मेळघाटी ‘होळीरंग’

0
253

होळीला महाराष्ट्रात ‘शिमगा,’ दक्षिणेत ‘कामदहन’ तर बंगालमध्ये ‘दौलायात्रा’ असे म्हणतात. शिशिरातील फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी पेटविली जाते. होळी म्हणजे गारठवून टाकणार्‍या थंडीला निरोप. थंडीच्या दिवसांत आपल्याला उष्णता देणार्‍या अग्नीला कृतज्ञतापूर्वक दिलेला निरोप. म्हणजेच ऋतुराज वसंताचे स्वागत. देशात फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतचे पाच दिवस, तर कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो. मेळघाटात पाचही दिवस हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. मेळघाटी होळीरंगाचा हा अनोखा सण कोरकूंच्या आयुष्यातही आनंदाचे रंग भरत असतो. सातपुड्यातील दर्‍याखोर्‍यांचा, घनदाट वनश्रीचा आणि समृद्ध सजीवसृष्टीचा मेळघाट या होळीरंगात न्हाऊन निघत असतो.

डोंगरदर्‍यात राहणार्‍या आदिवासींचा कल्पवृक्ष मोहफुलांचा मोयान, मोयान सुगंध तर आंब्याच्या मोहरानं सारा परिसर मोहरलेला असतो. मागील वर्षी शिशिराच्या पडझडीत आणि ऋतुराज वसंताच्या आगमनाबरोबरच माझी पावलं सातपुड्यातील मेळघाटात पडली होती. होळीचा दिवस होता. सृष्टीवर सूर्यकिरणाचं कोवळं रूप पसरलं होतं. हरिसालच्या पश्‍चिमेकडेचं पाच-सहा किलोमीटरवरचं ‘बोरी’ गाव. काही ठिकाणी सिपनेचं पात्र काहीसं सुकलं असलं तरी थोडा फार प्रवाह सुरू होता. खंड्या, कोतवाल, पंकोळी इ. पक्ष्यांच्या भरार्‍या लक्ष वेधत होत्या.
पुढे ‘खापरा’ नदीचे पात्र पार करून सातपुड्यातील एका डोंगरपायथ्याच्या बोरी या इवलशा गावात प्रवेशलो. गावाची लोकसंख्या असावी अंदाजे दोन हजार. एका ठिकाणी आदिवासी तरुणांचा समूह कुठल्यातरी कार्यात गुंतला होता. जवळ जाऊन पाहतो तो होळीची उभारणी सुरू होती. अंदाजे चार फुटाच्या अंतरावर दोन होळ्या पूर्णत्वास आल्या होत्या. दोन होळ्यांबाबत चौकशी केली असता एक आदिवासी ‘पुरुष’ तर दुसरी आदिवासी ‘स्त्री’ची प्रतीकात्मक होळी असल्याचे कळले. दोन होळ्यांच्यामध्ये आदिवासींच्या घरात असलेल्या पाळणासारखा पाळणा बांधला होता. त्याला मधोमध बाळाला झोपवावयाचे पोतेही गुंडाळले होते.
जमिनीवर साधारणत: चार-पाच फूट व्यासाच्या आकारात आणि पंधरा-वीस फूट उंच असलेल्या होळीची रचना उत्कृष्ट स्थापत्यशास्त्रानुसार केली गेली होती. शंखासारखी तिची रचना असून वर निमुळती होत गेली होती. आजूबाजूला सागवानाची उंच गोलाकार असलेली लाकडं उभी केली असून, मध्यभागातून दोन उंच जाड बांबू उभे रचलेले होते. टेंभुर्णीची डहाळी हा होळीतील एक प्रमुख घटक असतो. पळसाची फुलं म्हणजे केसा, डहाळ्या, पुर्‍या, चपाती आदी सामग्री बांधली होती. यालाच होळीचा शृंगार मानला जातो. स्त्रीच्या होळीत त्या बांबूवर हिरव्या पानांच्या लहान-लहान डहाळ्या बांधल्या होत्या. वरच्या भागात सूप, टोपली या आदिवासी स्त्रीच्या संसारात महत्त्वाच्या असलेल्या वस्तू लटकवल्या होत्या, तर पुरुष होळीत बांबूला मध्यभागी बांबूच्या सालीद्वारे कुशल कारागिरीतून तयार केलेली डोक्यावर बांधावयाची ‘पगडी’ बांधली होती. आदिवासींच्या वेशभूषेत डोक्यावरील पगडीला महत्त्वाचे स्थान आहे. यालाच आदिवासी ‘बडी होली’ असे संबोधतात.
