रंगांचे अंतरंग

0
97

कल्पवृक्ष

कोणे एके काळची ही गोष्ट सर्वांनाच माहीत आहे. बालवाडीत त्यावर नेहमीच नृत्यनाटिका सादर होतात. पण, पुन्हा त्याची आठवण झाली म्हणजे आशय मनात पक्का होतो. एकदा काय झाले, रंगांचे भांडण जुंपले. चांगलीच वादावादी आणि हमरीतुमरी सुरू झाली. हिरवा रंग म्हणाला, मीच सर्वश्रेष्ठ. मी जीवन व आशा यांचे प्रतीक आहे. निसर्ग माझ्याच रंगाने रंगलेला आहे. प्राणिसृष्टी माझ्यावरच अवलंंबून आहे. निळा म्हणाला, तू फक्त पृथ्वीचा विचार करतो. आकाश आणि पाणी निळेच आहे. मी शांततेचे प्रतीक आहे, त्याशिवाय सारे व्यर्थ. पिवळा म्हणाला, सूर्य, चंद्र, तारे पिवळेच आहेत. सूर्यफुलासारखे जगणे मी शिकवतो. तुम्ही गंभीर आहात. माझ्याशिवाय जगात आनंद नाही. भगवा म्हणाला, मी आरोग्य आणि शक्तीचे प्रतीक आहे. मी म्हणजे ऊर्जा. ऊर्जेशिवाय जग चालूच शकत नाही. हे ऐकून लाल रंग अधिकच लाल झाला. लाल रक्त म्हणजेच जीवन. मी शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. शत्रूंशी व संकटांशी मीच लढतो म्हणून तुम्ही जिवंत आहात. जांभळा म्हणाला, मी तर राजा, राणी व चक्रवर्ती सम्राटांचा आवडता रंग. विद्वत्तेचा प्रतीक. शेवटी सगळे अधिकार माझ्याच हातात असतात. आतापर्यंत शांत असलेला पारवा रंग म्हणाला, खोल पाण्याचा रंग माझाच. मी मौन, विचार व चिंतनशीलतेचा प्रतीक. माझ्याशिवाय तुमचे अस्तित्व वरवरचे, उथळ. समतोल करण्यासाठी माझीच गरच भासते. हे भांडण सुरू असतानाच अचानक जोरदार वादळ सुरू होते. विजा कडाडतात. पाऊस सुरू होतो. सर्वांनाच खूप भीती वाटते. सर्व रंग एकमेकांच्या जवळ येतात. आणि काय आश्‍चर्य! सुंदर इंद्रधनुष्य तयार होते. त्यापाठोपाठ इंद्रदेव समोर येतो. तो त्यांना म्हणतो, तुम्ही एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न का करता? तुम्ही सारेच एकमेवाद्वितीय आहात. प्रत्येकाचा विशेष उद्देश आहे. असेच नेहमीकरिता एकत्रित या. हातात हात घालून चला. तुम्ही कोण आहात, हे प्रकाशाला विचारा. ते कळले तर तुमचे भांडण कायमचे समाप्त होईल. तेव्हापासून इंद्रधनुष्य उद्याची आशा जागवतो. एकमेकांचा स्वीकार करण्याचा संदेश देतो.
त्यानंतर सातही रंग प्रकाशाकडे गेले. त्यांनी त्याला विचारले, प्रकाशा, तुझा रंग कोणता? प्रकाशाने उत्तर दिले, तुम्हीच शोधा! सर्वांनीच निरीक्षण केले. त्यांचा अहंकार गळून पडला. आपण सर्वच किती संकुचित आहोत, याची त्यांना जाणीव झाली. एकाच प्रकाशाचे आपण भाग आहोत, याचा त्यांना साक्षात्कार झाला. त्यांचे भांडण कायमचे संपले.
वर्षानुवर्षे आपण इंद्रधनुष्य पाहतो, वसंत ऋतूच्या स्वागताकरिता रंगोत्सवही साजरा करतो. पण, आपले रंगांचे भांडण काही संपत नाही. रंगभान देणारी दृष्टी मात्र आपल्याला मिळत नाही. एका गावात एक आंधळा माणूस होता. रंगांचा उल्लेख आला की, तो वाद घालायचा. रंग अस्तित्वातच नाहीत, असे त्याचे ठाम मत होते. रंगांविषयी सगळेच त्याला वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगायचे. पण, त्याच्या विचारात फरक पडत नसे. एकदा त्या गावात गौतम बुद्ध आले. अंध व्यक्ती त्यांना खूप मानत असे. गावकरी तथागतांना म्हणाले, ‘‘आम्ही सर्व थकलो. तुम्हीतरी याला समजावून सांगा की, रंग असतात. त्या शिवाय तो मानणार नाही.’’ गौतम बुद्ध हसले. ते म्हणाले, ‘‘त्याला समजावून सांगण्याची गरज नाही. त्याच्या डोळ्यांवर उपचार करण्याची गरज आहे. एकदा दृष्टी आली की त्याला ते कळेलच.’’ बुद्धांनी त्याला वैद्याकडे पाठविले. उपचारामुळे त्याला दृष्टी आली.
प्रकाश म्हणजे ज्ञान. ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय खरी दृष्टी येणार नाही. विविधता हे सृष्टीचे सौंदर्य आहे. प्राणी, वनस्पती यांच्यात जशी विविधता आहे तशीच मानवी जीवनातही आहे. विचार, आचार, पंथ, कर्मकांड यांच्यातही भिन्नता आहे. अनेक महापुरुष वेगवेगळ्या कालखंडात होऊन गेले. त्यांची शिकवणही वेगळी आहे. सर्वांचे रंग आणि रंगच्छटा वेगळ्या. पण माझाच रंग श्रेष्ठ, असे कसे म्हणणार? दुसर्‍या रंगाविषयी आदर तर सोडाच, पण त्यावर आक्रमण करून तो नष्ट करण्याचाही आपण प्रयत्न करतो. ग्रंथ, महापुरुष, पंथ किंवा विचारधारांविषयीच्या अतिरेकी रंगनिष्ठा सामाजिक जीवनाच्या आरोग्याकरिता अनिष्ट आहेत. डोळे असूनही अंधत्व आलेल्या समाजाला विविधतेत एकत्वाचा अनुभव देणारी जीवनदृष्टी हा रंगोत्सव देणार का? रंगांचे अंतरंग कळून भविष्याच्या उज्ज्वल प्रकाशवाटा आपल्याला गवसणार का? आपल्या संस्कृतीचे भान, हाच त्यावरचा उपाय नाही काय?
रवींद्र देशपांडे,८८८८८०३४११