गोवा : आले ‘मनोहर’ घरी…

• ९ मंत्र्यांसह पर्रीकर यांचा शपथविधी • उद्या बहुमत सिद्ध करणार

0
233

वृत्तसंस्था
पणजी, १४ मार्च
मनोहर पर्रीकर यांनी गोव्याचे १३ वे मुख्यमंत्री म्हणून आज मंगळवारी शपथ घेतली. त्यांच्यासोबत ९ मंत्र्यांचाही शपथविधी पार पाडण्यात आला. यासोबतच, गोवात आजपासून ‘मनोहर’राज सुरू झाले आहे. पर्रीकर सरकार येत्या गुरुवारी विश्‍वासमताचा सामना करणार आहे.
पर्रीकर यांच्या शपथविधी सोहळ्यावर स्थगिती आणण्याची कॉंगे्रसची याचिका फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालयाने आज सकाळी शपथविधीला परवानगी दिली होती. त्यानंतर सायंकाळी पर्रीकर मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात भाजपाचे दोन, गोवा फॉरवर्ड पार्टीचे तीन, मगोपचे दोन आणि दोन अपक्षांचा समावेश आहे. पर्रीकर यांनी कोंकणी भाषेतून शपथ घेतली. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय भूपृष्ठ आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, एम. व्यंकय्या नायडू व भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला शपथविधीच्या ४८ तासांत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत, त्यानुसार पर्रीकर यांना गुरुवारीच आपल्या सरकारचे बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
मनोहर पर्रीकर चौथ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. पर्रीकर यांच्यासोबतच महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे सुदिन ढवळीकर, गोवा फॉरवर्ड पार्टीचे विजय सरदेसाई, भाजपा नेते फ्रान्सिस डिसुझा, मनोहर आजगावकर, अपक्ष आमदार रोहन खाऊंटे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. सुदिन ढवळीकर यांनी मराठीतून शपथ घेतली. गोवा फॉरवर्ड पक्षाच्या विजय सरदेसाईंनी कोकणीमधून शपथ घेतली. मागील सरकारमधील माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुझा यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली.
गोवा विधानसभा निवडणुकीत ४० पैकी कॉंग्रेसला सर्वाधिक १७ आणि भाजपाला १३, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीला ३, गोवा फॉरवर्ड पार्टीला ३, राष्ट्रवादी कॉंगे्रसला एक आणि अपक्षांना ३ जागा मिळाल्या होत्या. मगोप, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अपक्षांनी भाजपाला पाठिंबा दिल्याने भाजपाचे संख्याबळ २१ वर गेले.
विश्‍वासमत सिद्ध होणार
भाजपा सरकार येत्या गुरुवार विधानसभेत विश्‍वासमत नक्कीच सिद्ध करेल, असा विश्‍वास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला. भाजपाने गोव्यात पैशाच्या बळावर सरकार स्थापन केले आहे, हा कॉंगे्रसचा आरोपही त्यांनी यावेळी फेटाळून लावला.
कॉंगे्रस नेते राज्यपालांना भेटले
दरम्यान, पर्रीकर सरकारचा शपथविधी सुरू होण्याआधी कॉंगे्रसच्या नेत्यांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची राजभवनात भेट घेतली आणि आम्हाला बहुमत सिद्ध करण्याची एक संधी द्यावी, अशी मागणी केली. पण, राज्यपालांनी त्यांना कोणतेही ठोस आश्‍वासन दिले नाही. कॉंगे्रस राज्यात सर्वात मोठा पक्ष असल्याने सरकार स्थापन करण्याची पहिली संधी आम्हालाच द्यायला हवी, असा युक्तिवादही पक्षनेत्यांनी केला.
पंतप्रधानांच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्रीकर यांना शुभेच्छा दिला. आपल्या नेतृत्वात गोवा विकासाच्या नव्या उंचीवर जाईल, असा विश्‍वासही ट्विटरवर व्यक्त केला.
एक चूक, दोन वेळा शपथ
दरम्यान, मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना चूक केली. पर्रीकर यांनी सुरुवातीला मुख्यमंत्रिपदाऐवजी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर ही चूक लक्षात आणून दिल्यावर पर्रीकर यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली.