गायक आदर्श शिंदेंच्या नावाने बनावट फेसबूक अकाऊंट

0
111

युवकाने घातला हजारोंचा गंडा
वृत्तसंस्था
पिंपरी-चिंचवड, १२ मार्च
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार आदर्श शिंदे यांच्या नावे फेक अर्थात बनावट फेसबुक प्रोफाईल तयार करून अनेकांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईचा मूळ रहिवासी असलेल्या संतोष उजागरे विरोधात पिंपरीतील निगडीमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
संतोषने आदर्श शिदेंच्या नावे दोन वर्षांपूर्वी बनावट फेसबुक अकाऊंट उघडल्याचं समोर आले आहे. या माध्यमातून आतापर्यंत अनेकांकडून पैसे उकळल्याची माहिती आहे. फिल्म इंडस्ट्रीत काम देण्याच्या आमिषाने त्याने अनेकांकडून पैसे लाटल्याचा संशय आहे.
एका महिलेकडून संतोषने हजारो रुपये घेतले होते. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, या महिलेने थेट आदर्श शिंदेंचे भाऊ उत्कर्ष शिंदेंशी संपर्क साधला. तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी निगडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
आदर्श शिंदे यांनी गायलेली देवा तुझ्या गाभार्‍याला उंबराच नाही, मोरया, गाणं वाजू द्या, गजाल खरी काय, अंबे कृपा करी यासारखी गाणी प्रचंड गाजली आहेत.