रॉंग नंबर नकोच…

0
137

आज आधुनिक तंत्रज्ञान बरंच विकसित झालंय्. युवकांच्या हातात मोबाईल, कॉम्प्युटर आलेत. तरुणांचे स्वप्न, इच्छा, आकांक्षा उंच भरारी घेत असताना आपलं करिअरच्या दृष्टीने ते अथक प्रयत्नशील आहेत. आई-वडिलांच्याही मुलांकडून मोठ्या अपेक्षा असतात. त्याकरिता आपल्या मुलांना काही कमी पडू नये, म्हणून ते अथक परिश्रम, जिवाचं रान करतात.
युवावस्थेत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना, आपली पुढची पाऊलवाट ठरवताना कधी कधी मग चुकीच्या दिशेने एखादं पाऊल नकळत पडते आणि ते नकळत पडलेलं पाऊल आपल्याला चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. ज्यामुळे आपलं आयुष्यभराचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं. आपण या ठिकाणी एखाद्या लहान रोपट्याचं उदाहरण घेऊ शकतो. लहान रोपटं मोठं होत असताना आणि त्याचा पुढं वृक्ष होताना त्याला अनेक वादळांना, उन्ह, वार्‍याचा सामना करावा लागतो. तसेच आपल्या मानवी जीवनाचंही आहे. आपलं जीवन जगत असताना आपल्याही नको त्या संकटांचा सामना करत वाटचाल करावी लागते, आपला मार्ग ठरवावा लागतो.
आज आधुनिक तंत्रज्ञान वापरताना कधी कधी आपला दोष नसतानाही आपण नकळत एखाद्या गर्तेत फसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला सतर्क राहावेच लागते. अनेक महाविद्यालयीन मुलं, मुली आपल्या आई-वडिलांपासून दूर शिकत असताना, चुकीच्या लोकांच्या संगतीत लागतात आणि त्यांचं फार मोठं नुकसान होतं. घरापासून दूर होस्टेलला शिकत असताना नेहमी अनेक लोकांशी संपर्क येतो. लॉंड्री, कॅण्टीन, छोटी- मोठी दुकानं, मोबाईल रिचार्ज करताना अनेक अनोळखी चेहर्‍यांशी आपला परिचय होतो. पुढे आपण त्यांच्याशी मैत्रीचा हात पुढे करतो. हे अनेक चेहरे आपल्याला जपणारे असतातच असे नाही. कारण प्रत्येक जण आपल्या फायद्याकरिता जगत असतो. कधी कधी आपली ही होत जाणारी ओळख आपल्याला अधोगतीकडे नेत असते. अशांशी मैत्री झाल्यानंतर मग त्यांच्याशी फोनवर, फेसबुकवर आणि व्हॉट्‌सऍपवर रात्र रात्र गप्पा चालतात. आपला अभ्यासाचा वेळ आपण त्यांच्यामागे लागून व्यर्थ घालवतो. अशा रिकाम्या लोकांना त्यांचं करिअर तर नसतंच, पण आपल्याला ते अनेक गोष्टींच्या नकळत नादी लावतात. मग आपलं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. नीट अभ्यास झाला नसताना परीक्षेत यश मिळत नाही. आणि त्यातून एक नैराश्य आपल्या वाट्याला येतं. आपल्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवणारे आई-वडील आपल्यापासून दूर असतात. त्यांना असंच वाटत राहतं की, आपली मुलं चांगलं शिक्षण घेत आहेत. हे सर्वांच्याच बाबतीत होतं असं नाही, पण कुण्याही तरुणाच्या बाबतीत असं होऊ नये, चुकीची संगत लागू नये. जो सावधानतेनं राहतो, वागतो त्याचंच आता सारं काही आहे, असं म्हणायचे दिवस आले आहेत. वाढत्या प्रगतीच्या दिवसांत तेवढे धोकेही वाढले आहेत. आपल्याला जपणारे चांगले मित्र मिळणं आता कठीण झालं आहे आणि शोकांतिका ही आहे की, प्रत्येकाच्या फ्रेण्डलिस्टवर हजार हजार मित्र आहेत. कधीतरी हाही विचार करावा की, ज्या मित्रांसोबत आपण चोवीस तास अनेक पोस्ट, आपल्या गोष्टी शेअर करतो त्यातील आपल्यावर संकट आलं तर कितीजण आपल्याकरिता धावून येतील? तर उत्तर निराश करणारं असेल.
आपले आई-वडील, बहीण-भाऊ आणि जिव्हाळ्याचे एक-दोन मित्र इतकंच काय ते आपल्या जिव्हाळ्याचं. बाकी सारं टाईमपास.
तेव्हा आपल्या जिव्हाळ्याच्या या दोन-चार चेहर्‍यांचाच विचार करून त्यांना आपला वेळ द्या. ते आपले आणि आपण त्यांचे. बाकी तर आपल्यासोबत असूनही आपले नाही. मग त्यांच्याकरिता आपण आपला अमूल्य वेळ खर्च का करावा?
कधीतरी फेसबुक, व्हॉट्‌सऍपवर पडीक राहताना, चुकीच्या रॉंग नंबरवर उगाच बोलताना या सार्‍या बाबींचा विचार व्हावा. सरतेशेवटी आपल्यालाच आपल्याला घडवायचं आहे…
– दीपक वानखेडे /९७६६४८६५४२