सुसंस्कृत समाज

0
175

मराठी नाटककरांनी त्यांच्या लेखणीतून समाजाला भेडसावणार्‍या अनेक समस्यावर आपापल्या परीने मार्ग शोधून या संकटांनी भांबावलेल्या अवस्थेतील समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. नाटककारांनी देशविदेशातील रंगभूमीचा जवळून अभ्यास करून ही रंगभूमी समृद्ध करण्यास हातभार लावला आहे. कै.कुसुमाग्रज व कै. पु. ल. देशपांडे या सारख्या जाणकारांनी रशियन, फ्रेंच व इंग्लिश नाट्यसंहितांचे मराठी भाषेत अनुवाद केले, त्याच्या रंगावृत्ती तयार करून त्या नाटकांचे हजारोने प्रयोग केले. ‘मला काही सांगायचय्’, ‘तुझे आहे तुझं पाशी’, ‘डॉक्टर तुम्ही सुद्धा’, ‘लग्नाची बेडी’, ‘तो मी नव्हेच’ यासारख्या अनेक नाटकांनी मराठी मनाला धैर्य, सामाजिक भान, मानसिक बळ दिले आहे. तत्कालीन सामाजिक परिस्थितीनुसार संहिता तयार करून अनेक मूक प्रश्‍नांना उघड करण्याचं कार्य या रंगभूमीने अनेकवार केलं आहे. नाटककाराच्या मनातील विचारांच्या पलीकडे जाऊन दिग्दर्शकांनी उत्तमोत्तम कलाकारांच्या मदतीने आविष्काराच्या रुपात सामाजिक प्रश्‍नांना जगासमोर मांडून त्यावर चर्चा व बर्‍या-वाईट परिणामाच्या शक्यतेसह उपाययोजना सुचवून कळत नकळत समाजप्रबोधन व प्रश्‍नांची उकल केली आहे, हे विसरता कामा नये. एकीकडे मनोरंजन, सामाजिक प्रश्‍नांना वाचा फोडणे, चर्चासत्र, समाज प्रबोधन व उपचार असा ‘पंच’ रंगभूमीने दिला आहे. मराठी माणूस त्याच्या मनातल्या कामना, सुप्त इच्छा व आकाक्षांचे प्रतिबिंब नाटक, सिनेमा, मालिका व इतर करमणुकीच्या माध्यमात पहात असतो. त्याला जे आवडेल, मनाला भावेल, तेच तो पाहतो, परत परत पाहतो, आपल्या रोजच्या आयुष्याशी त्या आविष्काराचा कुठेतरी संबंध लावत असतो. त्या आविष्कारात स्वत:ला शोधात असतो. जरा कुठे साम्य दिसल, कि तो सुखावतो. आत्मिक समाधान शब्दाच्या पलीकडचे असते. मराठी मनाला हे आत्मिक समाधान रंगभूमीकडून मिळते. म्हणून मराठी रंगभूमी सशक्त व अभिरुची संपन्न झाली आहे असे म्हणणे धाडसाचे निश्‍चितच ठरणार नाही. मराठी माणूस वाचनप्रिय असल्यानेच या जगामधील घडणार्‍या प्रत्येक घटनेची दखल तो घेत असतो. त्यामुळे आपल्या अवतीभवती काय चाललेल आहे याचं त्याला संपूर्ण भान आहे. हा समाज बुद्धिवादी, सजग व प्रयोगशील असल्याने तो ठाम निर्णयशक्तीचे प्रदर्शन करतो.
जुन्या काळातील बालगंधर्व, मा. दीनानाथ, बापू माने, नंतरच्या पिढीत बाबुराव पेंढारकर, स्नेहप्रभा प्रधान, राजा परांजपे, दुर्गा खोटे, केशवराव दाते, सुलोचना, काशिनाथ घाणेकर यासारख्या अनेक, सध्याच्या पिढीत, मोहन जोशी, डॉ. गिरीश ओंक, वंदना गुप्ते, रिमा लागू, दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, तोरडमल, नाना पाटेकर, अरुण सरनाईक, रोहिणी हत्तंगडी, व ताज्या दमाचे चिन्मय मांडलेकर, अमृता सुभाष, किरण माने असे अनेक होतकरू कलावंत आपआपल्या परीने जीवाच रान करीत प्रेक्षकांच्या अपेक्षापूर्तीस उतरले आहेत.प्रत्येक प्रयोगागणिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतांनाच त्यांच्याकडून समाज प्रबोधनाचे महत्वाचे कार्यही घडते आहे.यातूनच समाजाला अनेक समस्यांवर मार्गदर्शन झाल्याने (वैयक्तिक किंवा सामाजिक ) तोडगा सापडत गेला आहे व त्याची परिणती समाजाचे नाट्य प्रेम द्विगुणीत होताना दिसते.
व्यावसायिक व हौशी रंगभूमी
याचं अर्थ असा नोहे की नाटक या कलाप्रकाराला बहर आला आहे. अर्थात सत्तरच्या दशकात तशी परिस्थिती होती.अनेक संस्था, नाटककारांनी, दिग्दर्शकांनी व कलाकारांनी अत्यंत जोमाने कार्य करून वैविध्यपूर्ण नाटकांची निर्मिती केली, जिला चोखंदळ मराठी प्रेक्षकांचा प्रतिसादही लाभला होतं. परंतु ऐंशीच्या दशकात ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आणि मग बराच काळ नाटकांना अत्यंत वाईट दिवस आलेले होते, जे आपण सर्वांनीच अनुभवले आहे. नाट्य व्यावसायिकांनी अर्थकारण हाच एकमेव निकष मानून निर्मितीला बांध घातल्याने कलाकारांनीसुद्धा मालिकांकडे लक्ष केंद्रित केले होते. सर्व मोठे कलाकार मालिकांमध्ये बिझी झाल्याने जी काही थोडीफार व्यावसायिक नाटके होत होती त्यामध्ये नवीन कलाकारांना संधी मिळाली, त्यांच्या मुक्तसंचाराला वाव मिळत गेला व ‘हौशी रंगभूमी’ बहरात येत गेली. नाटक हाच ज्यांचा प्राण होता त्या कलाकारांनी नाटकाला जिवंत ठेवण्याचे महनीय कार्य केले आहे.आज मराठी नाटकांना जे खूपच आश्‍वासक, उत्साहवर्धक व पोषक वातावरण तयार झाले आहे त्याचं श्रेय्य बर्‍याच अंशी हौशी कलाकारांनाच जातं यात काही वादच नाही.
