पर्रीकर सरकारची आज शक्तिपरीक्षा

0
116

वृत्तसंस्था
पणजी, १५ मार्च
गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी मंगळवारी विराजमान झालेले मनोहर पर्रीकर यांच्या सरकारची उद्या गुरुवारी शक्तिपरीक्षा होणार असून, बहुमत सिद्ध करण्यात पर्रीकर यांना कोणतीही अडचण जाणार नसल्याचे आज स्पष्ट झाले आहे.
४० सदस्यीय गोवा विधानसभेत बहुमतासाठी २० सदस्यांच्या पाठबळाची गरज असताना पर्रीकर सरकारला २२ आमदारांचा पाठिंबा आहे. १३ आमदार असलेल्या भाजपाला गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी आणि अपक्षांनी पाठिंबा दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी पर्रीकर यांच्या शपथविधीवर स्थगिती देण्यास नकार देताना, या सरकारने ४८ तासांत आपले बहुमत सिद्ध करावे, असे निर्देश दिले होते.
कॉंग्रेस आमदार संपर्कात
गोव्यात कॉंग्रेसचेही नेते आपल्या संपर्कात असल्याचा दावा मनोहर पर्रीकर यांनी केला आहे. कॉंग्रेसचे आमदार पक्ष नेतृत्वाला वैतागले असून, ते भाजपात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. यातील काही आमदारांनी माझ्या मोबाईलवर तसा मॅसेजही केला आहे, असे पर्रीकर यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत सांगितले.
कॉंगे्रसचे नेते आणि आमदार जर मला मॅसेज करीत असतील, तर तसे करण्यापासून मी त्यांना थांबवू शकत नाही. त्यांनी इच्छा असेल, तर ते लवकरच भाजपात येतील, असे ते म्हणाले. कॉंग्रेस पक्ष अजूनही त्यांचा नेता निवडू शकला नाही. पक्षाचे नेते आपसातच भांडत आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.