बी पॅशनेट… गो क्रेझी

0
101

अजूनही आठवतो तो दिवस… बी. कॉम. द्वितीय वर्ष होते ते… कसल्यातरी निमित्ताने २-३ दिवस लागून सुट्ट्या आल्या होत्या. एका संस्थेने एका मोटिव्हेटरचे भाषण ठेवले होते. गेलो ऐकायला मित्रांसोबत… बर्‍यापैकी गर्दी होती ऐकणार्‍यांची. साऊंड सिस्टिम आतासारखी अद्ययावत नव्हती, त्यामुळे फारसे काही ऐकायला येत नव्हते. पण, त्या भाषणातले चार शब्द चांगले ऐकू आले आणि उत्सुकता जागवून गेले. आगापिछा काही ऐकायला आला नाही, आठवण्याचा प्रश्‍नच येत नाही. ते शब्द होते- ‘गो क्रेझी… बी पॅशनेट.’ कार्यक्रम संपला व घरी आलो. रात गई बात गई झाले. पण, जेव्हा पदवी शिक्षण झाले आणि कायद्याचा अभ्यास करण्याचे निश्‍चित झाले तेव्हा कोण जाणे, ते चार जादूई शब्द अचानकच आठवले… बॉस, त्यावर जेव्हा गंभीरतेने विचार करायला लागलो, तो दिवस आणि आजचा दिवस… त्या विचारशृंखलेने पूर्ण माईंडसेट बदलवून टाकला. विचारांची दिशा आणि दृष्टिकोन पार बदलून गेला. कोणच्याही गोष्टीला वेगळ्या अँगलने बघण्याची नवी दिशा मिळाली.
मित्रांनो, प्रत्येकालाच आपल्या आवडीची गोष्ट प्राप्त होतेच असे नाही, पण जे प्राप्त झाले त्याचे सोने तर करता येते ना! मध्यंतरी टी. व्ही.वर कुठल्याशा वाहिनीवरील एका कार्यक्रमात, मराठीमधील प्रसिद्ध संगीतकाराची मुलाखत चालू होती. त्यांनी एक आठवण सांगितली. मुंबईला लोकलच्या एका स्थानकावरील पुलावरून जात असताना एक भिक्षुक (अंध होता बहुतेक), कुणी त्याच्या ताटलीत नाणे टाकले की, एका विशिष्ट लकबीने एका ओळीला आळवायचा. ती ओळ, ते सूर या संगीतकार महोदयांना आत्मसात करावी असे वाटले. म्हणूनते सूर मनात पक्के रुजेपर्यंत त्या भिक्षुकाच्या ताटतील नाणे टाकत तिथेच बसून होते. दीस इज दी पॅशन.
माणसाने आपल्या ध्येयाप्रती प्रचंड पॅशेनेट असायला हवे. पॅशन म्हणजे तीव्र भावना आणि एखाद्या कामाविषयीची हीच तीव्र भावना प्रचंड इच्छाशक्ती वाढवून जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, कठोर परिश्रम कधीच थकवा आणत नाहीत, ते आणतात फक्त समाधान. तीव्र भावना किंवा पॅशनच काहीतरी अलौकिक घडवते. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवायलाच हवे की, एखादे अलौकिक कार्य स्वत:ला त्यात पूर्ण झोकून दिल्याशिवाय पूर्ण होतच नसते. काही वेळा तर २४७ जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी फक्त त्याच गोष्टींचा विचार व्हायला लागतो. मग शब्दप्रयोग सुरू होतो- ‘‘आजकाली हा/ही या नवीन कामाच्या मागे वेड्यासारखी लागली आहे.’’ हो, पण सावधान! वेड्यासारखे मागे लागणे ठीक, पण त्या पॅशनच्या पोटी आपल्या हातून काही ‘वेडेपणा’, काही चूक तर होणार नाही, याची खबरदारी घ्यायलाच हवी.
