यवतमाळात दारूची होळी

‘दारूविधवा’ जयमालाच्या हस्ते दहन

0
145

तभा वृत्तसेवा
यवतमाळ, १२ मार्च
जिल्ह्यात दारूबंदीसाठी लढा देणार्‍या स्वामिनी संघटनेने होळीच्या दिवशी, रविवार, १२ मार्च रोजी यवतमाळच्या पोस्टल मैदानाजवळ चक्क दारूची होळी करण्याचा अभिनव कार्यक्रम राबविला. विशेष म्हणजे, पंधराच दिवसांपूर्वी दारूमुळे विधवा झालेल्या जयमाला बोंद्रे या दोन लहान मुलांच्या आईच्या हस्ते ही होळी पेटविण्यात आली.
होळीच्या दिवशी वाईट गोष्टी जळून खाक व्हाव्यात, जिल्ह्यातून दारूसारखे व्यसन हद्दपार व्हावे आणि याची दखल सरकारने घ्यावी म्हणून या ‘दारूच्या होळी’चे आयोजन स्वामिनीतर्फे करण्यात आले.
३१ मार्चपर्यंत महामार्गांजवळ असलेली दारूची सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि उर्वरितही दुकाने सरकारने त्वरित बंद करावी, या शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याला दारूमुक्त करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
‘स्वामिनी’चे संयोजक महेश पवार, मनीषा काटे, बालाजी कदम, वर्षा निकम, भावना नव्हाते, सपना श्रीकांत लोढम, सुषमा गाढवे, सीमा तेलंगे, सारिका ताजणे, एकनाथ डगवार, अशोक उमरतकर, वीणा घावडे, जयश्री राऊत, सविता हजारे, अलका कोथळे यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थिती होते.