शिकवण व स्वीकार
मराठी लेखक, नाटककार, दिग्दर्शक, कलाकार यांनी प्रतिकूल परिस्थितीत रंगभूमीची सेवा करतांना सामाजिक जाणिवांचे भान ठेवूनच कलाकृती सादर केल्या आहेत. या कलाकृतीतून समाजाने काय स्वीकारले, काय अंगिकारले, त्यांना काय शिकता आले हे कदाचित कोणीच ठामपणे सांगू शकणार नाही.विक्रम गोखलेंनी ‘नकळत सारे घडले’ मधून केलेल्या अप्रतिम अभिनयाला सार्‍यांनी भरभरून दाद दिली, पण त्यातुंन कोणी काही शिकले का? किमान त्यांच्या घरात दोन पिढ्यांमध्ये सुसंवाद साधला जातोय् का? ‘तो मी नव्हेच’ मधून एक खल प्रवृत्ती समाजासमोर आली, त्याचे परिणामही आले, पण समजातली खल प्रवृत्ती कमी झाली का? हे प्रश्‍न आज इतक्या वर्षानंतरही अनुत्तरित आहेत ही फार मोठी खंत आहे. विवाह मंडळातील गैरप्रकारांना आजही अनेक जण बळी पडत आहेत, मग डोळे असूनही आंधळेपणाच्या या वागण्याला काय म्हणायचे ? जवळ पैसा अडका असूनही साथीदाराशिवाय जगणे किती अवघड आहे हे आपण ‘यू टर्न’ मध्ये पहिले आहे. विधवा, विधुर, जेष्ठ नागरिक, यांच्या समस्यावर तोडगे निघतायेत का? या समाजात राहताना एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती दिसणार आहे का? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे नाटकाने समाजाला दिली आहेत. कोणत्याही कलाकृतीचा मूळ गाभा समाज प्रबोधन हाच असायला हवा. प्रत्येक कलाकृतीतून समाजाला सत्य समजावे अशी अपेक्षा आहे. त्यातून बोध, शिकवण मिळायला हवी. परंतु आजकाल प्रबोधनाला बाजूला सारून करमणुकीला प्राधान्य दिले जात असल्याचेच चित्र दिसते आहे. करमणुकीची साधने वाढली आहेत हे त्याचे प्रमुख कारण असू शकेल, पण नाटकातला जीवंतपणा समाजाला आजही आपलासा वाटतो यात शंका नाही. समाज यातूनच चांगली शिकवण घेइल हे नक्की.
उद्याची पिढी
सुसंस्कृत समाज घडणीमध्ये मराठी नाटकांचा फार मोठा वाट आहे ही बाब नाकारताच येणार नाही. त्यामुळे मराठी नाटकांना जिवंत ठेवण्याची जबाबदारी या समाजावरच आहे. आज नाटकांना जे व्यावसायिक स्वरूप आलं आहे ते बघता प्रथितयश निर्माते, दिग्दर्शक व कलाकारांकडून या बाबतीत काही घडेल असं निश्‍चितच वाटत नसल्याने ही धुरा पर्यायाने ‘हौशी रंगभूमीवरच’ आली आहे जी त्यांनी स्वीकारली सुध्दा आहे परंतु शासन व समाज या दोहोंकडून या कलाकृतींचा स्वीकार, प्रोत्साहन व सहकार्याची अपेक्षा या ’हौशी मंडळींनी’ बाळगल्यास चूक ते काय? परंतु तसे घडत नाही, हीच शोकांतिका होय! तद्वतच ‘हौशी रंगभूमी’ समृद्ध होण्यासाठी ‘बाल रंगभूमी’ जोपासली गेली पाहिजे, परंतु असे अभावानेच घडते आहे. ‘बाल नाट्याच्या’ अस्तित्वाच्या मूळ प्रश्‍नांसोबतच अनेक समस्या सर्वांनाच भेडसावत आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी शासन, समाज, हौशी व व्यावसायिक रंगभूमीवरील सर्वच कलावंतांनी एकत्र येऊन सकारात्मक कार्य केलं पाहिजे. बालनाट्याद्वारे मुलांचा होणारा ‘व्यक्तिमत्त्व विकास’, त्यांच्या विस्तारणार्‍या जाणिवा अत्यंत महत्वाच्या ठरतात.त्यासाठी ‘नाटक’ हा विषय केवळ अभ्यासक्रमात समाविष्ठ करून भागणार नाही, तर त्यासाठी ‘नाटक’ हा विषय शिकवणारे ‘शिक्षक’ तयार होणे, नाट्यक्षेत्रातील मंडळींनी त्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे. प्रत्येक जण आपापल्यापरीने काम करतोच आहे पण एकुणात समाजभान ठेवून, सकारात्मक विचार व त्याला कार्याची जोड दिल्यास हा समाज सुसंस्कारित होण्यास विलंब लागणार नाही.
– एनसी देशपांडे /९४०३४९९६५४