शेअर बाजाराची विक्रमी भरारी

0
111

वृत्तसंस्था
मुंबई, १४ मार्च
उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपाच्या दणदणीत विजयाचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराने दोन वर्षांचा उच्चांक गाठला, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने नऊ हजाराचा स्तर पार करून आजवरचा नवा उच्चांक गाठला आहे. आजच्या व्यवहारात सर्वच गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.
आज सकाळच्या व्यवहाराची सुरुवात मुंबई शेअर बाजाराची सुरुवात ६१६ अंकांच्या कमाईसह झाली. जानेवारी महिन्यात औद्योगिक क्षेत्राने केलेली भरीव कामगिरी आणि उत्तरप्रदेशात भाजपाची ऐतिहासिक कामगिरी यामुळे सुखावलेल्या गुंतवणूकदारांनी शेअर्स खरेदीवरच विशेष भर दिला होता. राष्ट्रीय शेअर बाजारातील चित्रही यापेक्षा निराळे नव्हते. घाऊक आणि किरकोळ महागाईच्या दरात वाढ झाली असतानाही गुंतवणूकदारांच्या शेअर्स खरेदीवर उड्या पडत होत्या.
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने दिवसभराच्या उलाढालीत ६१५.७० अंकांच्या कमाईसह २९,५६१.९३ अशा उच्चांकावर पोहोचला होता. सायंकाळी ४९६.४० अंकांच्या कमाईसह निर्देशांक २९,४४२.६३ या स्तरावर बंद झाला. यापूर्वी, ५ मार्च २०१५ रोजी हा स्तर पाहायला मिळाला होता. ५० कंपन्यांवर आधारित राष्ट्रीय शेअर बाजाराचे प्रतिनिधित्व करणार्‍या निफ्टीनेही १५२.४५ अंकांची कमाई करताना, आजवरचे सर्वच विक्रम मोडीत काढले. दिवसभराच्या व्यवहारानंतर निफ्टी ९०८७ या स्तरावर पोहोचला.