स्टीफन हॉकिंग : सकारात्मक विचारांचा वैज्ञानिक

0
153

मंथन

परमेश्‍वर काही व्यक्तींना असामान्य बुद्धिमत्ता देतो. ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग हे अशांमधील एक. ८ जानेवारी १९४२ रोजी स्टीफन हॉकिंग यांचा इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड येथे जन्म झाला. डॉ. फ्रँक हॉकिंग आणि आयसोबेल हॉकिंग हे त्यांचे पिता आणि माता. डॉ. फ्रँक हे जीवशास्त्रातील एक निष्णात संशोधक होते. स्टीफन हा त्यांचा पहिला पुत्र. त्याच्या जन्माचे काळी जागतिक महायुद्ध सुरू असल्याने त्यांचे कायम वस्ती असणारा उत्तर लंडन हा भाग धोक्याचा होता. म्हणून प्रसूतीसाठी हॉकिंग दाम्पत्य ऑक्सफोर्ड येथे राहावयास गेले होते. स्टीफनच्या जन्मानंतर ती मंडळी लंडनला परतली. डॉ. फ्रँक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रीसर्च या संस्थेत परजीवी विज्ञान (पॅरासिटीलॉजी) विषयाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. स्टीफन आठ वर्षांचा असताना हॉकिंग कुटुंब हार्टफोर्डशायर भागातील सेंट अल्बान्स या गावी गेल्याने तेथील मुलींच्या शाळेत प्राथमिक विभागात स्टीफन यांना दाखल केले. चार वर्षे त्या शाळेतील अभ्यासक्रम आटोपून १९५३ साली त्यांनी तेथील माध्यमिक शाळेत प्रवेश घेतला. एक उत्तम आणि हुशार विद्यार्थी अशी त्या शाळेत स्टीफनची ख्याती होती. तेथील गणिताचे शिक्षक डिक्रन तहाता यांच्यामुळे स्टीफनला गणित आणि विज्ञान विषयात जास्त गोडी निर्माण झाल्याचे स्टीफन नेहेमी सांगतात.
महाविद्यालयीन शिक्षणासाठी स्टीफन हॉकिंग यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या महाविद्यालयात गणिताच्या अध्ययनासाठी अर्ज केला. परंतु तेव्हा गणिताच्या अध्यापनाची तेथे सोय नसल्याने त्यांनी विज्ञानाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. त्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती देखील मिळाली. त्या अभ्यासक्रमातील भौतिकशास्त्र विषयाचा त्यांनी अभ्यास केला. त्यातील प्रामुख्याने उष्मागतिकी, सापेक्षतावाद आणि पुंज यामिकी या शाखांमध्ये त्यांना जास्त गोडी निर्माण होत होती, परंतु त्यांना प्रथम आणि द्वितीय श्रेणींच्या मधल्या दर्जाचे गुण मिळाल्याने त्यांना तोंडी परीक्षेला बसणे अनिवार्य झाले. ही गोष्ट मात्र त्यांना एक इष्टापत्तीच ठरली. या परीक्षेतील परीक्षक स्टीफनवर बेहद्द खुश झाले. १९६२ साली स्टीफन हॉकिंग यांना ऑक्सफोर्ड विद्यापीठाची बी. ए. ही पदवी मिळाली. त्यानंतर लगेच तेथेच खगोलशास्त्र या विषयाचा अभ्यास करण्याचे ठरविले. त्या अभ्यासक्रमात फक्त निरीक्षणात्मक खगोलशास्त्र होते. सौर डागांचा निरीक्षणात्मक अभ्यास करण्यापुरतीच तेथे सोय असल्याने स्टीफन यांना त्यात विशेष रुची येत नव्हती. सैद्धांतिक अभ्यासगकडे त्यांचा जास्त कल असल्याने त्यांनी ऑक्सफोर्ड सोडून केंब्रिज विद्यापीठाच्या ‘ट्रीनीटी हॉल’ मध्ये प्रवेश घेतला. सैद्धांतिक खगोलशास्त्र आणि विश्‍वरचनाशास्त्र या