अभियांत्रिकीची वाट चोखाळताना…

0
55

अभियांत्रिकी ज्ञानशाखेत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम जाणून घ्यावे की, अभियांत्रिकी म्हणजे काय? सोप्या सरळ शब्दात असे की, अभियांत्रिकी असा अभ्यासक्रम आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत विज्ञानाचे (फंडामेंटल सायंस किंवा बेसिक सायंस) अनुप्रयोग (ऍप्लिकेशन्स) करायचे असतात. जे शिकले ते करून दाखवणे. सोबतच त्याचे अर्थकारण आणि विक्रीसाठीच्या आवश्यक स्किल्स विकसित होणे आवश्यक असते.
करीयरमध्ये आपण तीन गोष्टी प्रामुख्याने बघतो. अर्थ (पैसा), कामातून मिळणारे समाधान आणि पुढील संधी अर्थात स्कोप. अभियांत्रिकी क्षेत्रात संधी नाही, अशी ओरड सध्या सुरू आहे. मात्र, विश्‍वास ठेवा की, सध्या अभियांत्रिकी क्षेत्रात अन्य ज्ञानशाखांच्या तुलनेत सर्वाधिक स्कोप अर्थात संधी आहे. मोठ्या संख्येत अभियंते हवे आहेत.
अडलं कुठे…
एवढी संधी असताना देखील अभियंत्यांना योग्य नोकरी मिळत नाही, मग अडले कुठे? त्यासाठी आपल्या प्रदेशाची अर्थातच स्थानिक गोष्टींची मीमांसा करावी लागेल. २००५ नंतर अथवा ढोबळ मानाने सांगायचे तर २००८ सालापासून विदर्भ आणि महाराष्ट्रभर मोठ्या संख्येत अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू झालीत. मात्र, ही गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करण्यास असमर्थ ठरली. त्यावेळी अभियांत्रिकीला प्रवेश मिळतोय् तर, घेऊन टाक, अशी पालकांची मानसिकता होती. अर्थात गेल्या दशकभरात अभियंत्यांना मिळालेल्या नोकर्‍या आणि प्रतिष्ठा, त्यांच्या मनात होती.
ही २००८-०९-१० ची अभियंत्यांची तुकडी जेव्हा मार्केटमध्ये आपली डिग्री घेऊन फिरू लागले; तेव्हा त्यांना नोकरी मिळाली नाही. आणि त्यामुळे समज झाला की, आता अभियांत्रिकीमध्ये संधी नाहीत. दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये राज्यभरात अभियांत्रिकीच्या पन्नास हजाराहून अधिक जागा रिकाम्या राहू लागल्या. अर्थात त्यामुळे संधी नाहीत, असा निष्कर्ष काढता येत नाही. नेमके काय झाले, त्याची मीमांसा करून अभियंता होण्याची वाट धरली तर संधी तुमच्या हातात आहे.
अभियंत्यांचा स्वाभाविक कल
अभियांत्रिकीला करीयर म्हणून निवडण्यापूर्वी आपल्यात अभियंता होण्यासाठी आवश्यक गुण आहेत का, याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी स्वाभाविक कल अथवा नैसर्गिक क्षमता ज्याला ऍप्टिट्यूड म्हणतात, तो आवश्यक आहे. सर्वप्रथम असे की, लॉजिकल आणि रिजनिंग अर्थात तर्क आणि कारण. गोष्टींमध्ये तर्क लावण्याचा आणि घटनांमागील कारण शोधण्याचा स्वभाव असला पाहिजे. शिवाय त्याला प्रात्यक्षिकांवर भर देता आला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचे प्रात्यक्षिक करून बघण्याची आवड असली तर तो अभियंता यशस्वी होतो. अगदी लहानपणी मुलांना आपण खटपट करताना बघतो. घड्याळ उघडेल, मशिन उघडेल असे उद्योग करणारी मुले उत्तम अभियंता होऊ शकतात. मात्र, त्यांना वेळेतच दिशा देणे आवश्यक आहे. शिवाय प्रत्येक गोष्टीमागची जिज्ञासा देखील भावी अभियंत्यामध्ये आवश्यक आहे. वेगळेपणा दिसला की, प्रश्‍न पडलाच पाहिजे! केवळ गुण मिळवून चांगला अभियंता होता येत नाही.