होळीची रचना शंकूसारखा असण्याचे शास्त्र शंकूसारखा आकार हे इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. या आकारात घनीभूत होणारे अग्निस्वरूपी तेजतत्त्व भूमंडलावर आच्छादित झाल्याने तिचा भूमीला लाभ मिळण्यास साहाय्य होते आणि पाताळातून भूगर्भाच्या दिशेने प्रसारित होणार्‍या त्रासदायक स्पंदनांपासून भूमीचे रक्षण होते. सूर्यास्तावेळी होळी पेटवली जात असल्याने आम्हीही तोपर्यंत जंगलात इतरत्र भ्रमण करून यायचे म्हणून पुढे निघायचे ठरवले होते.
सूर्य डोंगरापल्याड जाता जाता मी बोरीत परतलो. सांजकिरणाच्या सोनपिवळ्या रंगात गावाचा परिसर न्हाऊन निघाला होता. घराघरातून आदिवासी स्त्री-पुरुष आपली पारंपरिक वेशभूषा गळ्यात चांदीची सळी, कर्णभूषणे, हातात पाटल्या, कमरेवर करगोटा, पायात तोडे इ. आभूषणं घालून, हातात पूजेचं साहित्य घेऊन येऊ लागले होते. मुलं-मुली नवीन कपडे घालून होळीच्या परिसरात नाचगाणे करत होते. एवढ्यात गावातून गावकरी गावपाटलाला वाजत-गाजत घेऊन येत होते. तोपर्यंत गावातील इतर मंडळीही होळीजवळ जमली होती. पाटील येताच गावकर्‍यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. पाटील दाम्पत्याने होळीची पूजाअर्चा केली. होळीला अग्नी दिला. इतरही पूजा करू लागले. होळीला नैवेद्य अर्पण करू लागले. तोपर्यंत हळूहळू दोन्ही होळींनी पेट धरला. ज्वाला उडू लागल्या. सांजवेळीनंतरच्या त्या तांबड्या ज्वाळांच्या प्रकाशात आदिवासींचे होलीपूजन प्रकाशमय होऊ लागलं होतं. त्यांची वेशभूषा, वागणूक या तांबड्या प्रकाशात झळकत होती. काही मंडळी ढोल-टिमकी-बासरीच्या नादात नृत्य करत होते. एवढ्यात होळीत असलेला उंच बांबू अर्धवट जळून खाली पडताना दिसला. आदिवासी तरुणांचा एक जत्था बांबू पडण्याच्या दिशेने आला. त्यांनी तो हातावर अडविला. तुकडे करून परत अग्नीत टाकले. ही बाब शुभ समजली जाते. काही वेळातच होळीच्या उत्साहाला उधाण आलं होतं. स्त्री-पुरुष गोल वर्तुळ करून नाचू लागले होते. त्यांच्या मुखातून शब्द फुटू लागले होते-
‘‘मोई रे मांजा, होली का दंडा जलो गयो क्या
मोई रे मांजा, होली का दंडा जलो गयो क्या…’’
बाजूला काही आदिवासी स्त्री-पुरुष लाकडाच्या प्रतीकात्मक वस्तूची पूजा करत होते. मागील वर्षी होळीत एक गावकरी जळून मृत्यू पावला होता. त्या पुरुषाच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून या पूजेचे औचित्य असल्याचे कळले.
मध्यरात्रीपर्यंत मेळघाटी होळीचा आनंद मीही तेथे राहून घेतला होता. हळूहळू होळीचा ज्वर ओसरत चालला होता. गर्दी पांगू लागली होती. पौर्णिमेचा चंद्र शिरावर असताना माझी पावलंही हरिसाल मुक्कामी परतली होती. दुसर्‍या दिवशी सकाळी ‘मेघनाथ पूजा’ पाहण्यासाठी जायचे असल्याने आम्हीही झोपी गेलो.
