भारतीयांनी नवा हिंदुस्तान घडवण्याचा संकल्प सोडावा

देशवासीयांना मोदींचे कळकळीचे आवाहन

0
274

गरीब, मध्यमवर्गीयांच्या सोबतीने प्रगती साधणार
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १२ मार्च
आमच्याजवळ पाच वर्षांचा काळ आहे, या काळात प्रत्येक भारतीयाने एक संकल्प केला तर २०२२ पर्यंत देशात नवीन हिंदुस्थान तयार झाल्याशिवाय राहणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केले.
उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी भाजपा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री तसेच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे उपस्थित होते.
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत आम्हाला जो जनादेश मिळाला, त्याकडे नवीन भारताचा नवीन पाया म्हणून मी पाहतो, या जनादेशातून मला नवीन हिंदुस्थानचे दर्शन होते आहे, असे मोदी म्हणाले. मतदारांनी भाजपाला जो अभूतपूर्व कौल दिला आहे, त्यामुळे राजकीय पंडितांना विचार करण्यास भाग पाडले असल्याचा टोला मोदी यांनी लगावला.
गरीब व्यक्ती आणि मध्यमवर्गाला एकत्र आणत देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा आणि आर्थिक क्रांती घडवण्याचा निर्धार मोदी यांनी व्यक्त केला. गरीब व्यक्तीला त्याच्यातील शक्तीची ओळख करून दिली आणि मध्यमवर्गावरचे ओझे कमी केले, तर देशाच्या विकासासाठी समाजातील हे दोन घटक आपली पूर्ण ताकद पणाला लावतील, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
सरकार बहुमताने बनते, पण सर्वमताने चालते, याकडे लक्ष वेधतांना मोदी म्हणाले की, निवडणुकीत आम्हाला मतदान करणार्‍या आणि मतदान न करणार्‍यांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू. कारण सरकारला कधी भेदभाव करता येत नाही, आणि सरकारने देशातील नागरिकांसोबत भेदभाव करुही नये.
ज्याप्रमाणे फळांनी लदबदलेला वृक्ष झुकलेला असतो, त्याप्रमाणे पाच राज्यातील विजयाने वृक्षरुपी भाजपालाही झुकावे लागेल, नम्र व्हावे लागेल, अहंकार सोडावा लागेल, असा संदेश मोदी यांनी भाजपाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिला.
२०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर मी तीन गोष्टी सांगितल्या होत्या, पण त्यावेळी माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, आम्ही नवीन असल्यामुळे आमच्या हातून चुका होऊ शकतात, मात्र कोणत्याही चुकीच्या हेतुने आम्ही कधी काही करणार नाही, आम्ही परिश्रमाची पराकाष्ठा करू, आणि जे काही करू ते प्रामाणिकपणे, असे मी त्यावेळी म्हटले होते, त्यावर मी आजही ठाम आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, कुशाभाऊ ठाकरे, जन कृष्णमूर्ती आणि अन्य लोकांनी जे अपार परिश्रम केले, घाम गाळला, त्यामुळेच भाजपा आजच्या स्थितीत येऊ शकला, असे गौरवोद्गारही मोदी यांनी काढले.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी प्रास्ताविक केले. या विजयाबद्दल भाजपा सांसदीय मंडळातर्फे भव्य पुष्पहाराने मोदी यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मोदी भाजपा मुख्यालयात आले तेव्हा त्यांचे अभूतपूर्व असे स्वागत करण्यात आले. त्यांच्यावर गुलाबपुष्पांचा वर्षाव करण्यात आला. हॉटेल ली मेरिडियनपासून ११ अशोका रोडपर्यंत पंतप्रधान मोदी पायी चालत आले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यांच्या दुर्तफा आणि भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांनी तसेच लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. भाजपा मुख्यालय आकर्षकपणे सजवण्यात आले होते. आत पाय ठेवायलाही जागा नव्हती.