आत्मविश्‍वास

0
68

आत्मविश्‍वास म्हणजे यशस्वितेची पहिली पायरी होय. ज्या व्यक्तीचा आत्मविश्‍वास कमी असेल ती अशक्त बनते आणि पायरी चढण्याची तागद एकवटू शकत नाही.
आत्मविश्‍वास वाढवण्यासाठी अंतर्मनाला काही गोष्टींनी परिपूर्ण असे वळण लावावे लागेल. सर्वप्रथम भूतकाळ व भविष्यकाळाचा विचार सोडून वर्तमानात जगावे लागेल. आपण आता काय करताय आणि काय करायचे आहे यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. आत्मविश्‍वास जरी यश मिळाल्याने वाढत असला तरी, प्रथम आपल्यात असणार्‍या क्षमतांना ओळखून कमतरता भरून काढावी लागेल. पाया मजबूत करावा लागेल आणि मग त्याचा विस्तार.
आत्मविश्‍वास माणसाच्या मनातून निर्माण होतो. तो बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतो. ज्या व्यक्तीला स्वत:च्या क्षमता आणि अवगुणांची माहिती असेल तीच व्यक्ती आत्मविश्‍वासाने स्वत:त सुधारणा करू शकते. आपण किती पाण्यात आहोत, हे माहीत असणे आवश्यक आहे. तेव्हाच योग्य ध्येय ठरवता येईल. खूपदा चुकीच्या रस्त्याने आपण जात असतो. सगळेच त्या रस्त्याने ध्येय गाठताहेत म्हणून आपणही त्या रस्त्याने जातो आणि पुढे एकही पाऊल टाकण्याची इच्छा होत नाही. मग रेटत रेटत मार्गक्रमण करावे लागते. असे होऊ नये म्हणून आपल्या क्षमता ओळखून ध्येय ठरवायला हवे.
आत्मविश्‍वास हा व्यक्तिमत्त्वाचा कणा आहे. जगातील सर्व महान स्त्री-पुरुषांकडे पाहिले तर लक्षात येतं की, त्यांच्यात अमर्याद आत्मविश्‍वास होता म्हणून ते महान झालेत. जगाने त्यांना नावे ठेवलीत तरी त्यांच्यावर परिणाम झाल्याचे दिसत नाही. त्यांना स्वत:चे सामर्थ्य व क्षमतांची पुरेपूर जाणीव आहे. आपण वेळ नाही ही सबब देऊ शकत नाही. कारण जगातल्या सगळ्या थोर व्यक्तींजवळही आपल्या इतकाच चोवीस तासांचा वेळ होता. त्यांनीही असाध्याचे साध्य एवढ्याच वेळेत केले आहे.
काही व्यक्तींमध्ये हा स्वत:वरचा विश्‍वास लहान वयात दिसून येतो. जसे स्वरा माझी विद्यार्थिनी. तिने इंग्रजीचा खूप अभ्यास केला. मला म्हणायची, ‘‘मॅडम बारावीत मला इंग्रजीत ८५ टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळवायचे इच्छा आहेत.’’ ती ऑफ पिरेडमध्ये माझ्याजवळून आपल्या शंका दूर करायची. आपलं काय चुकतंय हे लक्षपूर्वक ऐकायची. तिच्या सोबतच तिची मैत्रीण रिधिमा पण असायची, पण ती नेहमी स्टाफरूमच्या बाहेरच असायची. दोघींचा एकच अभ्यास असला तरी रिधिमाला कधी वाटलं नाही की, आपणही मॅडम काय सांगताहेत ते ऐकावं. दोघींचा निकाल ऐकून आश्‍चर्य वाटलं. इंग्रजीत रिधिमाला स्वरापेक्षा पाच गुण जास्त मिळाले. जेव्हा स्वरा मला धन्यवाद द्यायला आली तेव्हा रिधिमा माझ्यासमोरच स्वराला म्हणाली, ‘‘बघ, तू मॅडमला सारखं विचारून त्रास दिलास, खूप अभ्यास केलास. मी काहीच जास्त अभ्यास केला नाही तरी मला तुझ्यापेक्षा जास्त गुण मिळाले.’’ यावर स्वराचं उत्तर ऐकून मी अवाक् झाले. ‘‘रिधिमा तू हुशार आहेस. तुला खूप अभ्यास न करताही जास्त गुण मिळाले, पण माझे तसे नाही ग! मी अभ्यास केला नसता तर एवढे गुण मला मिळाले नसते. मला तर अभ्यास करणे भाग होते.’’