पूर्वेचं मेळघाटी तांबडं फुटलं होतं. पाखरांच्या मंजूळ स्वरातच पहाट उगवली. पाखरांसोबत गावकरीही जागे झाले. मीही तयार होऊन पुढे निघालो. हरिसालच्या पश्‍चिमेकडे सात-आठ किलोमीटरनंतर ‘कारा’ हे गाव. गावाच्या पलीकडच्या काठावर सर्वत्र पाला पडल्या होत्या. त्यात दुकाने थाटली होती. कपडे, दागिने, अन्नधान्य, किरणा, भाजीपाला इ.च्या दुकानांसमोर आदिवासी स्त्री-पुरुष, तरुण-तरुणींची गर्दी होऊ लागली होती. मेळघाटातील मेघनाथ जत्रेतील उत्साहाचा ज्वर चढू लागला होता. मीही या आनंदात सामील झालो होतो. कोरकू आदिवासी स्वत:ला रावणवंशी मानतात. रावणाचा मुलगा ‘मेघनाथ’ हा सर्व देवतांना जिंकणारा महापराक्रमी देव असं ‘कोरकू’ मानतात आणि म्हणूनच होळीच्या दुसर्‍या दिवशी लाकडी खांबाची म्हणजेच पर्यायानं मेघनाथाची पूजा करतात. एका उंच खांबावर लाकडी फळी आडवी बसवितात. त्याला एक कापड बांधतात. लाकडी फळीच्या खाली ‘मचाण’ तयार करतात. या खांबावर चढायला लाकडी शिडी असते. फळीच्या दोन्ही बाजूला दोरखंड बांधतात. गावचा परिहार म्हणजेच भगत अंगात आल्यावर या खांबावर बसतो. जोरजोराने ओरडून मेघनाथला आळवतो. त्याच वेळी दोरखंड ओढून फळी गोल फिरवतात. हळूहळू मेघनाथाजवळ गर्दी होऊ लागली होती.
मेघनाथाची पूजा सुरू झाली होती. जवळ तीन ‘भगत’ (यालाच ‘भूमका’ असे म्हणतात.) बसले होते. त्यांच्यासमोर अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या चक्रव्यूहात अडकलेले आदिवासी स्त्री-पुरुष ताटात पूजेचं साहित्य आणि एका हाती नवसाचा जिवंत कोंबडं घेऊन उभे होते. भगताची पूजाअर्चा सुरू झाली. हळद-कुंकू, उदबत्त्या पेटू लागल्या. एकेका कुटुंबाची पूजा संपल्यावर भगत हातात कोंबडा व कुर्‍हाड घेऊन लाकडी ओंडक्यावर कोंबड्याचा बळी देत होता. देवावर कोंबड्याच्या रक्ताचा अभिषेक करायचा. तीनही भगतांपुढे नवस फेडणार्‍यांची गर्दी होऊ लागली होती. कोंबडे फडफडू लागले होते. कुटुंबावर अनिष्ट ओढू नये म्हणून आदिवासी हा नवस फेडतात. होळीच्या तिसर्‍या दिवसाची ही ‘मेघनाथ पूजा’ सोबत यात्रा आणि बाजार एक वेगळाच अनुभव मिळाला होता. ही जत्रा म्हणजेच कोरकूंना एक पर्वणीच असते. करमणुकीच्या नवनवीन प्रकाराचा ते आनंद लुटत असतात.
देशाला स्वातंत्र्य मिळून सदुसष्ट वर्षे लोटली. विविध सरकारकडून आदिवासींच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. करोडो रुपये खर्च होत आहे; परंतु अज्ञान, अंधश्रद्धा याच्या चक्रव्यूहातून आदिवासी समाज काही पूर्णपणे बाहेर पडला नाही. भगत-भूमका या संधीसाधूंनी त्याला जोखडून ठेवलं. ही परिस्थिती बदलायला आणखी किती कालावधी लागणार?
