संत तुकारामांचा जीवनमूल्यविचार

0
199

महाराष्ट्र ही संतांच्या आध्यात्मिक कार्याने पावन झालेली भूमी म्हणून ओळखली जाते. संतांनी लोकोद्धाराच्या कार्याद्वारे भक्तीची महती पटवून दिली. काळासोबत अनेक संप्रदाय या भूमीत निर्माण झाले. सर्व संतांचे एकच ध्येय होते, ते म्हणजे लोककल्याण! आपल्या अभंगवाणीतून त्यांनी प्रबोधन, उपदेशाद्वारा समाजमनावरील सात्त्विक प्रभाव आजतागायत कायम ठेवला आहे. भारतीय संस्कृतीमधील धर्म, पंथ, जाती, भाषा यांतील विविधतेतील एकता आपल्याला संतसाहित्यामध्ये ठळकपणे दिसते. ज्ञानेश्‍वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांनी एक प्रकारची आध्यात्मिक लोकशाहीच मध्ययुगीन काळात निर्माण केली होती. लोकप्रबोधन हाच आपल्या जीवनकार्याचा हेतू त्यांनी स्पष्ट केलेला दिसतो.
आम्ही वैकुंठवासी| आलो याचि कारणासी|
बोलिले जे ऋषी| साच भावे वर्ताया
त्याद्वारा त्यांनी लोकप्रबोधन करून समाजमनाला योग्य संस्कार, ज्ञान व जीवनमूल्ये दिली; जी मानवसमाजाला जीवन जगताना बहुपयोगी व योग्य दिशादर्शक आहेत. याच परंपरेतील संत तुकाराम हे एक क्रान्तदर्शी लोकशिक्षक आहेत, असे दिसून येते. संत तुकारामांच्या अभंगवाङ्‌मयाचे सखोल परिशीलन केल्यास असे आढळून येते की, जीवनमूल्ये तुकोबांच्या अभंगवाङ्‌मयाचा आत्मगाभा आहेत. जगातील सर्व दुःखांची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती केवळ जीवनमूल्ये आचरणामुळेच होऊ शकते, हा त्यांचा त्रिकालाबाधित सिद्धांत त्यामधून त्यांनी मांडला आहे. हा त्यांचा आत्मप्रत्यय असल्याचे ते सांगतात-
तुका म्हणे चाखुनी सांगे| मज अनुभव आहे अंगे
बीजशब्द- जीवनमूल्ये, अनुभव, कसोटी, लोकशिक्षण,आत्मप्रत्यय, प्रबोधन, समाजमन.
संत तुकाराम केवळ ग्रंथप्रामाण्यवादी नव्हते, तर प्रतीतप्रामाण्यवादी होते. हे त्यांच्या साक्षात्काररूपी आनंदमयी आत्मानुभूतीच्या वचनांद्वारे स्पष्ट होते. जीवनमूल्यांच्या आचरणावर आधारित साक्षात्काराचा आनंद त्यांनी असा व्यक्त केला आहे-
तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू| नका चरफडू घ्यारे तुम्ही
तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे| परि नाही कोणाचे उणे पुरे
साक्षात्काराच्या अत्युच्च आनंदाचा लाभ सर्वांना व्हावा, मानवी जीवन कृतार्थ, धन्य व्हावे यासाठीच संत तुकारामांचा सर्व अट्‌टहास होता. जीवनमूल्य आचरणाव्यतिरिक्त अन्य कोणत्याच उपायांनी जीवनातील संपूर्ण दुःखाचा नाश आणि अत्युच्च सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही, असे त्यांनी अत्यंत कळकळीने स्वानुभवपूर्वक सांगितले. कारण तुकारामांना दुःखात बुडालेले लोक पाहवत नाहीत.
बुडता हे जन न देखवे डोळा|
येतो कळवळा म्हणवूनिया
त्यांचा अवतार हा केवळ जगाच्या कल्याणासाठीच होता. लोकहिताचा कळवळा त्यांच्या वृत्तीमध्येच होता. संत तुकारामांनी जगाच्या कल्याणासाठी चंदनाप्रमाणे देह झिजविला. धर्माचे रक्षण हे त्यांच्या अवताराचे प्रयोजन त्यांच्या विविध वचनांद्वारे स्पष्ट होते-
धर्म रक्षावयासाठी| करणे आटी आम्हांसि
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती| देह कष्टविती परउपकारे
आपल्या अमृतवचनाद्वारे त्यांनी जगाला जीवनमूल्यांचा उपदेश केला. ईश्‍वरप्राप्तीसाठी केवळ चित्त शुद्धीची आवश्यकता आहे, असे ते सांगतात-
तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ| येवोनि गोपाळ राहे तेथे
ईश्‍वरप्राप्तीसाठी घरदार सोडून वनात जाण्याची आवश्यकता नाही. उलट ईश्‍वर घरी येण्याचा सोपा भक्तिमार्ग त्यांनी जगाला दाखवला.
योग्य जीवनमूल्यांचे आचरण केल्यानंतरच सर्व जीवनमूल्यांची अत्युच्च अवस्था असलेला आत्मसाक्षात्कार माणसाला प्राप्त होऊ शकतो. त्यासाठी संत तुकारामांसह सर्वच संतांनी साक्षात्काराचा उपरोक्त वर्णन केलेला एवढा सोपा मार्ग दाखवला; परंतु किती लोक साक्षात्काराप्रत पोहोचतात? तर मनुष्याणाम सहस्रेषु!
