कॉंग्रेसचे पानिपत!

0
177

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात जेव्हा जेव्हा पक्षाचा पराभव होतो, तेव्हा तेव्हा कॉंग्रेसमध्ये ‘प्रियंका गांधी लाव कॉंग्रेस बचाव’ची मागणी जोर धरू लागते. यावेळी झालेल्या उत्तरप्रदेश व उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे पूर्णत: पानिपत झाले. त्यामुळे आता पुन्हा एकदा नेतृत्वाच्या मुद्यावर कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वावर गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर सर्वात जास्त कॉमेण्टस् केले जातात. एखाद्या राष्ट्रीय नेत्यावर असे बालिश कॉमेण्टस् का होतात, याचा तरी कॉंग्रेस विचार करणार आहे की नाही? कॉंग्रेसची स्थिती बिकट होण्यासाठी घराणेशाही जबाबदार आहे, हे कळूनदेखील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते चुप्पी साधून आहेत. टायटॅनिक जहाजाप्रमाणे अजस्र असणारा कॉंग्रेस पक्ष बुडायला लागला आहे. अनेक ठिकाणच्या लाजिरवाण्या पराभवानंतरही जर कॉंग्रेस नेते आत्मचिंतन करणार नसतील, तर या टायटॅनिकसारख्या अजस्र पक्षाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत! पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला सर्वाधिक फटका उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडच्या निवडणुकीत बसला आहे. उत्तराखंडमध्ये दारुण पराभव होत कॉंग्रेसला आपली सत्ता गमवावी लागली. उत्तरप्रदेश व उत्तराखंडातील निवडणुकीने कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. भाजपाजवळ आज पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्यासारखे सक्षम नेतृत्व आहे. ज्यांच्या वाणीतून भारतीयांना विश्‍वास दिसून येतो. देशावर प्रेम करणारा, देशासाठी झटणारा नेता मोदींच्या रूपाने दिसून येतो. हा विश्‍वास मात्र गेल्या काही वर्षांत कॉंग्रेसने गमावला आहे. नेतृत्व हे वाघाच्या ताकदीचे हवे. शेळीच्या नेतृत्वाला कुणीच सलाम करीत नाही, हे आता कॉंग्रेसने समजून घेण्याची वेळ आली आहे. पंजाबमधील कॉंग्रेसचा झालेला विजय हा कॅप्टन अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्या परिश्रमामुळे झाला असून, त्यात राहुल गांधींचे कुठलेही श्रेय नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आतातरी कॉंग्रेसने नेतृत्व बदलण्याची योग्य वेळ असल्याचे दबक्या आवाजात का होईना, पण कॉंग्रेसमध्ये बोलले जात आहे, अन्यथा पुढेही कॉंग्रेसचे पानिपत होईल.
मायावतींचा थयथयाट!
उत्तराखंडमधील झालेला बसपाचा पराभव मायावतींच्या चांगलाच जिव्हारी लागला असून, या पराभवाचे खापर त्यांनी ईव्हीएम मशीनवर फोडून आपली जबाबदारी झटकण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला आहे. मायावतींच्या चुकीच्या धोरणामुळे बसपाचा पराभव झाला आणि तो त्यांनी स्वीकारायला हवा, असे चोख प्रत्त्युत्तर देऊन, भाजपाचे वरिष्ठ नेते व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मायावतींना कानपिचक्या दिल्या आहेत. ईव्हीएमच्या घोळामुळेच बसपाचा पराभव झाल्याचा आरोप करीत मायावतींनी भाजपाच्या विजयाला आव्हान दिले. ईव्हीएम मशीनमध्ये टाकलेले प्रत्येक मत हे भाजपा उमेदवारालाच जात होते, असा गंभीर आरोपही मायावतींनी केला. मुस्लिमबहुल भागामधून भाजपाला कशी मते मिळाली, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. एका पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने असा युक्तिवाद करणे म्हणजे खरंच त्यांच्या बुद्धीची कीव करण्यासारखे आहे. उत्तरप्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या नेतृत्वातील सपाचे सरकार होते. ईव्हीएम मशीनमध्ये घोळ केलाच असता, तर सपा सरकारकडूनच झाला असता. मात्र आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडून मायावतींचा थयथयाट सुरू आहे. प्रत्येक चांगल्या कामाला विरोध करायचा. चांगल्या निर्णयाच्या विरोधात भूमिका मांडायच्या आणि आता अपयश आल्यानंतर तोदेखील स्वीकारायचा नाही, अशी वृत्तीच मायावतींच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली आहे. केंद्राने केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे नितीशकुमारसारख्या धोरणी नेत्याने स्वागत केले. केवळ विरोधासाठी विरोध न करता चांगल्या निर्णयाच्या बाजूने नितीशकुमार उभे राहिले. आपला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे आज देशात नितीशकुमारांची प्रतिमा उजळली आहे. या तुलनेत मायावतींनी सुरुवातीपासूनच नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध दर्शविला. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या विरोधात केंद्राने घेतलेल्या निर्णयाला ज्या पद्धतीने मायावतींनी विरोध केला, त्यामुळे काळ्या व्यवहाराला मायावतींचा पाठिंबा असल्याचे लोकांच्या लक्षात आले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेक नेत्यांचा काळा पैसा मातीमोल झाला. त्यामुळे निवडणुकीच्या काळात वापरला जाणारा काळा पैसा यावेळी कामी आला नाही आणि पैशाच्या बळावर राजकारण करणार्‍यांना चांगलीच चपराक बसली. मायावती या नोटाबंदीच्या निर्णयानंतरच अडचणीत आल्या. यावेळच्या निवडणुकीत पैशाचा फारसा वापर विरोधकांना करता न आल्याने भाजपाचे उमेदवार विजयी झाले आणि विरोधकांना पराभवाचा चेहरा बघावा लागला.
नंदकिशोर काथवटे ९४२३१०१९३८