‘फगवा’ हा होली उत्सवातील एक महत्त्वाचा भाग. मेळघाटात पाच दिवसांच्या होळी उत्सवात आदिवासींच्या परंपरेचे अनेक रंग पाहायला मिळतात. आदिवासी पळसफुलांपासून रंग तयार करतात. गावागावांत उत्साहात धूलिवंदन सुरू असताना रस्त्याने येणार्‍या जाणार्‍यांची वाट अडविरी जाते. रस्त्याच्या मधोमध लाकडाचे ओंडके टाकून किंवा दोर धरून स्त्रिया फेर धरून फगवा मागतात. कोरकू गीतं गातात-
‘‘हमरा फगवा देतो दे… हमरा फगवा देतो दे,
गाना दे रे, गाना दे रे… हमरा फगवा देतो दे…
नृत्याचा फेर धरतात. याला ‘होरयार नृत्य’ म्हणतात. पैशाच्या रूपात फगवा मिळाला की, ओंडके बाजूला सारल्या जाते आणि येणार्‍या जाणार्‍याची वाट मोकळी करून दिली जाते.
होळीला महाराष्ट्रात ‘शिमगा,’ दक्षिणेत ‘कामदहन’ तर बंगालमध्ये ‘दौलायात्रा’ असे म्हणतात. शिशिरातील फाल्गून पौर्णिमेच्या दिवशी होळी पेटविली जाते. होळी म्हणजे गारठवून टाकणार्‍या थंडीला निरोप. थंडीच्या दिवसांत आपल्याला उष्णता देणार्‍या अग्नीला कृतज्ञतापूर्वक दिलेला निरोप. म्हणजेच ऋतुराज वसंताचे स्वागत. देशात फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतचे पाच दिवस, तर कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो. मेळघाटात पाचही दिवस हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
‘होळी’ हा विकारांची होळी करण्याचा सण आहे. ‘‘विकारांची जळमटे जाळून टाकून नवीन उत्साहाने सत्त्वगुणाकडे जाण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत,’’ याचे जणू हा सण प्रतीकच आहे. राहिलेला सूक्ष्म-अहंकार हाही होळीतील अग्नीत नाहीसा होतो. तो शुद्ध सात्त्विक होतो. त्यानंतर रंगपंचमी आनंदाची उधळण करत येते. नाचत-गात एकत्र येऊन जीवनाचा आनंद लुटायचा. म्हणजेच आनंदाची उधळण करणारा हा उत्सव आहे.
होळीत वापरण्यात येणार्‍या लाकडांमुळे कित्येक वृक्ष नष्ट केले जातात. यामुळे वनाची हानी होते. आदिवासी हा जरी निसर्गपूजक आणि निसर्गरक्षक असला तरी डोंगर कपारीतील गावागावांत अशा कित्येक होळ्यांसाठी किती वृक्ष तोडली जात असतील आणि त्यामुळे एकप्रकारे वनाचा काही प्रमाणात र्‍हास होतोच ना? पर्यावरणाचं संतुलन बिघडतंच ना? याला जबाबदार कोण? परंतु आदिवासी हे जंगलाचे खरे रक्षक आहेत. त्यामुळे या जंगलावर त्यांचा थोडाफार हक्क चालू शकतो, असं म्हटल्यास वावगं होणार नाही.
अशा तर्‍हेने सातपुड्याच्या दर्‍याखोर्‍यातील आदिवासी कोरकू आपल्या परंपरागत पद्धतीने होळीचा हा सण साजरा करतात. पंचमीच्या दिवशी होलिकोत्सवाची सांगता होते. त्या दिवशी मोहाच्या फुलांपासून तयार केलेली ‘सिडडू’ (एक प्रकारचं मद्य) प्राशन करणं पवित्र समजलं जातं. सर्व सुखदु:ख विसरून त्यात ते तल्लीन होतात. सातपुड्यातील होळीच्या रंगाचा हा अनोखा सण कोरकूंच्या आयुष्यातही आनंदाचे रंग भरत असतो. दर्‍याखोर्‍यांचा, घनदाट वनश्रीचा आणि समृद्ध सजीवसृष्टीचा मेळघाट या होळी रंगात न्हाऊन निघत असतो.
प्र. सु. हिरुरकर/ ९८२२६३९७९८