बारावीत अपयशाच्या भीतीने आत्महत्या

0
238

नृत्यविषारदेचे भयतांडव
तभा वृत्तसेवा
वणी, १४ मार्च
भारतरत्न गानगोकिळा लतादीदी आणि विक्रमवीर सचिन तेंडूलकरच्या युगातच परीक्षेतील गुणांची टक्केवारी कला आणि क्रीडा गुणांवर अद्यापही हावी आहे. देशपातळीवर आपल्या नृत्यलालित्याने ख्यात असलेल्या एका विद्यार्थीनीने परीक्षा संपताच अपयशाच्या भीतीने आत्महत्या करण्याची दुर्दैवी घटना घडली.
नुकत्याच दिलेल्या बारावीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळतील, या भीतीने वणीच्या या गुणी मुलीने बाभुळगाव तालुक्यातील तिच्या मामाच्या गावी विषारी तणनाशक प्राषण करून जीवनयात्रा १४ मार्च रोजी संपविली.
वणीच्या सामाजिक क्षेत्रात हिरीरीने भाग घेणार्‍या नारायण गोडे यांना दोन मुले आणि रागिणी ही अतिशय हुशार व प्रतिभासंपन्न मुलगी. शिक्षणासोबतच नृत्याची विशेष आवड असल्यामुळे वडिलांसोबतच आई सुमित्रा यांनीही मनापासून प्रोत्साहन दिल्यामुळे रागिणीने बालपणापासूनच नृत्याचे धडे गिरवायला सुरवात केली होती.
पाहतापाहता रागिणीने या क्षेत्रात पारंगत होऊन राष्ट्रीय पातळीवरसुद्धा वणीचे नाव चमकवले. १४ आणि १६ वर्षांखालील स्पर्धेत तिने राष्ट्रीय स्तरावर प्रथम पारितोषिक पटकावले. त्याबद्दल गतवर्षी वणी प्रेस वेलफेअर असोसिएशनने तिच्या नृत्याचा खास कार्यक्रम आयोजित करून तिचा सत्कारही केला होता.
लॉयन्स कॉन्व्हेंटमधून दहावी उत्तीर्ण झालेल्या रागिणी गोडे हिने ९५ टक्के गुण घेतले होते. मनमिळावू आणि लाघवी स्वभावाची रागिणी डॉक्टर होऊन गोरगरिबांची सेवा करायची आहे, असे अनेकदा बोलून दाखवत असे. बारावीच्या नुकत्याच संपलेल्या परीक्षेत जीवशास्त्र विषयात ९० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळतील, या भीतीने ती अस्वस्थ होती. परीक्षा संपल्यानंतर मामाच्या गावाला गेलेल्या रागिणीने १५ मार्चपासून वैद्यकीय प्रवेश परीक्षा पूर्वतयारीसाठी मैत्रिणींसोबत जाण्याचे ठरविले असतानाच स्वत:ला संपवून टाकले.