गायत्री प्रजापतीला अटक

0
207

– १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
– अमित शाह यांनी शब्द पाळला
वृत्तसंस्था
लखनौ, १५ मार्च
गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि समाजवादी पार्टीचा नेता गायत्री प्रजापती याला पोलिसांनी आज बुधवारी अखेर बेड्या ठोकल्या.
लखनौमध्ये प्रजापतीला अटक करण्यात आली असल्याची माहिती लखनौचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मंझिल सैनी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. अटक केल्यानंतर पोलिसांनी प्रजापतीला स्थानिक न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली.
या सामूहिक बलात्कार प्रकरणात एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यातील सहा जणांना आधीच अटक करण्यात आली होती. आज प्रजापतीलाही अटक करण्यात आली. गायत्री प्रजापती फरार असताना काही दिवस दिल्ली व आसपासच्या परिसरात आणि त्यानंतर काही दिवस हरयाणाजवळ राहात होता. मंगळवारी रात्री उशिरा तो लखनौला आला होता. याबाबतची माहिती कळताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या, असे त्यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी गेल्या १७ फेबु्रवारी रोजी गायत्री प्रजापतीविरोधात गुन्हा दाखल केला होता. सोबतच, न्यायालयाने त्याची अटक रोखण्याची विनंती करणारी याचिकाही फेटाळून लावली होती. असे असतानाही २७ फेब्रुवारीला तो अमेठीतील मतदारसंघात फिरताना दिसला होता. एका महिलेवर आपल्या सहकार्‍यांसह सामूहिक बलात्कार केल्यानंतर, तिच्या अल्पवयीन मुलीवरही बलात्कार करण्याचा प्रयत्न प्रजापती व त्याच्या सहकार्‍यांनी केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो भूमिगत झाला होता.