जोपर्यंत आपण आपल्या आवडीला, ती योग्य की अयोग्य हे तपासून बघितल्यावर खात्री केल्यावर आपण आपले ध्येय बनवीत नाही, तोपर्यंत आपण त्यावर संपूर्णपणे लक्ष केंद्रित करूच शकणार नाही. आपल्या सूर्यनमस्काराच्या आधी म्हटल्या जाणार्‍या श्‍लोकाला आठवा-
‘ॐ ध्येय सदा सवित्र मंडल मध्यवर्ति,
नारायण सरसिजा सनसन्निविष्ट:…’
यात सूर्यनमस्कार घालायच्या आधी काय प्राथमिकता असावी हे सांगितले आहे. आपण लहानपणापासून आजूबाजूचे निरीक्षण करून बर्‍याच गोष्टी आत्मसात करत असतो. त्यातल्या काही गोष्टी, काही घटना कायम लक्षात राहतात. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे हिरो वर्शिप. मोठेपणी तुला काय व्हायचे आहे? हा एक कॉमन प्रश्‍न आणि त्याला नेहमीच मिळालेली अनकॉमन उत्तरे. पण जर बघितले, तर ५/७ टक्के मुले/मुली असे असतात की, त्यांनी लहानपणी जे ध्येय ठरविले ते त्यांनी पूर्ण केले. मग त्यात भारतीय सेनेमध्ये जाणे, डॉक्टर/प्राध्यापक होणे, कारखानदार होणे, आर्किटेक्ट होणे इत्यादी. ते त्यांना हवे ते पूर्ण का करू शकले? याचे प्रमुख उत्तर आहे- त्यांची त्याकरताची पॅशन! ती तीव्र भावनाच हवे ते मिळवून देण्यात मदत करते. ती पॅशनच माझे ईप्सित साध्य कसे होईल, हा विचार करता करता ते साध्य करण्याचे मार्ग आणि संसाधने सुचवते.
जी व्यक्ती खरोखरच पॅशनेट असते आणि त्यावर प्रचंड ठाम असते, ती आपल्या ध्येयाची फारशी चर्चा करत नाही. कारण, अशा व्यक्ती या रिझल्ट ओरिएंटेड असतात. काय करणार हे बोलण्यापेक्षा केल्यावर दिसेलच ना! ही वृत्ती ठेवणारे असतात.
पण मित्रांनो, पॅशन म्हणजे वेडाचार नव्हे. ती गोष्ट माझी पॅशन आहे, या नावाखाली स्वैर किंवा अनाकलनीय वर्तन हे अपेक्षितच नाही. पॅशन पूर्ण करण्याच्या नावाखाली आयुष्यातली दैनंदिन जीवनातली कर्तव्ये विसरता येत नाहीत. कसे आहे मित्रांनो, आज आपल्या ध्येयाला पूर्ण करताना जो प्रयत्न आपल्याला संघर्ष वाटतो तोच आपली पुढे चालून ताकद बनतो. आजचा काळ हा डोळसपणे पॅशन पूर्ण करण्याचा आहे. आपण आपल्या प्रयत्नांचे जितके इनपूट देऊ तेवढ्याच प्रमाणात आऊटपूट मिळते आजकालच्या काळात आणि हाच चांगला फरक आला आहे इतक्यात. आपण आपल्या यशाचे स्वप्न बघत बसण्यापेक्षा त्यांना पूर्ण करण्याचे प्रयत्न करायला हवे.
पण बॉस, एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम एकाने मध्यंतरी बोलून दाखविला. त्याच्यावर जळणारे जाणीवपूर्वक त्याच्या प्रयत्नांमध्ये व्यत्यय आणतात आणि ते सॉर्टआऊट करण्यातच त्याचा बराचसा वेळ जातो. अशा वेळेस दोन प्रकारांनी आपण यातून बाहेर पडू शकतो. एक म्हणजे अशा लोकांपासून जाणविपूर्वक दूर राहायचे आणि ते शक्य नसेल तर तेवढ्यापुरतेच राहायचे. दुसरे म्हणजे सपशेल दुर्लक्ष करायचे. कारण असे लोक आपण दुर्लक्षिले जातो आहे, या भावनेनेच प्रचंड अस्वस्थ होतात, निराश होतात.
