…बस प्यार ही प्यार पले

0
185

एक आंधळा भिकारी रस्त्याच्या बाजूला बसलेला असतो. त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नसते. नुकताच वसंत ऋतू सुरू झालेला असतो. त्यामुळे एक लेखक सृष्टीचे सौंदर्य न्याहाळत भटकंती करत असतो. त्याचे लक्ष त्या गरीब आंधळ्या भिकार्‍याकडे जाते. त्याची करुण अवस्था पाहून तो अस्वस्थ होतो. त्याच्या जवळ देण्यासाठी एक छदामही नसतो. त्याला तेथे एक पाटी व खडू पडलेले दिसतात. तो त्या भिकार्‍याला म्हणतो, ‘‘मित्रा, माझ्याजवळ तुला देण्याकरिता शब्दांशिवाय काहीही नाही. मी या पाटीवर काही लिहिले तर चालेल का?’’ तो भिकारी हो म्हणतो. तो लेखक त्या पाटीवर काहीतरी लिहून त्याच्याजवळ ठेवतो आणि निघून जातो. त्या नंतर तेथून जाणारा प्रत्येक माणूस त्या भिकार्‍याजवळ पैसे टाकायला लागला. सायंकाळपर्यंत नाण्यांचा ढीग जमा झाला. तो भिकारी अस्वस्थ झाला. काय लिहिले असेल त्या लेखकाने या पाटीवर? तो एकाचा हात जबरदस्तीने पकडतो आणि विचारतो, ‘‘साहेब, या पाटीवर काय लिहिले आहे ते मला वाचून दाखवा ना.’’ तो माणूस वाचून दाखवतो. त्यावर लिहिले असते, ‘वसंत ऋतू, बहरलेली सृष्टी, माझ्या नशिबी हरवलेली दृष्टी.’ परिस्थितीमुळे त्या बिचार्‍या भिकार्‍याचे अश्रू कधीच सुकून गेले होते. हे वाक्य ऐकून त्याचे डोळे ओले होतात. वसंत आला की ही गोष्ट हटकून आठवते. नव्या जाणिवा देते. वसंत ऋतू एक चैतन्य घेऊन येतो. जुनी पिवळी पाने गळून जातात. वृक्षांना नवी पालवी फुटते. कोकीळ आर्त पंचम लावतो. सृष्टी नव रंगांनी, नव गंधांनी सृजनाची तयारी करते. वसंत हृदयातील प्रेमाला साद घालतो. पण, नशिबी हरवलेली दृष्टी असेल तर काय करेल वसंत? दृष्टी देणारा कुणी वसंतवेडा भेटायलाच हवा का?
कटु आठवणींची जुनी पिवळी पाने गळून गेल्याशिवाय चैतन्याची नवी पालवी उगवणारच नाही. वसंत प्रेमाला आवाहन आणि आव्हान देतो. ‘जहॉं गम भी ना हो, आँसू भी ना हो, बस प्यार ही प्यार पले’ अशा आकाशाखाली जगण्याचे तो स्वप्न देतो. प्रेम आपला मूळ स्वभाव आहे. आपण एकमेकांवर, पशुपक्ष्यांवर, झाडाफुलांवर प्रेम करतोच. प्रेमाची भूक माणसाला जन्मापासून अखेरपर्यंत असते. प्रेम नसेल तर अफाट संपत्ती निरर्थक ठरते आणि प्रेम असेल तर गरिबीतही आनंदात जगता येते. प्रेम म्हणजे आनंद, प्रेरणा, जगण्याचा आधार. दुःखातही जगण्याचे बळ देणारी भावना. पण प्रेमाची व्यापकता, विविधता अनुभवण्याची आपली तयारीच नसते. प्रेमाचा विशिष्ट पैलूच अनुभवण्याचा आग्रह असतो. आपल्याला हव्या असलेल्या साच्यातच त्याला बसविण्याचा प्रयत्न करतो. इथेच सर्व गडबड होते. आणि प्रेम निसटून जाते. अहंकार आणि स्वार्थामुळे प्रेमाची ज्योत काळवंडून जाते. प्रेम म्हणजे दुसर्‍यावर वर्चस्व, स्वामित्व गाजवणे नव्हे. वासना आणि आकर्षण म्हणजे प्रेम नव्हे. कथा, कादंबर्‍या, जाहिराती व चित्रपटांनी स्त्री-पुरुष प्रेमाचे इतके स्तोम माजविले आहे, त्याला इतके संकुचित केले आहे की, त्यापलीकडे काही जीवन असते, प्रेम असते याचा विसर पडतो आहे. प्रेम शब्दही बदनाम झाला आहे. आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र, पती, पत्नी, अपत्य, नातेवाईक, समाज, मातृभूमी, विश्‍व, सृष्टी, परमेश्‍वर या सर्वांनी व या सर्वांवर केलेले प्रेम जीवनाला समृद्ध करते. प्रेम तराजूत तोलता येत नाही. भीती, असुरक्षितता, व्यवहार, सत्ता, संपत्ती, पद यापोटी केलेले प्रेम, प्रेम नसते. प्रेम म्हणजे भाबडेपणा, हळवेपणा, दुबळेपणा व आसक्तीही नव्हे. चुका झाल्या म्हणजे प्रेम नसते असे नव्हे. ‘लाख चुका केल्या असतील केली पण प्रीती’ असे होऊ शकते. प्रेम म्हणजे विश्‍वास, जबाबदारी, समजून घेणे. प्रेम म्हणजे गैरसमज होणार नाही या विश्‍वासाने केलेला संवाद. प्रेम म्हणजे दुसर्‍याचा आनंद. जे दुसर्‍याचे नुकसान करते, सूड उगवते ते प्रेम कसे असू शकते? प्रेम बांधून ठेवत नाही, स्वातंत्र्य देते. प्रेम म्हणजे हरवलेल्या दृष्टीचा शोध, स्वतःतील चिरंतन आनंदाचा शोध. प्रेम म्हणजेच अध्यात्म, धर्म, एकात्मता. प्रेम म्हणजेच संघठन. प्रेम कळले नाही तर माणूस प्रेमभिकारी बनतो. मग आयुष्य कायम असमाधानाची भटकंती होते. प्रेम म्हणजे देणे, फुलांसारखे फुलणे. सुगंधाचे वाण वाटणे. तोच त्याचा स्वभाव. देण्याघेण्याचा व्यवहार संपलेला. असा निराशा पळवून लावणारा वसंत मना मनात फुलला तर…
जहॉं दूर नजर दौडाए, आजाद गगन लहराये
जहॉं रंगबिरंगे पंछी, आशा का संदेसा लाये
कहीं बैर ना हो, कोई गैर ना हो, सब मिल के युँ चलते चले|

रवींद्र देशपांडे