लर्निंग अर्थात शिकणे…
हे सगळं असताना अभियांत्रिकीमध्ये शिकणे फार महत्त्वाचे ठरते. चांगल्या शिक्षणाशिवाय पर्याय नाही. प्रात्यक्षिक शिक्षणाशिवाय विद्यार्थ्यांना चांगले अभियंता होता येत नाही. म्हणजे शिकण्यासाठी प्रात्यक्षिक अनुभव हवाच. माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्यासाठी प्रात्यक्षिक ज्ञान आवश्यक आहे. एखादी गोष्टीची माहिती असणे आणि ती करता यात फार फरक आहे. जसे जलतरण! तुम्हाला माहिती आहे की, जलतरण कसे करायचे. सूर कसा मारावा, हात-पाय कसे हालवावे, डोके-हात-पाय यांच्यात एवढ्या अंशाचा कोण असावा. त्यावेळी तुम्हाला पाण्यात ढकलले तर पोहता येणार आहे का? हे माहित असूनही मुळीच नाही. त्यामुळे थेअरीमध्ये चांगले ज्ञान मिळवले आणि प्रात्यक्षिक येत नसेल तर अभियांत्रिकी करियरमध्ये यश मिळणार नाही. आपल्याकडे मात्र, प्रात्यक्षिक परीक्षा केवळ उत्तीर्ण होण्यासाठी, गुण मिळवण्यापुरतेच राहिले, म्हणून पुढे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो.
कॉलेज कसे निवडाल
अभियांत्रिकी करण्याचा निर्णय घेतल्यावर तुम्ही विविध प्रवेश परीक्षा देतात. अर्थात आजकाल सगळ्यांना कोणत्या प्रवेश परीक्षा द्याव्या, हे ठावूक असतेच. आयआयटी व एनआयटीसाठी जेईई आणि महाराष्ट्रातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी एमएच-सीईटी देणे अपेक्षित असते. अभियांत्रिकी ज्ञानशाखेच्या शिक्षणात महाविद्यालयांचे फार महत्त्व आहे. कारण आपण बघितलेल्या गोष्टी अभियंत्याला शिकविण्याचे कार्य महाविद्यालयातच होईल.
महाविद्यालय निवडण्याचा पहिला निकष तर असा असतो की, समाजात त्या कॉलेजबद्दल काय म्हटल्या जाते. मात्र, केवळ ऐकिव माहितीपेक्षा किमान एकदातरी महाविद्यालयाला भेट द्यायला हवी. तेथील प्राध्यापक वृंद तसेच जमले तर विद्यार्थ्यांसोबतही संवाद साधायला हवा. शिवाय एआयसीईटीच्या गाईडलाईन्सनुसार महाविद्यालय ती निकष पूर्ण करीत आहेत का, हे देखील तपासणे फार आवश्यक आहे. अर्थात ते निकष माहिती करून घेतलेच पाहिजे. तरी महाविद्यालय निवडताना खालील गोष्टी तपासून घ्या.
– महाविद्यालयात नियमित शिक्षक आहेत का
– नियमित तास होतात का
– शिस्त आहे का
– ऍक्रेडेशन आहेत का, जसे एनबीए वगैरे.