ज्ञानेश्‍वर सांगतात-
तैसे अध्यात्मशास्त्री इये| अंतरंगचि अधिकारिये
परि लोकु वाक्चातुर्ये| होईल सुखिया
समाजात आत्मसाक्षात्कारीविषयी अनेक गैरसमज आहेत. अंधश्रद्धेपायी लोक कुणालाही साक्षात्कारी पुरुष समजतात. काही लोक स्वतःच्या पोटासाठी, कीर्तीसाठी अशा अनेक गोष्टी करतात. अंधश्रद्धा आणि चमत्काराबद्दल त्यांनी जनमानसात प्रबोधन केले. अनेक चमत्कारांना लोक बळी पडतात व ते करून दाखवणार्‍या भोंदूलाच साक्षात्कारी समजतात. म्हणून लोकांना यथार्थ मार्गदर्शनाद्वारे प्रबोधनाची तीव्र गरज असते. परमेश्‍वर कुठेतरी दूर आहे. तो जप, तप केल्याने मनुष्यासमोर प्रकट होतो, त्यासाठी घराचा त्याग करून संन्यास घ्यावा लागतो. अशा भ्रामक कल्पना लोकांच्या डोक्यात घर करून बसलेल्या असतात. त्यामुळे लोकांना खरा साक्षात्कार होऊ शकत नाही. आत्मा, ब्रह्म, साक्षात्कार या संकल्पना अधिकाधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न संतांनी केला आहे. संपूर्ण विश्‍वाच्या मुळाशी असलेली चैतन्यशक्ती कधीही नाश न पावणारी आहे. ती काल होती, आज आणि उद्याही राहणार आहे. त्या चैतन्यशक्तीलाच माणसाने आत्मा हे नाव दिले. त्यापूर्वीही तो होताच. शरीराच्या आत म्हणून आत्मा आणि चराचराला व्यापून असल्याने त्यालाच ब्रह्म असे म्हणतात.
विज्ञानयुगाने मानवाला असंख्य भौतिक सुखांची सेवा त्याच्या दारात हात जोडून उभी करून दिली आहे; परंतु दिवसेंदिवस सुखलालसेमुळे मानवी जीवनाचा आधार असलेली जी मौलिक जीवनमूल्ये आहेत, त्यांच्याकडे पाठ फिरवली गेली. नैतिक मूल्यांचा हा र्‍हास मानवाच्या विनाशाला कारणीभूत ठरत आहे. शांतीचे, समाधानाचे जीवन जगण्यासाठी पैशासोबतच सद्विचार, सत्संगत व सत्कर्माची आवश्यकता आहे. आज त्यांचा सर्वांना विसर पडलेला दिसतो. त्यामुळेच समाजात, राष्ट्राराष्ट्रांत जीवघेणी स्पर्धा, भ्रष्टाचार, अराजकता पसरलेली आहे. त्याला थांबविण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीचा मूलाधार असलेली मूल्यसंकल्पना संत तुकारामांच्या अभंगवाङ्‌मयातील जीवनमूल्यांच्या रूपाने अभ्यासण्याचा प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवा. त्यामुळे संत तुकारामांनी सांगितलेल्या जीवनमूल्यांची आपणास नव्याने ओळख होईल व त्यांच्या अनुकरणाने आपले जीवन खर्‍या अर्थाने समाधानी, शांततामय व परिपूर्ण होईल. जीवनमूल्यांच्या या मार्गाने संत तुकारामांनी आत्मसाक्षात्काराने आपले जीवन सार्थक केले व लोकांच्या कल्याणाकरिता वाङ्‌मयाच्या रूपाने ती जतन करून ठेवलेली आहेत, त्याचा उलगडा होण्याची वेळ आज आलेली आहे. समाजाला त्याची आज निकडीची गरज आहे. त्यांची मूल्ये समाजाला दिशा दाखविण्यासाठी दिशादर्शक दीपस्तंभ म्हणून आवश्यक आहेत. विज्ञानयुगात जीवनमूल्यांचा विसर पडल्यानेच ही अस्थिरतेची भयावह स्थिती निर्माण झाली आहे.
संत तुकारामांच्या काळात झालेल्या नीतिमूल्यांचा र्‍हास तुकारामांच्या अभंगवाणीने भरून निघाला. आधुनिक विज्ञानाच्या काळात झालेली नीतिमूल्यांची हानी भरून काढण्यासाठी संत तुकारामांच्या वाङ्‌मयाशिवाय पर्याय नाही. संत तुकारामांनी हा जीवनमूल्यांचा मौलिक ठेवा आपल्या अभंगवाङ्‌मयात चारशे वर्षांपासून जतन करून ठेवला आहे. त्याची समाजाला, या तरुण पिढीला नव्याने ओळख करून देण्याची गरज आहे. मानवी जीवनाच्या निरामय कल्याणासाठी त्याचा उपयोग होईल.
अवघ्या विश्‍वाचे कल्याण साधण्याचे सामर्थ्य संत तुकारामांच्या विचारामध्ये आहे. तशी प्रतिज्ञाच त्यांनी केलेली दिसते. अशा या चिरंतन जीवनमूल्यांचा अभ्यास होणे, ही आजच्या काळाची गरज झाली आहे.
प्रा. डॉ. हरिदास दे. आखरे,७५८८५६६४००