विकासकामांना खिळ बसू देणार नाही

0
47

– संदीप जाधव यांनी व्यक्त केला विश्‍वास

माजी अध्यक्ष सुधीर राऊत यांनी अध्यक्षपदाचा पदभार संदीप जाधव यांना सोपविल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना सुधाकर कोहळे. सोबत सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे व संदीप जोशी

तभा वृत्तसेवा
नागपूर, ११ मार्च
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरात अनेक विकास कामे सुरू केली आहे. ही विकास कामे सुरू ठेवण्याची जबाबदारी नागपूर महानगरपालिकेची आहे. सध्या मनपा आर्थिक संकटांचा सामना करीत असली तरी शहरात सुरू असलेल्या विकास कामांना खिळ बसू दिली जाणार नाही, असा विश्‍वास महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप जाधव यांनी व्यक्त केला.
आज सिव्हिल लाईन्सस्थित मनपा मुख्यालयात मावळते अध्यक्ष सुधीर (बंडू) राऊत यांच्याकडून स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत बोलताना संदीप जाधव म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भाजपाचे शासन आहे. त्यामुळे मनपाला त्यांच्याकडून भरपूर सहकार्याची अपेक्षा आहे. सध्या तरी या अपेक्षांची पूर्तता केली जात असल्यामुळेच आज शहरात जागोजागी विकास कामे होताना दिसत आहेत.
मनपामध्ये आवक वाढविणारे जे विभाग आहे त्यांची आवक वाढवून मनपाचा महसूल कसा वाढविता येईल, याचा प्रयत्न केला जाणार आहे. आज शहरातील ५० टक्के लोक मालमत्ता कराचा भरणा करीत नाहीत. त्यांच्या बाबतीत काही कठोर पावले उचलावी लागली तर ती नक्कीच उचलली जातील. आधी त्यांना एकरकमी कर भरण्याची एखादी योजना देता येईल का ते तपासून बघितले जाईल आणि नंतर गरजेनुसार जप्तीसारखी कठोर कारवाई करावी लागेल, असे सांगून जाधव म्हणाले की, जर आपण नागरिकांना काही सुविधा देत आहोत तर त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निधी उभा करायचा असेल तर कठोर पावले उचलावीच लागतील.
मालमत्ता कर वसुलीच्या संदर्भात नवीन पद्धत अंगीकारली जाईल. मालमत्ता कर वसुलीसंदर्भात खाजगीकरण अजीबात केले जाणार नाही, असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात स्पष्ट केले. आव्हान खूप आहेत. आज पहिलाच दिवस आहे. मी सर्व काही समजून घेण्याचा प्रयत्न करीन. दहाही झोनचा दौरा करून तेथील मालमत्ता करासंदर्भातील परिस्थितीची माहिती जाणून घेईल. त्यानंतर उपाययोजना आखल्या जातील. त्याची माहितीही मी तुम्हाला देत राहील, असेही जाधव यांनी पत्रकारांना सांगितले.
अंदाजपत्रक आधी महापौर तयार करतात. ते आमच्याकडे आल्यावर त्याला आपण अंतिम रूप देतो. असेच यंदाही हे अंदाजपत्रक आल्यानंतर त्यात आवश्यक त्या सुधारणा करून मी ते लवकरच सादर करील, असेही जाधव यांनी सांगितले.

चौकट…
अविरोध निवड
संदीप जाधव यांचे स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी नाव आधीच जाहीर केले होते. मात्र, आज सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या या पदावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आज शनिवारी सकाळी ९.३० वाजता संदीप जाधव यांनी स्थायी समितीच्या अध्यक्षपदाकरिता नामनिर्देशन पत्राचे तीन संच निगम सचिव हरीश दुबे यांच्याकडे सादर केले. त्यावर सूचक व अनुमोदक म्हणून संगीता गिर्‍हे, सरला नायक, मनीषा कोठे, नेहा वाघमारे, रिता मुळे व उषा पॅलट यांची स्वाक्षरी होती. सकाळी १० वाजता पीठासीन अधिकारी असलेले जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक पार पडली. नियोजित वेळेमध्ये संदीप जाधव यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व अतिरिक्त आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व तुळशीचे रोपटे देवून स्वागत केले. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांच्या कक्षात मावळते स्थायी समिती सभापती सुधीर (बंडू) राऊत व महापौर नंदा जिचकार यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांना अध्यक्षांच्या आसनावर विराजमान केले. याप्रसंगी शहरातील आमदार, मनपा पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.