– प्लेसमेंटचा विशेष प्रयत्न
– सी.आर.टी. वा गेट परीक्षेसाठी प्रशिक्षण देणारे
महाविद्यालय की शाखा
विद्यार्थी शाखा निवडणे अथवा महाविद्यालय निवडे यात संभ्रमावस्थेत असतात. आपल्याला अमुक अभियांत्रिकीच्या शाखेत अभ्यासक्रम करायचा आहे. त्यावेळी एखादे प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश मिळतो. मात्र, त्या महाविद्यालयात ती शाखा चांगली नाही. दुसर्‍या महाविद्यालयात ती ज्ञानशाखा चांगली शिकविल्या जाते. मात्र, त्याची प्रतिष्ठा थोडी कमी आहे. किंवा एखाद वेळेस प्रतिष्ठीत महाविद्यालयात दुसर्‍या शाखेत प्रवेश मिळणार असतो. मात्र, आपल्या आवडीसोबत तडजोड करून विद्यार्थी त्या प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश घेतात आणि पुढे न आवडणार्‍या शाखेत करियर करावे लागते. म्हणून शाखानिहाय महाविद्यालय निवडलेले चांगले असते.
कळपातून बाहेर निघा
आपल्या विदर्भातील विद्यार्थ्यांमध्ये कळपात राहण्याची मानसिकता मला आढळली. कौशल्य असूनही वेगळे करण्याची प्रचंड भीती असते. जोपर्यंत आपण इतरांपेक्षा वेगळ करू शकणार नाही, तोपर्यंत प्रगती होणे नाही, हे देखील तेवढंच खरं आहे. तसेच अभियंत्याला भाषेवर त्यातल्या त्यात इंग्रजीवर प्रभुत्व मिळवावे लागेल. केवळ इंग्रजीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले मी बघितले आहे. हे शिकताना सादरीकरण कौशल्य (प्रेझेंटेशन स्किल्स) विकसित करणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी शिक्षणादरम्यान कॉर्पोरेट लाईफ कशी असते, त्याबद्दलचे जुजबी ज्ञान मिळाले पाहिजे. वरील कौशल्य आम्ही आमच्या महाविद्यालयात (राजीव गांधी अभियांत्रिकी) सीआरटी कार्यक्रम राबवून देत असतो. हे यशाची वाट चोखळण्यासाठी फार आवश्यक आहे.
या गोष्टींपासून सावध राहा….
अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेताना तुमच्यासमोर अनेक मोह येतील. काही भ्रमही उत्पन्न होतील. प्रवेश घेण्यासाठी काही आमिष देखील देऊ शकतात. कधी कुणी आपल्या स्वार्थासाठी तुम्हाला प्रवेश घेण्यास भाग पाडू शकते. मात्र, या गोष्टींपासून जाणीवपूर्वक सावधान रहावे. कारण वाढत्या स्पर्धेच्या काळात असे मोह समोर येतील, याची शंका नाकारता येत नाही. शिवाय आपला कल अभियांत्रिकीचा आहे का, हे बघूनच अभियांत्रिकीला प्रवेश घ्या.
अभियांत्रिकी कशासाठी…!
शेवटी जाता-जाता हे एक गोष्ट लक्षात ठेवा की, अभियांत्रिकी कशासाठी! आपल्याला केवळ अभियंता म्हणून नव्हे तर माणूस म्हणून घडायचे आहे. अन्यथा तो यंत्रवत मनुष्यच होईल. सामाजिक जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. त्यातूनच त्या अभियंत्याचा सर्वांगीण विकास शक्य होईल. सोबत अभ्यासाव्यतिरिक्त गोष्टी शिकल्या पाहिजेत. पैसा कमविणे हे ध्येय असण्यापेक्षा सामाजिक जाणीव ठेवून अभियांत्रिकी करा. देशात वेल्थ क्रिएशन करण्यासाठी अर्थात देशाला समृद्ध करण्यासाठी अभियंते व्हा. या उदात्त हेतूने प्रेरित होऊन अभियंते झाल्यास वैयक्तिक ध्येय देखील पूर्ण होतील, हे निश्‍चित. शेवटी असे की, अभियंते व्हा पण माणूस होणे विसरू नका….
– डॉ. अभिजित बापट
(९७६४९९६४७६)