सगळाच वादग्रस्त भाग, हा चीनच्या तिबेट प्रांतापासून सांस्कृतिकदृष्ट्या, प्रशासकीयदृष्ट्या अतूट आहे. चीन-भारत सीमा वादग्रस्त आहे, कारण चीनच्या वाजवी म्हणण्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. जर भारताने चीनच्या पूर्वेकडील भागातील संबंधांबद्दल सकारात्मक विचार केला, तर चीनही भारताच्या अन्यत्र असणार्‍या संबंधांबद्दल तसाच प्रतिसाद देईल.’
कोण हा दाई बिंगुओ? काय आहे त्याच्या कोड्यात टाकणार्‍या मुत्सद्दी भाषेचा अर्थ? तवांग हे काय आहे? ते तिबेटपासून अतूट आहे, म्हणजे काय?
दाई बिंगुओ हा चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षातला एक खूप वरिष्ठ राजकारणी आणि मुत्सद्दी आहे. चीन सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचा संचालक आणि राष्ट्रीय सुरक्षाविषयक केंद्रीय समितीचा प्रमुख, म्हणून त्याने आतापर्यंत भारत-चीन सीमा वाटाघाटींमध्ये अनेकदा भाग घेतलेला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वर्तुळात दाई बिंगुओ हे नाव चांगलंच परिचित आहे. अमेरिकन परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर हा त्या पदावरून पायउतार झाल्यालाही आता किमान चार दशकं उलटली आहेत. पण जाणता, मुरब्बी, पाताळयंत्री, निर्घृण असा परराष्ट्रमंत्री म्हटला की, जगभरच्या पत्रकारांना, किसिंजर हेच नाव डोळ्यांपुढे येतं. दाई बिंगुओ हा चीनचा किसिंजर आहे, असं म्हटलं की, त्याची वैशिष्ट्यं, त्याच्या क्षमता लक्षात येतील. खरं म्हणजे चीन सरकारच्या अधिकृत सेवेतून तो २०१३ सालीच निवृत्त झालेला आहे. पण राजकारणात किंवा योग्य शब्द वापरायचा तर, राजनीती क्षेत्रात, मुत्सद्देगिरीच्या क्षेत्रात प्रदीर्घ काळ वावरलेल्या माणसाला खरी निवृत्ती मिळतच नाही. त्यामुळे आजही, चीनच्या परराष्ट्र धोरण विषयात दाई बिंगुओ काय म्हणतो, याला फार महत्त्व आहे. तसंच आपण काय म्हणतो, ते दाई बिंगुओच्या कानावर जाणं, हेही महत्त्वाचं आहे.
तर, एवंगुणविशिष्ट अशा दाई बिंगुओने वरील मुलाखतीत एका ‘पॅकेज डील’चा संकेत दिला आहे. तुम्ही आम्हाला अमुक द्या; मग आम्ही तुम्हाला तमुक देतो, अशा स्वरूपाच्या वाटाघाटींना इंग्रजीत ‘पॅकेज डील’ असं म्हटलं जातं. आवळा देऊन कोहळा मिळवण्याची ही खटपट असते. पण दोन्ही बाजूंना त्यात समान संधी असते. इथे चीनला भारताच्या ताब्यात असलेला तावांग जिल्हा हवाय्; आणि त्या बदल्यात तो भारताच्या मागणीचा विचार करणार आहे. हा संकेत जम्मू-काश्मीरच्या अक्साई चीनकडे आहे. पण तवांग किंवा तावांग असा पूर्वेकडच्या प्रदेशाचा जसा स्पष्ट उल्लेख दाई बिंगुओ करतो, तसा तो अक्साई चीनचा करत नाही, हे लक्षात घेण्यासारखं आहे. यालाच म्हणतात मुत्सद्देगिरी!
आता, हे तवांग किंवा तावांग आणि अक्साई चीन ही काय भानगड आहे, हे नीट समजून घेण्यासाठी भारतासह पाकिस्तान आणि चीनचा नकाशा पहाणं, हे अपरिहार्य आहे.