आपली आवड, आपले पॅशन पूर्ण करताना सातत्य आणि आपल्या प्रयत्नांवर विश्‍वास ठेवा. कारण आपण ‘आपले’ स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय बाळगून असतो. प्रॉब्लेम असा आहे बॉस, आजच्या तरुणाईला त्यांच्या स्वत:च्या क्षमतेचा आणि ताकदीचा योग्य अंदाज आणि आकलन नाहीये.
पॅशन पूर्ण करताना देहभान विसरावे लागते, या म्हणण्याशी मी पूर्णत: सहमत नाही. कारण, जो देहभान विसरून काम करतो त्याच्याकडून सजगतेची अपेक्षाच करता येत नाही आणि जो सजग नसतो त्याच्याकडून चूक तर होणारच; आणि चुका झाल्या तर आपली पॅशन पूर्ण होईल का खरंच? माझे तर आजच्या तरुणाईला हेच सांगणे आहे की, तुम्ही समजता त्यापेक्षा जास्त शूर आणि क्षमतावान आहात, तुम्ही दाखवता त्यापेक्षा तल्लखता आहे तुमच्यात. फक्त योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने वापरणे आले पाहिजे. आपल्या ध्येयवेडेपणामधे कोण कसा आणि केव्हा उपयोगी पडेल, हे सांगताच येत नाही. म्हणून संबंधामध्ये- मग तो क्षणिक का असेना- कटुता येऊच देऊ नका. मित्रांनो, हेच सर्व लोक टाळ्या वाजवायला हजर असतात जेव्हा आपण आपले पॅशन पूर्ण करतो. पॅशेनेट असताना तुलना (कम्पॅरिझन) करण्यापासून स्वत:ला दूर ठेवावे लागते. कारण, तुलना आपल्याला निगेटिव्ह करू शकते. जेव्हा आपल्या क्षमतेचा कस लावायची पाळी येते आणि आपण आपल्या पूर्ण क्षमतेनिशी भिडून जातो, तेव्हाच आपल्याला कळते की, आपण आपल्या क्षमतेला अंडरएस्टिमेट करत होतो.
अजून एक फॅक्टर आपल्या पॅशनच्या- आपल्या ध्येयाच्या आड येतो, तो म्हणजे आपले मॉरल कमी करण्याचा प्रयत्न करणारे, आपले धैर्य खचवण्याचा प्रयत्न करणारे लोक. अशांना गरज पडली तरच जाणीव करून द्यावी लागते की, तुम्हाला त्यांच्या बोलण्याने काहीही फरक पडत नाही, पण हे तुमच्या शब्दांपेक्षा कृती जास्त योग्य ठरते. कठोपनिषद/कथा उपनिषद १,३, १४ च्या प्रकरणात दिलेला श्‍लोक जिथे यम हा नचिकेताला सांगतो आणि तोच श्‍लोक स्वामी विवेकानंदांच्या मुखीपण होता. तो म्हणजे ‘ऊठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत लक्ष्यप्राप्ती होत नाही.’ संस्कृत श्‍लोक- ‘उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोद्यत, क्षुरासन्न धारा निशिता दुरत्यदुर्गम पथ: तत् कवयो वदन्ति|’
हेच तत्त्व बाणवण्याचे आवाहन स्वामी विवेकानंदांनी तरुणाईला केलेले आहे. म्हणजेच काय, सजग राहून आपल्या ध्येयाप्रती क्रेझी होण्याने आणि पॅशनेट राहण्यानेच ध्येयप्राप्ती होऊ शकेल.
सो माय डिअर फ्रेंडस्, गो पॅशेनेट, गो क्रेझी… पण, कुठेही, कुणालाही न दुखावता, कुणाचाही अपमान न करता आणि आपल्या संस्कारित मर्यादांचे पूर्ण पालन करत…
– ऍड. सचिन नारळे/९४२३१०४००३