मंगळावर बटाट्याची लागवड शक्य!

0
308

वृत्तसंस्था
न्यूयॉर्क, १२ मार्च
आपल्या ग्रहमालिकेतील अनेक ग्रह व चंद्रांचा सध्या खगोलशास्त्रज्ञांकडून अभ्यास सुरू असला तरी शेजारच्या मंगळाकडेच त्यांचे अधिक लक्ष आहे. मंगळभूमीवर भाज्या उगवता येतील का याचीही चाचपणी सुरू आहे. संशोधकांना एका प्रयोगातून असे दिसून आले आहे की मंगळभूमीवर चक्क बटाट्याची लागवड करणे शक्य होऊ शकते. पेरू देशातील लिमा येथील इंटरनॅशनल पोटॅटो सेंटरमधील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे.
पृथ्वीवरील दुर्गम ठिकाणी असलेल्या व कठीण स्वरूपाच्या हवामानातही जर हे बटाटे उगवता येऊ शकत असतील तर ते मंगळावरील वातावरणातही उगवता येऊ शकतील, असे संशोधकांना वाटते. गेल्या वर्षी १४ फेब्रुुवारीला याबाबतचे प्रयोग सुरू करण्यात आले होते. नासाच्या कॅलिफोर्नियामधील ऍमीस रिसर्च सेंटरच्या संशोधकांनी या प्रयोगासाठी वेगवेगळे सल्ले दिले होते तसेच डिझाईनही बनवून दिले होते.
लिमामधील युनिव्हर्सिटी ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधील इंजिनिअरनी यासाठी एक विशिष्ट क्यूबसॅट निर्माण करून मंगळसदृश वातावरणाची निर्मिती केली होती. त्यामधील प्रतिकूल वातावरणातही जर बटाट्यांचे उत्पादन घेता येऊ शकत असेल तर मंगळावरही ते घेता येईल अशा निष्कर्षाप्रत हे संशोधक आले.