स्वरासारख्या विद्यार्थ्यांचा मला फार अभिमान वाटतो. तिला स्वत:च्या कार्यावर पूर्ण विश्‍वास होता. दुसर्‍यांशी तुलना न करता स्वत:च्या उणिवा जाणून त्या भरून काढणारे विद्यार्थी दुर्मिळच! जो आत्मसन्मानाने जगतो, स्वत:च्या क्षमतेला जाणतो तो कोणतेही कार्य सिद्धीस नेऊ शकतो. शिवाय तुलना केल्याने उगाच आत्मविश्‍वास कमी होतो. एक जीव कधी दुसर्‍यासारखा नसतो. एक पान कधी दुसर्‍या पानासारखे नसते. अगदी जुळी भावंडंही असतील तरी बोटांचे ठसे सारखे नसतात. गुलाबाच्या फुलाने जर मोगर्‍याच्या फुलाशी तुलना केली तर! तुलना होईल का? दोघांचेही सौंदर्य, गुण आणि सुगंध यात निराळी अनुभती येते. दोघेही युनिक आहेत.
आत्मविश्‍वास अशी कुर्‍हाड आहे जी संकटांना फोडून काढते आणि दूर पळवते. नवीन व्यवसाय सुरू करताना एक प्रकारचा धोका असतो. व्यवसायाचा अनुभव नसतो. स्पर्धा असते, परंतु आत्मविश्‍वासाने तो अडचणींवर मात करत पुढे जातो. आत्मविश्‍वास नसणारी व्यक्ती जोखीम पत्करायला घाबरते. जे चालले आहे ते बरे, असे समजून प्रगती करत नाही. असे लोक प्रगती करणार्‍यांच्या मार्गात अडथळे निर्माण करताना दिसतात. सतत दुसर्‍याची प्रगती पाहून अस्वस्थ होण्यातच आयुष्य घालवतात.
तुम्ही कोण आहात यापेक्षा तुम्ही स्वत:ला कोण समजता, हे महत्त्वाचे आहे. तुमच्यात अमर्याद सामर्थ्य लपले आहे. जसे एखादे सिंहाचे पिल्लू वाट चुकून मेंढरांच्या कळपात जाते आणि त्यांच्या सारखंच वागू लागतं. त्याने कधीही गर्जना केली नाही. एक दिवस सिंहाला आपले पिल्लू दिसले तर ते घाबरून पळू लागले. मेंढरांसोबत ते हेच शिकले होते. सिंहाने त्याला जबरदस्ती ओढून पाण्याजवळ नेले. आपले प्रतिबिंब पाहून त्याला कळले की, आपण खरोखरच सिंह आहो. आपल्याला घाबरायची, पळायची काहीच गरज नाही. त्याचा आत्मविश्‍वास जागृत झाला आणि त्याने जोराने गर्जना केली. अनेक लोकांचे हे असे सिंहाच्या पिल्लासारखे असते. स्वत:च्या सामर्थ्याची त्यांना कल्पनाच नसते. त्यामुळे आत्मविश्‍वास मंदावतो. या झोपलेल्या आत्मविश्‍वासाला जागे करावे लागेल. हाच तुम्हाला उच्च शिखरावर घेऊन जाईल.
आत्मविश्‍वास आणि मेहनतीच्या जोरावर आपण आपले भाग्य स्वत: लिहू शकतो, अन्यथा परिस्थितीच्या हाती भाग्य लिहिण्याची वेळ येत असते. सावधान…
– डॉ. सुरुची डबीर
८८८८८०६२७१