भारताच्या थेट उत्तरेला जम्मू-काश्मीर हे राज्य आहे. महाराष्ट्र राज्याचे जसे कोकण, मराठवाडा, विदर्भ असे विभाग आहेत. तसे जम्मू-काश्मीर राज्याचे हिंदुबहुल जम्मू, मुस्लिमबहुल काश्मीर आणि बौद्धबहुल लद्दाख (लडाख हे इंग्रजी पेपरवाल्यांनी रुळवलेलं भ्रष्ट रूप) असे तीन विभाग आहेत. इ. स. १७९० साली पंजाबकेसरी महाराज रणजितसिंह याने अफगाणांच्या तावडीतून काश्मीर मुक्त केलं आणि आपला डोग्रा राजपूत सरदार राजा गुलाबसिंग याला तिने सुभेदार नेमलं. राजा गुलाबसिंगाने हळूहळू उत्तरेकडे सरकत स्कार्डू- गिलगिट- बाल्टिस्तानपर्यंत राज्य वाढवलं. म्हणजे जम्मू-काश्मीरच्या सीमा उत्तरेकडे अफगाणिस्तान-ताजिकीस्तान, तर पूर्वेकडे नि ईशान्येकडे चीन आणि तिबेटला भिडल्या. सन १८४२ साली राजा गुलाबसिंगाने लद्दाख तिबेटकडून स्वत:च्या ताब्यात घेतला.
एवढ्यात १८४६ साली इंग्रज शिरजोर झाले आणि त्यांनी महाराजा रणजितसिंहाचं राज्य खालसा केलं. मात्र, राजा गुलाबसिंगाला त्यांनी जम्मू-काश्मीर या राज्याचा संस्थानिक मांडलिक राजा म्हणून मान्यता दिली. गुलाबसिंगाने चांगलं १८७७ पर्यंत राज्य केलं. मग १९२५ साली त्याचा खापरपणतू राजा हरिसिंग हा गादीवर आला. त्याच्याच कारकीर्दीत भारत स्वतंत्र झाला. पण त्याची फाळणी होऊन, पाकिस्तान हे मुसलमानांचं स्वतंत्र राष्ट्र निर्माण झालं. पाकिस्तानला काश्मीर संस्थान स्वत:कडे हवं होतं, पण राजा हरिसिंग मानत नाहीत म्हटल्यावर पाकिस्तानने ऑक्टोबर १९४७ मध्ये टोळीवाल्यांच्या वेषात सरळ काश्मीरवर आक्रमण केलं. अखेर राजा हरिसिंगांनी भारताशी सामील नाम्याच्या करारावर सही केली. याचा अर्थ जम्मू-काश्मीर या संस्थानी राज्याच्या मालकीची भूमी आता भारताचा भाग झाली. साहजिकच भारतीय सेना या भूमीचं परकी आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी धावून गेली. पण सैन्याचं काम पूर्ण होण्याआधीच राजकारणी मंडळींनी युद्धबंदी केली. त्यानंतर मनसोक्त राजकीय घोळ घालण्यात आले. त्याचा परिणाम म्हणजे गिलगिट- बाल्टिस्तान सह लद्दाखचाही मोठा हिस्सा पाकिस्तानच्या ताब्यात राहिला. आपण याला ‘पाकव्याप्त काश्मीर’ म्हणतो. तर पाकिस्तान त्याला ‘आझाद काश्मीर’ म्हणतो.
मुसलमानांनी शिरजोरी करायची आणि कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालच्या हिंदूंनी ती सहन करायची; या ‘महान’ परंपरेला अनुसरून पाकिस्तानने मार्च १९६२ मध्ये चीनशी मैत्रीचा करार केला नि या व्याप्त लद्दाखमधला अक्साई चीन या नावाने ओळखला जाणारा सुमारे २००० चौ. कि. मी. चा प्रदेश चीनला कायमचा देऊन टाकला. म्हणजेच भारताच्या रीतसर मालकीचा प्रदेश पाकिस्तानद्वारे चीनने बळकावलेला आहे.
