अकाली वृद्धत्व तरुणाईतील शाप

0
222

तारुण्य म्हणजे मानवी जीवनातील सप्तरंगांचा आणि सप्तसुरांचा मधुर, अतुलनीय संगम असलेल्या इंद्रधनूचा संगीतमय काळ. जो इंद्रधनुष्य कधी लुप्तच होऊ नये असे वाटते, पण तो फारच लवकर दिसेनासा होतो हे वास्तव. तसेच उत्साह, जोम, ताकद अशा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमतांनी परिपूर्ण असा काळ म्हणजे मानवी जीवनातील तारुण्य! जो काळ कधी संपूच नये ही अभिलाषा प्रत्येकाच्या मनात असतानाच प्रौढत्वाची चाहूल लागायला लागते. त्याची साक्ष देणारे पांढरे केसं, शरीरावर पडत जाणार्‍या सुरकुत्या पाहताना मानवी मन वार्धक्याच्या भीतीने पछाडले जाते. मागे वळून पाहताना किती तरी सुखद आठवणींत मन हरवून जाते, तर बर्‍याच वेळा किती तरी चांगल्या गोष्टी करायच्या राहून गेल्या याची खंत मनाला सतावत राहते.
वार्धक्य जसे शारीरिक स्वरूपाचे तसेच मानसिक स्वरूपाचेदेखील असू शकते. शरीर तरुण असताना मनात उत्साह, चैतन्य नसेल तर! तारुण्यातील शारीरिक, बौद्धिक क्षमता या चित्रातील फुलांसारख्या ठरतात, ज्या फुलांना रंग असतो, पण सुगंध नसतो, कुठलीही मधमाशी त्या फुलांच्या ‘आसर्‍याला’ बसून त्यांचा आस्वाद घेत नाही. असे म्हणतात की, ‘‘युद्धं अगोदर मनोभूमीवर जिंकले जातात, मग रणभूमीवर!’’
एकदा मानसिकतेचे खच्चीकरण झाले की, आपणच आपल्यासोबत पराभवाचा एक जीवघेणा खेळ खेळत राहतो आणि जेव्हा वेळ निघून गेलेली असते तेव्हा लक्षात येते आपल्या वाटेवर आपणच निराशावादाचे भयंकर काटेरी जंगल तयार केले होते. आपल्याकडे ‘जे’ नाही या विचाराने मानसिक निश्‍चयाच्या महामेरूला सुरुंग लावण्याचे कृत्य आपणच केले होते. जिथे आपल्याकडे ‘जे’ होते ते नसणार्‍या बाबींपेक्षा कितीतरी मोठे! मौल्यवान होते, ते म्हणजे तारुण्य. ज्या तारुण्यात आत्मविश्‍वासाच्या बळावर आपण कुठलेही स्वप्न सत्यात उतरवू शकलो असतो. सकारात्मक विचार हा यशाचा एक मार्ग आहे म्हणूनच असे म्हणतात की, तरुणांचे विश्‍व हे स्वप्नांचं विश्‍व असतं, पण ते स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहिलेले असावेत. ज्यांना सकारात्मकतेचे ‘खत’ आणि मेहनतीतून निघालेल्या घामाचे ‘पाणी’ दिलेले असावे.
आज बर्‍याच ठिकाणी तरुणांचे घोळके तासन्‌तास बसलेले दिसतात. ज्यांच्या गप्पांचा ओघ नको त्या मार्गाने वळलेला ऐकावयास येतो. त्यातील काही आई- वडिलांनी मिळविलेल्या संपत्तीला नको त्या मार्गाने खर्च करण्याचा कार्यक्रम राबवून त्यांनी मिळविलेली प्रतिष्ठा, पैसा आणि यांचे अनमोल असे तारुण्य लयास जात असताना पाहणे पाहणार्‍यास चिंताजनक असते.
खेड्यात जन्म होणे, हे खरं तर एक वरदानच समजावे. कारण खेड्याला नैसर्गिक अलंकारांचे ‘लेणे’ लाभलेले असते. जो निसर्ग मानवास उदारमतवाद क्षणोक्षणी शिकवत असतो, अशा मानवाचा गुरूच्या सान्निध्यात तारुण्याचा सुवर्ण काळ जाणे ही एक भाग्याचीच बाब समजावी; परंतु आजच्या खेड्यातील तरुण पिढीत बर्‍याच अंशी शहरीकरणाचे अनुकरण दिसते जे शहरीपणातच पाश्‍चिमात्य संस्कृतीच्या ‘अंधानुकरणातून’ आलेले अनुभवास येते. या अनुकरणाला साथ म्हणून आळशी प्रवृत्तीची जोड बर्‍याच जणांच्या ठिकाणी पहावयास मिळते. त्यामुळेच कामासाठी माणसे मिळत नाहीत. एक काळ होता जेव्हा माणसांना काम मिळत नव्हते. आज मात्र कामाला माणसे मिळत नाही.
आव्हानाला सामोरे जाणारे तरुण हेच खर्‍या अर्थाने राष्ट्राचे आधार स्तंभ असतात. तारुण्य जीवनात एकदाच मिळते, जे परत कुठल्याच किमतीत मिळविता येत नाही. या कालावधीत जर जीवनात ‘योग्य’ आव्हानांना सामोरे गेले तर त्यातून स्वहित, कुटुंबहित, समाजहित आणि राष्ट्रहित साधल्या जाऊ शकेल. राष्ट्रातील युवा पिढीने हे विसरता कामा नये की, आपल्या देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद अशा कितीतरी क्रांतिकारकांनी बलिदान दिले. त्यांचे बलिदान हे देशासाठी म्हणजेच देशबांधवांसाठी होते, आपल्यासाठी होते. त्यांचे बलिदान लक्षात ठेवून आपण आपल्या जीवनातील हा तारुण्याचा सुवर्णकाळ कर्मयोगात व्यतित करावा. आळसात लोळत पडण्यापेक्षा शारीरिक किंवा बौद्धिक श्रमाने थकल्यानंतर निद्रा लवकर प्रसन्न होते आणि त्या निद्राधीन अवस्थेतही आपणाला एक समाधान मिळत असते. त्यामुळे शारीरिक तारुण्यावस्थेतील युवकांनी मनात चैतन्याची ऊर्जा भरून, बुद्धीचा कस लावून कर्मयोगात गढून जावे ज्यातून जीवनाचे सार्थक होईल व येणार्‍या पिढ्यांना एक नवीन आदर्श मिळेल!
– गजानन मोहन गिरी / ९८२२८९७४९३