कन्याभ्रूणहत्या : गंभीर सामाजिक समस्या

0
137

समाजचिंतन

‘स्त्री’ ही भाग्यविधात्याने सुखी, समृद्ध, समाधानी सहजीवन जगण्यासाठी, संगोपन, संवर्धनासाठी अन् समाज पुनर्निर्मितीसाठी मानवजातीला दिलेले अनमोल, अद्भुत वरदान आहे, हे आम्हाला अद्यापही कळलेले नाही, असे दिसते.
परळी, बीड, नाशिक येथील कन्याभ्रूणहत्येच्या संवेदना स्मरणात रेंगाळत असतानाच, सांगली जिल्ह्यातील म्हैसाळा येथे उघडकीस आलेल्या १९ भ्रूणहत्या क्रौर्याने कळसच केला. कन्येची गर्भातच निर्घृण हत्या करणार्‍या या विकृत मानसिकतेमुळे समाजमन हेलावून निघाले आहे. कन्याभ्रूणहत्या ही माणुसकी, मानवतेला कलंकित करणारी, पुरुषप्रधान समाजाला लागलेली असाध्य अशी कीड आहे. असले घृणास्पद प्रकार म्हणजे स्त्री-जातीविषयीच्या अनादराचे, गैरसमजाचे द्योतक आहे.
कन्या हे परकीय धन. तिचं लालनपालन म्हणजे एक नैतिक, सामाजिक व आर्थिक आव्हान, कन्या ही विषाची पुडी, असा प्रवाद पूर्वापार चालत आलेला आहे. विवाहाचा न झेपणारा अवाढव्य खर्च आणि जावई या दशमोग्रहाच्या धास्तीने, कन्या नसावी, अशी सर्वसामान्य समाजधारणा दिवसेंदिवस बळावत आहे. वंशाचा दिवा पुत्र (मग तो भविष्यात करंटा निघाला तरी चालेल) जन्माचे सहर्ष स्वागत, आनंदोत्सव, तर कन्याप्राप्तीने उदासीनता, सुतकी चेहरा, मनाची खिन्नता हा नित्याचा अनुभव सर्व कुटुंबात बघायला मिळतो.
‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी’ असा तिचा लौकिक आहे. दैविक सामर्थ्य आहे. विविध अंगांनी अन् अनेकविध स्वरूपात, भूमिकेत पुरुषी जीवनाला फुलविणार्‍या, विकसित, समृद्ध करणार्‍या सम्राज्ञीला उमलण्यापूर्वीच गर्भात खुडून टाकावी, यासारखी अमानुषता, कृतघ्नता दुसरी ती कोणती! आजच्या प्रगत विज्ञानयुगात पुरुषाबरोबर खांद्याला खांदा लावून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैज्ञानिक, आर्थिक क्षेत्रात सक्षम जबाबदारी पेलण्यात स्त्रिया अग्रेसर आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या नेत्रदीपक कर्तृत्वाच्या, यशाच्या पाऊलखुणा, ठसे उमटविले आहेत.
आजच्या विकसित विज्ञानयुगात गर्भलिंग निदानावरच स्त्री-गर्भाला गर्भावस्थेतच संपविण्याचा प्रघात भारतीय संस्कृती संस्कारात न बसण्यासारखा आहे. वैद्यकीय समाजाइतपतच स्त्री समाजदेखील या घृणास्पद, अमानुष कृत्याला तितकाच जबाबदार आहे. स्त्रीच्या सहमती, सहयोगाशिवाय डॉक्टर कधीही गर्भपात करू शकणार नाही. स्त्रीची गर्भपाताला अनुमती म्हणजे स्वत: स्त्रीच स्त्री जातीची खर्‍या अर्थाने वैरीण आहे. निष्पाप जिवाला, स्वकर्माच्या फळाला स्वतःच्या उदरातच संपविण्याचं क्रूर कर्म स्त्री-जातीला कलंकित करणारे आहे.
भारतीय संस्कृतीत ‘यत्र नार्यस्ते पूजन्ते रमन्ते तत्र देेवताः|’ असा तिचा गौरव आहे. याच मंगल संस्कृतीत स्त्री व तिला लाभलेले मातृत्व कलंकित होत आहे. सुसंस्कृत भारतीय समाजाला अधोगतीला घेऊन जाणारे किळसवाणे कन्याभ्रूण हत्याकांड थांबवायलाच हवं.
साक्षरता आणि सबलीकरणाचे अपेक्षित वातावरण निर्माण होत असतानाच, कन्याभ्रूणहत्येचे प्रकार सर्वत्र अन् सर्व स्तरावर व्यापक प्रमाणात चोरून होत आहेत. यातून समाजाची मागासलेली मानसिकताच दृग्गोचर होत आहे, हा चिंतेचा, चिंतनाचा अन् सक्रिय कृतीचा विषय झाला आहे. मानवी अस्तित्वाला आव्हान देणार्‍या या घटनांवर कायदा-कानून अथवा प्रशासकीय यंत्रणा कितपत प्रतिबंध घालू शकेल, हा वादग्रस्त प्रश्‍न आहे. समाज मानसिकता बदलणे, हाच यावरील एकमेव उपाय आहे. स्त्रियांनी आणि सामाजिक संघटनांनी कन्याभू्रणहत्येच्या विरोधात सक्रिय चळवळ उभी करून या विकृत मानसिकतेतून स्त्री जातीला वाचविण्याचे खडतर आव्हान स्वीकारायला हवे. स्त्री-पुरुषांचे नैतिक संतुलन-समन्वय न जोपासल्यास पुरुषप्रधान समाजात ‘स्त्री’ असुरक्षित होऊन तिच्यावर अत्याचार व व्यभिचार व्यापक प्रमाणात होण्याची शक्यता बळावेल.
दिगंबर शं. पांडे,९४०३३४३२३९