ही झाली तिबेटच्या पश्‍चिमेची स्थिती. आता तिबेटची पूर्व बाजू पहा. भारत हा जसा अत्यंत प्राचीन देश आहे, तसाच चीनही आहे. किंबहुना ‘चीन’ हा शब्दच मूळ संस्कृत आहे. त्याचा अर्थ रेशीम किंवा रेशमी वस्त्र असा आहे. महाभारतात पांडवांनी दिग्विजयी यात्रेत चीन देश जिंकल्याचा उल्लेख आहे. आधुनिक काळात पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच असे युरोपीय दर्यावर्दी जसे भारताला जळवांप्रमाणे चिकटले, तसे ते चीनलाही चिकटले. पुढे इंग्रजांनी अख्खा भारतच घशात घातला; तोच प्रयोग त्यांनी चीनवरही चालू केलेला होता. चीनचे मॉंचू राजे आणि इंग्रज यांच्यात अफूच्या व्यापारावरून ख्रिश्‍चन पाद्य्रांनी चालवलेल्या बाटवाबाटवीवरून युद्धं सुद्धा झाली. पण इंग्रजांना चीनच्या पलीकडच्या रशियाची खरी भीती वाटत होती. त्यामुळे ब्रिटिश भारताच्या उत्तरेकडल्या प्रदेशांबाबत त्यांनी चीनशी समजुतीने घेतलं. भारताच्या थेट उत्तरेकडचा स्वायत्त प्रदेश म्हणजे तिबेट. चीनच्या मॉंचू राजांचं म्हणणं होतं की, तिबेट आमचाच आहे. त्याला कोणताच ऐतिहासिक आधार नव्हता. खुद्द तिबेट हा ज्ञात ऐतिहासिक काळापासून ‘दलाई लामा’ ही पदवी असलेल्या बौद्ध धर्मगुरूंच्याच राजवटीत होता. त्या दलाईकडूनच सन १७४२ मध्ये गुलाबसिंगाने पश्‍चिमेकडचा लद्दाख जिंकला.
१९१२ साली चीनमध्ये क्रांती झाली. मॉंचू राजवट संपवून सन्यत् सेन या नेत्याची प्रजासत्ताक लोकशाही सुरू झाली. लोकशाही चीन आणि ब्रिटिश भारत यांच्यात १९१४ साली शिमला (सिमला हा भ्रष्ट उच्चार) इथे करार झाला. सर हेन्री मॅकमहॉन या मुत्सद्याने आखलेल्या सीमारेषेला दोन्ही देशांनी मान्यता दिली. तिबेटला स्वायत्त राष्ट्र घोषित करण्यात आलं.
मग १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. पाठोपाठ १९४९ साली चीनमध्ये परत क्रांती झाली. लोकशाहीची सद्दी संपून माओ झेडॉंगची कम्युनिस्ट राजवट आली. एकीकडे भारताशी गोड-गोड बोलत १९५१ साली माओने सरळ तिबेटवर आक्रमण केलं आणि तो प्रदेश हडपला. पण कसा कोण जाणे, भारताच्या तत्कालीन नेफा (नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एरिया) प्रदेशाला लागून असलेला तावांग हा तिबेटी जिल्हा चीनच्या नजरेतून निसटला. आसाम रायफल्स या भारतीय लष्कराच्या तुकडीचा मेजर रालेंगनाव खाटिंग याने यातला धोका हेरला. त्याने १६ फेब्रुवारी १९५१ रोजी सरळ तावांग ताब्यात घेतलं आणि सरकारी कचेरीवर तिरंगा फडकावला.
आज तावांग हा नेफा म्हणजे अरुणाचल प्रदेश या भारताच्या प्रांताचा एक जिल्हा आहे. चीनचं असं म्हणणं आहे की, अख्खा अरुणाचल प्रदेश हा आमचा आहे.
आता दाई-बिंगुओच्या ‘पॅकेज डील’ चा थोडक्यात अर्थ असा की, अख्ख्या अरुणाचलऐवजी फक्त तावांग आम्हाला द्या, आम्ही तुमच्या अक्साई चीनबाबत विचार करू.
फक्त विचार करू, बरं का़! देऊ असं म्हणत नाहीये तो!

मल्हार कृष्ण गोखले