त्यांच्या आवडत्या विषयातील त्यांचा रीतसर अभ्यास तेव्हापासून खर्‍या अर्थाने सुरू झाला. ‘दैव देते, पण कर्म नेते’ या उक्तीला साजेशा घटना मात्र हॉकिंग यांच्या वाट्याला आली. हात, पाय जवळ जवळ लुळे पाडणारी एक दुर्धर व्याधी त्यांना जडली. परंतु त्यातून मार्ग काढून त्यांनी संशोधन कार्य पुन्हा सुरू केले. डेनीस विल्यम स्सीमा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आचार्य पदवीसाठी अभ्यास सुरू केला. रॉजर पेन्रोज नावाच्या सहकार्‍याबरोबर त्यांनी आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताच्या मदतीने एक गणिती संकल्पना प्रस्थापित केली. त्यामुळे १९७० मध्ये स्टीफन हॉकिंग यांना गणितातील विलक्षितता प्रमेय सिद्ध करता आला. या प्रमेयाने अवकाश पोकळीत गुरुत्वाकर्षणाने निर्माण होऊ शकणार्‍या विलक्षितते साठी आवश्यक असणार्‍या बाबींची माहिती मिळण्यास मदत होते. त्यानंतर बार्टन कार्टर, वेर्नर इस्झाईल आणि डी. रॉबिन्सन यांच्या मदतीने कृष्णविवरांचे संपूर्ण वर्णन त्यांचे वस्तुमान, कोनीय संवेग आणि विद्युतभार यांच्या माहितीने करता येते, हे स्पष्ट करणारा गणिती सिद्धांत स्टीफन हॉकिंग त्यांनी मांडला. पुढे १९७४ साली त्यांनी कृष्णविवरासंबंधीची नवीन माहिती दिली. त्यानुसार कृष्णविवरातील प्रचंड उष्णतेमुळे काही अति मूलभूत कण निर्माण होऊन ते विवरातून बाहेर पडतात, असे विधान हॉकिंग यांनी केले आहे. या बाहेर पडणार्‍या कणांच्या झोताला ‘बेकन्स्टिन हॉकिंग प्रारण’ असे आता नाव दिले गेले आहे.
हॉकिंग यांची टॉप-डाऊन कॉस्मॉलॉजी
विश्‍वाच्या उत्पत्तीबद्दल साधारणपणे विचारात असलेल्या पद्धतीला ‘बॉटम-अप’ संकल्पना असे म्हणतात. त्या संकल्पनेप्रमाणे उत्पत्तीच्या वेळी काय परिस्थिती होती याचा विचार करून कालांतराने त्यात कसे बदल होत गेले आणि आजचे विश्‍व दिसू लागले, या पद्धतीचा अवलंब केला जातो. परंतु उत्पत्तीच्या वेळच्या परिस्थितीचे नेमके गुणधर्म माहीत नसल्याने ही पद्धत अयोग्य असल्याचे हॉकिंग यांचे मत आहे. याउलट आजच्या स्थितीतील विश्‍वाचे गुणधर्म खात्रीलायकपणे माहीत असल्याने वर्तमान काळाकडून भूतकाळाकडे जाणे जास्त योग्य असल्याचे त्यांचे मत. या पद्धतीने जाऊन विश्‍वोत्पत्ती आणि विश्‍वरचनेच्या अभ्यास पद्धतीला ‘टॉप-डाऊन कॉस्मॉलॉजी’ असे म्हटले जाते. स्टीफन हॉकिंग आणि सर्न येथील वैज्ञानिक थॉमस हर्टोग या दोघांनी मिळून २००६ साली ही संकल्पना मांडली आहे. महास्फोट सिद्धांताप्रमाणे स्फोटानंतर सर्वत्र पसरलेले प्रारण क्षीण झाले असले, तरी ते सर्वत्र आढळत असल्याचे आता सप्रयोग स्पष्ट झाले आहे. विश्‍वातील सर्व घटना अथवा घडामोडी या प्रारणाच्या पार्श्‍वभागावर होत असतात. ‘कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड’ (सीएमबी) या नावाने ते ओळखले जाते. या सीएमबीचा सखोल अभ्यास करून कालप्रवाहात मागे जाऊन विश्‍वरचनाशास्त्राचा अभ्यास व्हायला हवा असे हॉकिंग सुचवितात. त्याच पद्धीने त्यांचे सैद्धांतिक संशोधन सुरू आहे.
