दुर्गकथा

0
147

विदर्भात दुर्ग बहुत. प्राचीन नंदीवर्धन म्हणजेच नगरधन, गाविलगड, नरनाळा, चंद्रपूर, माणिकगड, बल्लारपूर, भद्रावती, उमरेड, वैरागड, अंबागड, सानगडी, माहूरगड, कळंबदुर्ग, टिपागड असे अनेक ज्ञात-अज्ञात गड किल्ले विदर्भात नांदलेल्या राजवंशांचं सामर्थ्य दर्शवताय्‌त. प्रत्येक किल्ला देखणा, सुरक्षादृष्टीनं परिपूर्ण अन् स्थापत्यदृष्ट्या अभ्यासनीय. हे दुर्गशास्त्रही विशेषच. चंद्रपूर-गडचिरोली भागातलं दुर्गवैभव वेड लावणारं.
पाच-सात हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीची जी स्थानं उत्खननात सापडली, प्रकाशात आली त्यातही तटबंदीनं बंदिस्त नगरं दिसतात. दुर्गबांधणीची सुरुवात कदाचित तेव्हापासूनची. मोठमोठाली गावं सामावतील एवढा मोठा आवाका असलेले गड किल्ले भारतात-महाराष्ट्रात आहेत. संरक्षण हा दुर्गबांधणीचा मुख्य उद्देश. सिंधू संस्कृतीतले तटबंदीचे अवशेष आणि छोट्याशाही घराला बांधलेली कम्पाऊंडवॉल या मागची मानसिकता सारखीच वाटते. हजारो वर्षे ही भावना मानवाच्या मनात घर करून आहे आणि दुर्गनिर्माण हा त्या भावनेचाच आविष्कार.
जमिनीवर असलेला म्हणजे भूईकोट किल्ला आणि वर पर्वत, डोंगरावर असलेला म्हणजे गड. उद्देश एकच, तरीही प्रत्येक किल्ला वेगळा. प्रत्येक किल्ल्याचे काही खास विशेष. वैरागडच्या छोट्या छोट्या विहिरी आणि प्रचंड बुरुज चौकोनी आकाराचे. टिपागडवरून नदीचा उगम. माणिकगडावर एक प्रचंड विहीर दगडात कोरलेली. ही विहीर म्हणजे एखादी दरीच वाटते. बल्लारपूर किल्ल्यातली तळघरं आणि किल्ल्याला लागूनच वाहणारी वरदा नदी. चांदा-चंद्रपूरचा किल्ला चार प्रचंड महाद्वारं चार दिशांना असा आणि अख्खं शहर सामावून असलेला. भद्रावतीच्या किल्ल्यातली सुंदर कलापूर्ण विहीर. माहूरगडाची तटबंदी. नगरधनचं आटोपशीर सौंदर्य. असे अनेक विशेष. काहींचं वय हजाराच्या आसपास.
या अभेद्य अशा दुर्गांद्वारे शत्रूचा बीमोड सहज शक्य आणि शत्रूचा प्रवेश तेवढाच अशक्य. शत्रूला प्रवेश करताच येऊ नये अशी तटबंदी. चौफेर पहार्‍याच्या तटबंदीवर जागा. दूरच्या आणि जवळ पोहोचलाच तर जवळच्या शत्रूवर सहज मारा करता यावा अशी तटबंदीत छिद्रं. तोफा ठेवता येतील असे बुरुज. हत्तीनं जरी धडक दिली तरी उघडणार-मोडणार नाहीत अशी द्वारं आणि यासाठी मजबूत टोकदार खिळे द्वारांवर. संपूर्ण सुरक्षेचा परिपूर्ण विचार. याशिवाय गड किल्ल्याचा एकंदर आवाका, आत वस्तीला असलेल्या जनसंख्येच्या प्रमाणात पाण्याची व्यवस्था. उन्हाळ्यात जेमतेम पुरेल अशी नाही तर पुरून उरेल अशी जलव्यवस्था आणि जलव्यवस्थापन. जनवस्ती सोबतच सैन्य आणि अश्‍वांचाही दुर्गरचनेत अग्रक्रमानं विचार. गड-किल्ला बांधणीतच त्याचं संरक्षण कसं होईल, या विचारानं बांधणी. येणारा शत्रू नेमका कोणत्या मार्गानं येईल याचा आधीच अंदाज घ्यायचा आणि त्या वाटा रोखण्याची सारी तयारी करून ठेवायची. कोणीही आला आणि प्रवेशद्वाराला भिडला असं होणार नाहीच. यासाठी मग सहज चढता येतील असे कडे तोडून टाकायचे, चढण अवघड करायची. प्रवेशद्वार किंवा कोणतंही द्वार सहज ठेवायचं नाही. ते राखणारे बुरूज दोन्ही बाजूंनी. भूईकोट असेल तर येणारा शत्रू अंतरावर राहील अशी रचना. त्यासाठी सभोवार खोल खंदक सदैव पाण्यानं भरलेला. वैरागडच्या किल्ल्याभोवती अजूनही असा खंदक दिसतो.
वाडे, सैन्य शिवबंदीची घरटी, स्वयंपाकाची व्यवस्था, अश्‍वशाळा, धान्य कोठारं, तोफांच्या दारुगोळ्याची कोठारं, शस्त्रागार, कचेर्‍या ही बांधकामं आवाका व आवश्यकतेनुसार. वाडे आणि निवासांचं बरंचसं काम लाकडी, म्हणूनच आज कोणत्याही किल्ल्यात या इमारतींचे फक्त पायवे आणि चौथरेच दिसतात. तटबंदी बहुतेक शाबूत. शत्रूवर तटबंदीतून मारा करण्यासाठीची तिरपी छिद्रं म्हणजे जंग्या आणि वरची कमानदार टोकं म्हणजे कपीशीर्ष.
किल्ला किंवा गड कितीही छोटा असो किंवा कितीही प्रचंड, त्या परिसरात, त्या आसमंतात जाणवणारं गारूड हे काहीतरी वेगळंच असतं आणि ते फक्त गड-किल्ल्यावरच जाणवतं. भान हरपून टाकणारं असं काहीतरी तिथं वास करत असतं. ते चेटूक करतं, बोलावून घेतं, ओढून नेतं. तिथला वारा आणि तिथला थेट भेटणारा पाऊस, घनगर्द वनराई, तिथल्या अंधार्‍या अन् चांदणभरल्या रात्री, प्रत्यक्ष स्पर्शता येईल अशी अंतर्मनापर्यंत झिरपत जाणारी निःशब्द शांतता. अशी एकदा किल्ल्याशी ओळख पटली की, त्या किल्ल्याशी आपोआप एकरूपता साधली जाते आणि मग किल्ल्याचं सारं अंतरंग, त्यानं पाहिलेलं साहिलेलं असं सगळंच शब्दांशिवायच संक्रमित होत जातं. तिथली युद्धं, सांडलेलं रक्त, विजयानंतरची नौबत, जन्म-मृत्यू. एकेक आठवण किल्ल्यानं जपून ठेवलेली असते.
आज प्रत्येक किल्ल्यात जंगल उगवलंय. तटबंदीतून झाडं. सर्वत्र विषण्णता, एक अनाकलनीय दीर्घ उदासी. शेवाळलेलं पाणी आणि अंतरंगातले सारेच उमाळे गोठवून बसलेला तट. क्षणाक्षणाला ढासळणारा एकेक दगड. हळूहळू होत चाललेला किल्ला नावाच्या कथेचा अंत.
– संजीव देशपांडे
९०१११६५०७९