चळवळ

0
246

चिंतन

जगात आर्थिक शोषणाविरुद्ध उभे झालेले लढे आता धर्माचा आधार घेऊन लढल्या जात आहेत. त्याच पद्धतीने आपल्या देशात आर्थिक विषमतेविरुद्ध उभे झालेले लढे जातीचा आधार घेऊन लढण्याची स्पर्धा चालू झाली आहे. प्रत्येक जातीचा नेता समान मुद्यावर आपले वेगळे अस्तित्व दाखविण्याचा खटाटोप करीत आहे. त्यातून मूळ मुद्दा बाजूला पडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा अट्टहास व्यक्त होत आहे. त्यासाठी आपापल्या जाती-समूहाला वेठीस धरण्यात येत आहे.
ज्या ज्या देशांमध्ये भांडवली व्यवस्था आहे किंवा होती त्या त्या देशात कामगारांचे व श्रमिकांचे शोषण होत होते. त्याला विरोध करण्यासाठी कम्युनिझमचा उदय झाला. या विचारधारेने भांडवलशाहीच्या विरोधात लढा उभा केला. आपल्याही देशात या विचारधारेचा अनुनय करणारा वर्ग तयार झाला. त्यात त्यांना बर्‍यापैकी यशही मिळाले. स्वातंत्र्यपूर्व काळात या विचारधारेचे नेतृत्व बुद्धिजीवी लोकांकडे होते. नुसत्या संख्येतच नव्हे, तर बौद्धिक स्तरावरही भांडवली व्यवस्थेचे वाभाडे काढण्यात या चळवळीला यश मिळत होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात चालू असलेल्या सर्वच चळवळींमधून बुद्धिजीवी वर्गाची जागा जातीय नेतृत्वाने घेतली. त्यामुळे या व्यापक लढ्यांना संकुचित स्वरूप आले. अर्थवादी चळवळींचे जातीय लढ्यात रूपांतर झाले. आर्थिकवाद लढ्याला, अशा स्वरूपामुळे प्रचलित राजकीय व्यवस्थेला असे लढे संपविणे सहज शक्य झाले. आर्थिकवाद बाजूला पडल्यामुळे कम्युनिझम चळवळीला घरघर लागली. त्यामुळे ही चळवळ टिकविण्यासाठी त्यांच्या नेतृत्वालाही धर्माचा व जातीचा आधार घेऊन समाजात द्वेष पसरविण्याचा मोह झाला.
गांधीहत्येनंतर आर्थिक लढे ब्राह्मणद्वेषावर लढल्या जाऊ लागले. सर्वच चळवळींचे नेतृत्व ब्राह्मणांच्या हातून जाऊन जातीचे राजकारण करणार्‍यांच्या हाती आले. इंग्रजांच्या जाण्याने बहुजन समाजातील नेत्यांना देशप्रेमाचे जणू स्फूरणच चढले. सत्ता जातीच्या संख्येवर ताब्यात मिळते म्हटल्यावर स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या कॉंग्रेसला ब्राह्मणी पक्ष म्हणून हिणवल्या गेले, त्याच पक्षावर संख्येच्या आधारावर सत्ता मिळवल्या गेली. सत्तेच्या मोहामुळे आपल्याच लोकांच्या आर्थिक शोषणाविरुद्धच्या लढ्याचा त्यांना विसर पडला, स्वत:च त्या शोषणव्यवस्थेेचे म्होरके म्हणून मिरवीत राहिले व सत्ता काबीज केली.
कामगारांच्या व शेतकर्‍यांच्या चळवळी सुद्धा राजकीय पक्षांच्या हातात गेल्या. जो तो पक्ष त्यांच्या राजकीय गरजेनुसार त्याचा वापर करीत राहिला. शेतकर्‍यांची एक स्वतंत्र चळवळ ८० च्या दशकात चालू झाली. १९९२ पर्यंत ही चळवळ जोमात होती. पण तिलाही जातीचे अस्त्र वापरून कमकुवत करण्यात राजकीय धुरीणांना यश मिळाले. संघटनेतील कार्यकर्त्यांना आपला स्वार्थ पुरा करण्याची स्वप्ने पडू लागली. त्यांच्या मनात ब्राह्मणीद्वेषाचे बिज पेरले गेले. त्याचा परिणाम म्हणून एक मजबूत संघटित चळवळ अस्ताला गेली. शेतकर्‍यांचे हित बाजूला पडले. व्यक्तिगत स्वार्थ मोठा ठरला.
आर्थिक विषमतेच्या विरुद्ध उभ्या झालेल्या चळवळी थंडावल्यावर भाषिक व प्रांताच्या विरुद्ध आंदोलने उभी झाली. लोकांच्या भावना भडकवल्या गेल्या. प्रत्येक जाती-समूहाला आपल्यावर अन्याय करणारा आपल्या जातीचा असला तरी चालतो, पण इतर जातीतील सदाचारी नको इतकी हीन भावना समाजात पाहावयास मिळते.
देशातील सध्याची राजकीय व सामाजिक स्थिती पाहता समाजातील सर्व स्तरातील बुद्धिजीवींनी आपले जातीय व प्रांतिक मतभेद विसरून समाजालाच नव्हे, तर राष्ट्राला एकसंध ठेवण्यासाठी द्वेषविरहित आगळी वेगळी चळवळ उभी करण्याची गरज आहे. तरच भारताची समानता, मैत्री व बंधुभावाची गौरवशाली परंपरा टिकून राहू शकते.
जयंत बापट,९४२१७७५६१६