खाजगी जीवन
बुद्धिवादी आणि कर्तबगार व्यक्तीला शरीराने योग्य साथ दिली नाही, तर त्याच्या कर्तबगारीवर बरीच मर्यादा पडते. स्टीफन हॉकिंग यांचे बाबतीत साधारणत: असेच घडले असते. परंतु त्यांनी मोठ्या हिमतीने तसे होऊ दिले नाही. चाकांच्या खुर्चीत बसूनच ते सर्व हालचाली करीत असतात. त्या खुर्चीलाच एक संगणक बसवून घेतल्याने त्यावरच सर्व गणिती क्रिया ते करतात. त्यामुळेच सैद्धांतिक विज्ञानात त्यांची प्रगती होऊ शकली. परंतु त्यांच्या व्याधीमुळे शारीरिक अडचणी सतत वाढतच गेल्या. १९७४ पासून तर त्यांना खाण्याची क्रिया देखील होईनाशी झाली आहे. आवाज सुद्धा क्षीण आणि अस्पष्ट झाल्याने फक्त काही जवळच्या मंडळींनाच त्यांचे बोलणे समजत असे. अशा अवस्थेत १९८५ साली न्युमोनिया झाल्याने त्यांच्या घशावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्यांची वाचा संपूर्णपणे गेली. केंब्रिजमधील एका संगणकतज्ज्ञाने मात्र त्यांच्यासाठी एक खास संगणक तयार करून दिल्याने ते एक विशिष्ट प्रकारचा ‘संवाद’ इतरांशी साधू शकतात. त्यांच्या हलक्या हालचालीने त्या संगणकावर अक्षरं उमटवतात आणि त्याला सांधलेल्या ‘व्हॉइस सिंथेसायझर’ या यंत्रणेद्वारे त्यांचे बोलणे ऐकता येते. अशा अवघड अवस्थेत असूनदेखील स्टीफन हॉकिंग यांनी बर्‍यापैकी कुटुंब सुख उपभोगले आहे. १९६५ मध्ये त्यांचा जेन विल्डे नावाच्या भाषेच्या विद्यार्थिनीशी विवाह झाला. त्यांना तीन अपत्ये झालीत. स्टीफन यांच्या वाढत्या परावलंबित्वाला कंटाळून जेन यांनी काडीमोड घेतला. पुढे चार वर्षांनी स्टीफन हॉकिंग यांचा एलीन मॅसन नावाच्या त्यांच्या परिचारिकेशी पुनर्विवाह झाला. २००६ पर्यंत हा संबंध कायम होता. स्टीफन हॉकिंग यांनी विज्ञान प्रसारासाठी अनेक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांचे १९८७ सालचे पुस्तक तर इतके लोकप्रिय झाले की, त्याचे एकूण २० भाषांमधून भाषांतर झाले आहे. हॉकिंग यांना अनेक सन्मान आणि पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘वुल्फ प्राईझ १९८८’; ‘प्रिन्स ऑफ ऑस्ट्रियाज अवॉर्ड १९८९’; ‘कोपले मेडल २००६’; ‘प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम २००९’ हे त्यातील काही प्रमुख.
डॉ. मधुकर आपटे,९९२२४०२४६५